कंपन्यांना तळागाळातून वर काढणारी 7 सूत्र

कंपन्यांना तळागाळातून वर काढणारी 7 सूत्र

गुगल, नासा, कोकाकोला, युनिलिव्हर आणि टोयोटा या कंपन्या आपल्याकडच्या निवड भरतीत किंवा एखादी समस्या सोडवताना एखादं खेळणं वापरत असतील हे अशक्य कोटीतलं वाटतं ना? पण कंपनीची धोरणं, कंपन्यांमधल्या लोकांचा एकमेकांशी सुसंवाद वाढवणं आणि कल्पकता जोपासणं यासाठीही काही कंपन्या हेच खेळणं वापरतात. केंब्रिज विद्यापीठाने या खेळण्याचा कोणकोणत्या प्रकारे वापर करता येईल याचा अभ्यास करणारा प्राध्यापक शोधण्यासाठी चक्क शोधमोहीम राबवली होती. तो प्राध्यापक ६१ लाख डॉलर्सच्या देणगीतून या विषयावरचा संशोधन विभाग चालवणार होता. खेळण्यातल्या विटांच्या जिवावर जगावर राज्य करणारी ही डेन्मार्कमधली ८७ वर्षं जुनी कंपनी म्हणजे लीगो!

 

डेन्मार्कची अर्थव्यवस्था लीगोच्या विटांच्या निर्यातीवर सर्वांत जास्त प्रमाणात अवलंबून आहे. लीगो कंपनीत दर मिनिटाला ३६००० एलिमेंट्​सचं उत्पादन होतं.

 

लीगो कंपनी सुरू झाली तेव्हा बिलुंड हे एक लहानसं खेडं होतं. ओले कर्क ख्रिश्चियानसेन हा तिथे राहणारा साधासुधा पण महत्वाकांक्षी सुतार होता. १९१६ साली त्याने घराच्याच खालच्या मजल्यावर स्वत:चं फर्निचरचं दुकान सुरू केलं. त्या दुकानात शिड्या आणि इस्त्रीची टेबल्स तयार होत होती. १९२४ साली ओलेच्या मुलाच्या हलगर्जीपणाने दुकानाला आग लागली. त्या आगीत घर आणि दुकान जळून खाक झालं. दुसरं कोणी असतं तर दैवाला दोष देत रडत बसलं असतं; पण ओलेला आधी होतं त्यापेक्षा मोठं दुकान बांधायला आगीचं निमित्त सापडलं. हे दुकान चालायला लागलं तोच १९२९ साली अमेरिकेत स्टॉक मार्केट कोसळल्यामुळे सारं जगच आर्थिक मंदीत अडकलं. १९३२ साली ख्रिश्चियानसेनची बायको मरण पावली. त्या दरम्यान ओलेला महिन्याचा खर्च भागवणं मुष्किल झालं आणि अनेक कर्मचाऱ्यांना काढून टाकावं लागलं. 

 

याच वेळी मोठ्या वस्तू सोडून उत्पादनखर्च कमीत कमी येईल अशा छोट्या लाकडी वस्तूंचं उत्पादन करण्याचा निर्णय ओलेने घेतला. स्वस्त दरांतली खेळणी हा पर्याय त्याने निवडला. ही खेळणी बनवताना त्याने उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत मात्र अजिबात तडतोड केली नाही. थोड्याच काळात त्याने बनवलेल्या लाकडी मोटारगाड्या, प्राणी यांच्या प्रतिकृती देशभरात लोकप्रिय झाल्या. दोरीनं ओढल्यावर चोचीची उघडमिट करणारं उघडणारं लाकडी बदक हे त्याचं बेस्टसेलर होतं. 

 

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात १९४२ साली जर्मनीने डेन्मार्क ताब्यात घेतलं. याच सुमारास परत एकदा ओलेचा कारखाना आगीत जळाला. तोपर्यंत तो अशा संकटांना चांगलाच सरावला होता. त्यामुळे दुसरं महायुद्ध संपल्यावर त्याने लाकडाऐवजी प्लॅस्टिक हा पर्याय खेळण्यांच्या उत्पादनासाठी वापरायचं ठरवलं.

