बँकेची सुरक्षित नोकरी सोडून सुरू केला उजेड पेरणारा व्यवसाय

बँकेची सुरक्षित नोकरी सोडून सुरू केला उजेड पेरणारा व्यवसाय

 

प्रत्येक व्यक्तीसाठी या गाण्याचे संदर्भ वेगळे असतात. मला या गाण्याच्या ओळी ऐकल्या की डोळ्यांसमोर येतात लख्ख उजेड देणारे, आकर्षक, रंगीबेरंगी दिवे. आपलं घर अशा दिव्यांनी छान सजून जावं आणि घरात आल्यावर प्रसन्न वाटावं, अशी प्रत्येक घर घेणाऱ्याची इच्छा असते. ही आपली इच्छा पूर्ण करणाऱ्या व्यक्तीची म्हणजेच अरविंद सहस्त्रबुद्धे यांची ही यशकथा आहे. 

 

घर सजावटीसाठी आकर्षक दिवे

ग्राहकांच्या पसंतीनुसार आणि उपलब्ध जागेच्या आकारमानानुसार विशिष्ट जागेत किती दिवे बसवता येतील, हे दिवे कुठले असले पाहिजेत, त्याची रचना कशी असावी, किती व्हॅटचे दिवे असले पाहिजेत हे आधी ठरवले जाते. त्यानुसार फॉल्स सीलिंग करण्याआधी इलेक्ट्रिशियनकडून दिव्यांचे कनेक्शन घेतले जाते. यासाठी तयार केलेल्या डिझाईननुसार संरचना करून घेतली जाते. इलेक्ट्रीकल लेआऊटप्रमाणे लाईट पॅनेल, दिवे यांच्या जागा ठरवल्या जातात. फॉल्स सीलिंग झाल्यानंतर हे दिवे जागेवर बसवले जातात. लाईट पॅनेल तयार करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. परंतु घरातील दिव्यांच्या चांगल्या दर्जासाठी शक्यतो नामांकित कंपन्यांची उत्पादने वापरली जातात. याची किंमत साधारण ४०० पासून पुढे असते. 

 

दहा ते पंधरा वर्षांपूर्वी फॉल्स सीलिंग ही संकल्पना अस्तित्वात नव्हती. त्यावेळी भितींवर ट्यूब लाईट्स बसवल्या जात. त्यानंतर कंपन्यांनी एक पॅनेल तयार केले. परंतु ते एलइडी पॅनेल नव्हते. सर्वसाधारण वापरायचे (सीएफएल) दिवे यात बसवले जायचे. गेल्या आठ दहा वर्षात ते पॅनेल कालबाह्य होऊन आता एलइडी पॅनेल वापरले जाते. यात दिवे ८ व्हॅट पासून पुढे असतात. जागेच्या गरजेनुसार त्यांची निवड करून दिवे बसवले जातात. एलइडी पॅनेल लाईटमध्ये तीन वेगवेगळ्या रंग छटा मिळतात. एकाच बटणाने आपण त्यांचे रंग बदलू शकतो. सुपर व्हाईट मून लाईट, वॉर्म व्हाईट या रंगांमध्ये हे दिवे येतात. स्ट्रीप लाईट, हँगिंग लाईट, कॉर्नर लाईट, फ्लोअर लँप्स, एलइडी झुंबरे, वॉल लॅप्म्स, पेंडंट लाईट्स, मिरर लाईट, पिक्चर लाईट, पॅसेज लाईट इ. विविध प्रकारचे आकर्षक दिवे घर सजावटीसाठी वापरता येतात. त्यामुळे घर प्रकाशमान होतेच पण घरात सकारात्मक वातावरणतयार होते. सध्या बाजारात दिव्यांचे असंख्य प्रकार व डिझाईन पाहायला मिळतात. 

 

काही वर्षांपूर्वी कन्व्हेन्शनल ट्यूबलाईट किंवा सीएफएल घर सजावटीसाठी वापरले जायचे. त्यात विविध प्रकार येत असत. परंतु आता एलइडी दिवे बहुतांश ठिकाणी वापरले जातात. यामुळे वीज कमी वापरली जाते व घर प्रकाशमय होते. एलइडी दिव्यांमधेही वैविध्य आले आहे. साध्या बल्बपासून वेगवेगळ्या प्रकारच्या ट्यूबलाईटपर्यंत एलइडी मिळतात. विविध प्रकारच्या झुंबरांमध्येही हे दिवे सहज वापरता येतात. हे दिसायला अतिशय आकर्षक असतात. वीज बचत होत असल्याने ग्राहकांकडून याला पसंती मिळत आहे. एलइडी पॅनेल लाईट, एलइडी स्ट्रीप लाईट तसेच एलइडी डाऊन लाईट्स या तीन प्रकारांत या दिव्यांचे वर्गीकरण करता येते. घर सजावटीसाठी इंटेरिअर डिझाईनर किंवा इलेक्ट्रिकल कन्सल्टंट डिझाईन देतात. बऱ्याच वेळेला इंटेरिअर डिझाईनरचेच जास्त काम असते. ग्राहकांच्या मागणीनुसार व त्याच्या डिझाईनप्रमाणे इलेक्ट्रिकल कंत्राटदार काम करतात. उत्पादनांची वैविध्यता व तांत्रिक सुलभता यामुळे हे क्षेत्र विस्तारले आहे. 

 

निव्वळ शोभेच्या दिव्यांचं काम करणारेही काही असतात. पण इलेक्ट्रिकल कंत्राटदार म्हणून काम करताना जोडीला हा उद्योग केला तर जास्त फायदेशीर ठरतो. इमारतीमध्ये, घरांमध्ये विजेचं कनेक्शन कसं फिरवलं आहे हे कंत्राटदाराला नेमकेपणानं माहिती असतं. त्यामुळे शोभेच्या दिव्यांची रचना करताना त्याला सहजपणे काम करणं शक्य होतं. इंटेरियर डिझाईनरबरोबर संपर्कात असणं, त्यांनी केलेलं डिझाईन समजून घेणं मात्र आवश्‍यक असतं.

 

अरविंद यांनी या क्षेत्रात कंत्राटदार म्हणूनच आपलं काम सुरू केलं. पण बदलत्या काळाच्या मागणीनुसार शोभिवंत दिव्यांच्या फिटिंग्जच्या कामाची जोडही त्यांनी आपल्या मूळ उद्योगाला दिली. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदविका पूर्ण केल्यानंतर सुरवातीला चार वर्षे एका राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी केली. पण ज्याला भविष्यात मरण नाही असा काहीतरी वेगळ्या प्रकारचा व्यवसाय करावा असं त्यांच्या मनात होतं आणि यासाठी घरच्यांचाही पूर्ण पाठींबा होता. म्हणून पदविका झाल्यानंतर सरकारी लायसन्स मिळण्यासाठी द्यावी लागणारी कॉम्पिटन्स परीक्षा आधी त्यांनी दिली. १९८६ पासून ‘अरविंद इलेक्ट्रिकल्स’ या नावाने मान्यताप्राप्त इलेक्ट्रिकल कंत्राटदार म्हणून काम सुरू केले. विदेशी चलन विनिमय शाखा, बँक ऑफ महाराष्ट्र येथील पहिले काम त्यांना मिळाले. हा त्यांचा प्रवास आजतागायत सुरू आहे. इलेक्ट्रिकल कंत्राटदार म्हणून ४० कामगारांना त्यांनी स्वयंरोजगार उपलब्ध करू दिला आहे.

 

अरविंद यांच्या कामाचं वैशिष्ट्य म्हणजे बांधकामासाठी लागणारे वीजमीटर घेण्यासाठी महावितरण विभागाकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे; तसेच मीटर मिळण्यासाठी आवश्‍यक सर्व प्रक्रिया पूर्ण करणे व सर्व इलेक्ट्रिकल काम घेणे ही आहे. अनेक मोठ्या मोठ्या बांधकाम प्रकल्पांचे इलेक्ट्रिकल काम त्यांनी आत्तापर्यंत पूर्ण केले आहे. या क्षेत्रातील अनेक आव्हानात्मक कामे त्यांनी घेतली व ती ठरलेल्या वेळात पूर्ण केल्याने त्यांचे नाव विश्वासाने घेतले जाते.

 

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तसंच कुंमटा, बेळगाव, खानिवडे, तामलवाडी, तुळजापूर, नवसारी इ. ठिकाणच्या टोल नाक्यांचे इलेक्ट्रिकल काम त्यांनी केले आहे. चिपळूणच्या लोटे परशुराम येथील वैद्यकीय महाविद्यालय, कारवार येथील भारतीय नौदलाची प्रशासकीय इमारत, पुण्यातील रूबी हॉस्पीटल शेजारील मिलेनिअम स्टार ही इमारत म्हणजे अरविंद इलेक्ट्रिकल्सच्या खात्रीशीर कामांचे उदाहरण आहे. ९३ एव्हेन्यू हा मॉल अरविंद यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाला. पुण्यातील परांजपे बिल्डर्स, मित्तल ग्रुप, रविराज ग्रुप, सुयोग ग्रुप इ. अनेक नामावंत बांधकाम व्यावसायिकांचे बांधकाम प्रकल्प अरविंद यांनी केले आहेत. याशिवाय अनेक वैयक्तिक बांधकाम प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत.