 

तोपर्यंत प्लॅस्टिक इंजेक्शन मोल्डिंग यंत्रं बाजारात आली होती; पण डेन्मार्कमध्ये १९४७ सालापर्यंत या यंत्रांवरच्या उत्पादनांच्या व्यावसायिक वापरावर बंदी घातली होती. १९४७ साली या यंत्राद्वारे बनवलेली खेळणी विकायला ओलेला परवानगी मिळाली. किडिक्राफ्ट या ब्रिटिश कंपनीने काढलेल्या एकमेकांत अडकणाऱ्या विटेवरून ओलेने लीगो ब्रिकची प्रेरणा घेतली. ओले आणि त्याचा मुलगा गॉडफ्रेड यांनी ब्रिटिश डिझाइनमध्ये दुरुस्त्या केल्या आणि १९४९ साली लीगोच्या प्लॅस्टिकच्या विटा विकायला सुरुवात केली. १९४९ पर्यंत कंपनीने आॉटोमेटिक बाइंडिंग ब्लॉक हे उत्पादन विकायला सुरुवात केली. आजच्या लीगो ब्रिकशी ते खेळणं बरंचसं मिळतंजुळतं होतं. लीगोची लोकप्रियता पुढच्या काही वर्षांमध्ये वाढत गेली.

 

ओले १९५२ साली मरण पावला. गॉडफ्रेड तेव्हा संचालक झाला. पण पाच वर्षांनंतर लीगो परत एकदा भयंकर आगीला सामोरी गेली. तेव्हा कंपनीतलं लाकूड पूर्णच जळाल्यामुळे यानंतर त्याने फक्त प्लॅस्टिकचा वापर सुरू केला. यानंतरच्या काळात लीगोने अनेक प्रकारची उत्पादनं बनवली; पण त्यात लीगो ब्रिक हा महत्त्वाचा भाग कायम होता. लीगोचा सेल १९७८ ते १९९३ या १५ वर्षांत दरवर्षी १४ टक्क्यांनी वाढत होता. कंपनीचे जगभरात मिळून ५००० कर्मचारी झाले होते. 

 

मात्र, याच काळात लीगोची परीकथा संपुष्टात येण्याची चिन्हं दिसायला लागली होती. एक तर लीगोच्या उत्पादनांची विक्री वाढवण्याची क्षमता संपत गेली. नवीन प्रकारच्या उत्पादनांची गरज ओळखून १९९४ ते १९९८ या काळात लीगोने दरवर्षी ५ या दराने उत्पादनं वाढवली. त्यातून कर्मचाऱ्यांचं काम वाढलं, उत्पादन वाढलं पण विक्री मात्र वाढली नाही. लीगोने काढलेल्या बार्बीसारख्या स्काला बाहुल्या, सायबरमास्टर नावाचा रोबोटिक किट अशी उत्पादनं बाजारात धडाधड कोसळली. 

 

याचा परिणाम म्हणून १९९८ साली लीगोला ४.८ कोटी डॉलर्सचा तोटा झाला. लीगोच्या इतिहासात तो सर्वांत पहिला तोटा होता. १००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना तेव्हा आपली नोकरीही गमवावी लागली. याची कारणं म्हणजे बदलत्या जगाकडे लीगोने केलेली डोळेझाक. लीगोच्या विटा वापरून कल्पकपणे वस्तू तयार करणारी मध्यमवर्गीय मुलं या काळात स्पर्धेच्या भयानक वेगात अडकली. त्यांच्या दिवसभराच्या शिस्तशीर वेळापत्रकात कल्पकतेने तासन्​तास खेळायचे खेळ या गोष्टीला थाराच उरला नव्हता. वेगवान जगात पटकन काही तरी करून चटकन कौतुक मिळवण्याला महत्त्व आलं. लीगो वापरून एखादी इमारत सावकाशपणे तयार करून मग शाबासकीची थाप मिळवण्याचं कौतुक मुलांच्या आईवडिलांनाच उरलं नसल्यामुळे मुलांनाही उरलं नव्हतंच. बाजारपेठेतही भराभर सतत बदलती उत्पादनं विकायची स्पर्धा होती. लीगोचा एकच किट विकून वर्षानुवर्षं तो वापरणाऱ्या मुलांकडून अर्थकारणाला चालना मिळणं शक्य नव्हतं. 