 

एका वेळी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम असतानाही ते सुरळीत आणि वेळेत पूर्ण करणे हेही त्यांच्या कामाचे आणखी एक वैशिष्ट्‌य आहे. ‘घेतलेले काम वेळेत पूर्ण केल्याने, ग्राहकाचा विश्वास संपादन करण्याने काम कधीही कमी पडत नाही’, हा मूलमंत्र त्यांच्या आईने सुरवातीच्या काळात दिल्याने व्यवसायाची घडी व्यवस्थित बसवता आली. अर्थात अरविंदही तो मंत्र इमानेइतबारे पाळत आहेत. सचोटीने काम करण्याची वृत्ती, अखंड आणि अपरिमित कष्ट, पालकांचे आशीर्वाद यांमुळे मोठ्या मोठ्या प्रकल्पांचे काम अरविंद इलेक्ट्रिकल्स यांनी पूर्ण केले आहे. शिवाय समाजाने आपल्याला मोठे केले आहे त्यामुळे आपण समाजाचे देणेकरी आहोत या भावनेतून मिळाणाऱ्या नफ्यातील काही रक्कम नियमितपणे ते सामाजिक संस्थांना देणगी म्हणून देतात. 

 

हल्लीच्या काळात भिंतीच्या आतून कन्सील्ड वायरिंग घेण्याची पद्धत आहे. त्यामुळे इमारतीची पार्किंगची जागा असेल तर तेथून इलेक्ट्रिकल कंत्राटदाराच्या कामाला सुरुवात होते. यात बांधकाम व्यावसायिकांच्या गरजेप्रमाणे इलेक्ट्रिकल कन्सल्टंट वायरिंगचे डिझाईन करून देतात. त्याप्रमाणे काम करणे ही इलेक्ट्रिकल कंत्राटदाराची जबाबदारी असते. बांधकाम प्रकल्पांमध्ये इलेक्ट्रीकल काम करणाऱ्या सर्व कामगारांचा विमा इलेक्ट्रिकल कंत्राटदारांकडून उतरवला जातो. ज्या ठिकाणी काम करायचे आहे त्या ठिकाणचे क्षेत्रफळ, कामाची पद्धत, लागणारा कामगार वर्ग इ. अनेक गोष्टींवरून या कामाचे पैसे ठरले जातात. रहिवासी बांधकाम प्रकल्पांमध्ये साधारण नफ्याचे प्रमाण हे १२ ते १५ % आहे.

 

नवीन लोकांनी काम मिळवताना वेगवेगळ्या बांधकाम व्यावसायिकांना जाऊन भेटणे, स्वतःच्या ओळखींचा वापर करून काम मिळवणे या गोष्टी करणे आवश्‍यक असते. या क्षेत्रात कामांतून काम मिळत जाते. त्यामुळे स्वत:ची विश्वासार्हता तयार करणे व ती टिकवणे महत्त्वाचे असते. एकदा ग्राहकवर्ग तयार झाला की या क्षेत्रात कामाला मरण नाही. मात्र या क्षेत्रात काम करायचे असल्यास वेळेची मर्यादा, सचोटी आणि प्रामाणिकपणे सेवा देणे आवश्‍यक असते. अनेक वेळा वैयक्तिक कामे सोडून व्यवसायासाठी परिश्रम घ्यावे लागतात. या शिवाय एखादा गृहप्रकल्प पूर्ण केला की बांधकाम व्यावसायिकांकडून ठराविक काळासाठी काम केलेल्या ठिकाणचा मेंटेनन्स करण्याची जबाबदारी दिली जाते. या काळाला डी.एल.पी. (डीफेक्ट लायबलीटी पीरियड) म्हणतात. साधारणपणे हा काळ सहा महिन्यांचा असतो. गृह प्रकल्पांना वेळ जास्त लागतो. तर नफा कमी असते. औद्योगिक प्रकल्पांचे याच्या उलट असते. वेळ कमी लागतो पण नफा जास्त असतो. 

 

या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या लोकांसाठी अरविंद सांगतात, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण झालेल्या कोणालाही लायसन्स मिळते. इतर शाखेतून इंजिनिअरिंग झालेल्यांनाही मिळते. परंतु नियमांनुसार त्यासाठी कोणत्याही परवानाधारक कंत्राटदाराकडे काही वर्षांचा अनुभव घेणे गरजेचे असते. लायसन्स नसताना कंत्राटदार म्हणून काम करणे हे नियमबाह्य आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण असतानाही या कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्यांनतर काम सुरु करता येते. 

 

कोणताही व्यवसाय घेतला तरी यात सुरुवातीला गुंतवणूक करावी लागते. या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या लोकांकडे व्यावसायिक जागा असणे गरजेचे नसते. परंतु इतर साधनसामग्री, उपकरणे, यंत्रे यासाठी कमीतकमी एक ते दीड लाख रुपयांची आवश्‍यकता असते. पूर्वी ग्राहकही आगाऊ रक्कम देत परंतु आता परीस्थिती वेगळी आहे. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात खेळते भांडवल असणे आवश्‍यक असते. 

 

काळाप्रमाणे या क्षेत्रात अमूलाग्र बदल झाले. नवीन नवीन उपशाखा विकसित झाल्या. रहिवासी प्रकल्पाच्या इलेक्ट्रिकल कामाबरोबरच औद्योगिक प्रकल्प करणे, होम ऑटोमेशनचे कंट्रोल पॅनेल तयार करणे तसेच एखाद्या इंटेरीअर डिझाईनर बरोबर संलग्न पद्धतीने घरांचे इलेक्ट्रीकल काम करणे, सोलर विद्युतनिर्मिती, त्यासाठी लागणारे इलेक्ट्रीकल काम, सोलरमधून तयार झालेली वीज साठवून ठेवणे इ. शाखा तयार झाल्या आहेत. शिवाय महावितरण विभागाबोबर संलग्न होऊन या क्षेत्रात काम करता येते. नवीन लोकांना निविदा भरणे, त्यातून काम मिळवणे याचा अनुभव नसतो. त्यामुळे सुरुवातीला छोट्या प्रमाणात काम घेऊन कामाचा आवाका वाढवता येतो. याशिवाय औद्योगिक प्रकल्पांच्या कंट्रोल पॅनेलची निर्मिती करणे ही वेगळी शाखा आहे. ज्याला सध्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

 

या क्षेत्रात भांडवलाची गुंतवणूक खूप मोठ्या प्रमाणात लागते. शिवाय कमीतकमी ५००० चौ. फुट जागा लागते. हे कंट्रोल पॅनेल साखर कारखाने, इतर मोठ्या प्रमाणात यंत्रांवर काम होत असलेल्या व्यवसायांना लागतात. नवीन लोकांनी या क्षेत्रात उतरताना ज्यांच्याकडे भांडवलाची समस्या नाही अशांनी या शाखेचा विचार नक्कीच केला पाहिजे. हे लोकांना सेवा देण्याचे क्षेत्र आहे. त्यामुळे कायम तत्पर आणि आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक असणे आवश्‍यक असते. कष्ट करण्याची तयारी, तांत्रिक कौशल्य, जिद्दीने काम पूर्ण करण्याची मानसिकता आणि सचोटी हे गुण असलेल्या लोकांना या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. कोणताही दिवस उजाडला तरी वीज नाही त्यामुळे काम नाही असे होत नाही. या कामाला कधीच अंत नाही. शिवाय लोकांचे घर आणि ओघाने मन प्रसन्न करणाऱ्या या क्षेत्रात नवीन लोकांचे स्वागत आहे. 

 

घरांमध्ये आकर्षक लाईटिंग करून देण्याबरोबरच ऑफिसेस, व्यावसायिक जागा, समारंभांच्या जागा, विवाहसोहळे, सार्वजनिक गणपती उत्सवासारखे सण, सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक ठिकाणी लाईट व्यवस्था करण्याचं काम इलेक्ट्रिकल क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मिळू शकतं.

 

– सानिका घळसासी

ghalsasi.sanika@gmail.com

एकाच शेतजमिनीवर वेगवेगळे थर लावून अनेक मजल्यांवर शेती करण्याला हायड्रोपो...

नोकरी करतानाच आजूबाजूच्या कंपन्यांचा अभ्यास केला आणि मालाची विक्रीही  एक...

आय.टी. इंडस्ट्रीमध्ये चित्रपटसृष्टीप्रमाणे अनेकांना हिरो व्हायचे असते, ग्...

विजय माने या चाळीशीतल्या तरुणानं 2017 साली आपल्या दोन सहकार्‍यांसमवेत मुंबईत...

‘छत्रपती शिवाजी महाराज’ हा महाराष्ट्रातील सर्वांच्याच अभिमानाचा विषय आहे...