 

तोपर्यंत ओलेचा नातू जेल्ड हा लीगोची धुरा सांभाळायला लागला होता. १९९८ च्या ऑक्टोबरमध्ये पॉल प्लॉवमन याला जेल्डने कंपनीत आणलं. ‘कंपन्यांना तळागाळातून वर काढणारा टर्नअरांऊंड सीईओ’ असाच त्याचा दबदबा होता. बँग अँड ओलुफसेन या डॅनिश इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला गर्तेतून वर काढल्याने माध्यमं पॉलला मिरॅकल मॅन म्हणत. जेल्डने तेव्हा आपलं अध्यक्ष हे स्थान राखलं पण पॉलच्या हातात बरेच अधिकार सोपवले. 

 

पॉलने कंपनीला वर काढण्यासाठी वैविध्यपूर्ण आणि कल्पक लोकांना कामावर घेणं, ब्लू ओशन स्ट्रॅटेजी राबवणं, ग्राहकाभिमुख होणं, डिस्​रप्टिव्ह इनोव्हेशन जोपासणं, कंपनीच्या बाहेरच्या लोकांचं इनोव्हेशन स्वीकारणं, सर्व पातळ्यांवरचं इनोव्हेशन कंपनीत वापरणं… एकूणच, कंपनीत इनोव्हेशन संस्कृती राबवणं, ही व्यवस्थापनातली सात सूत्रं मांडली. त्याला सर्व बाबतींत यश आलं नसलं, तरी पॉल, जेल्ड आणि वेळोवेळी आलेले इतर अधिकारी यांनी मिळून या सात सूत्रांच्या आधारावर लीगोचं बाजारातलं स्थान आजतागायत अबाधित राखलं आहे. 

 

पॉल कंपनीत दाखल झाला तेव्हा लीगोमध्ये वैविध्यपूर्ण विचार करणाऱ्या लोकांचा पूर्णत: अभाव होता. एक तर बहुतेक कर्मचारी पुरुष होते. त्यातले अनेक अधिकारी वयस्कर होते. त्या सगळ्यांना कसलीच घाई नव्हती आणि वीस वर्षं एकाच कंपनीत काम करून त्यांच्या विचारांची दिशा साचेबंद झाली होती. आपण करू ते बाजारात चालेल अशी त्यांची खात्री होती. 

 

मग विविध प्रकारचं टॅलेंट हे पहिलं सूत्र म्हणून या काळात लीगोने झोई एंटरटेनमेंट ही कंपनी विकत घेतली. झोईकडच्या तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक खेळण्यांचा अभ्यास केला. त्यामुळे सिलिकॉन व्हॅलीत काय चाललंय याचा लीगोमधल्या अधिकाऱ्यांना अंदाज यायला लागला. तसंच त्यांनी डेन्मार्क या देशाबाहेरचं टॅलेंट शोधायला सुरुवात केली. टोकियो, बार्सिलोना, म्युनिक, लॉस एंजेलिस अशा विविध ठिकाणी स्थानिक डिझायनर्स नेमले. 

 

दुसरं सूत्र होतं ब्लू ओशन स्ट्रॅटेजी. जिथे स्पर्धा असेल ते उत्पादन टाळून नवीन उत्पादन निर्माण करणं व त्या उत्पादनाला स्वतंत्र बाजारपेठ मिळवणं याला ब्लू ओशन स्ट्रॅटेजी म्हटलं जातं. यासाठी लीगोने फक्त खेळण्यांचं उत्पादन हे क्षेत्र तसंच ठेवून शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश केला. शाळा सुटल्यानंतर घरी आल्यावर मुलांनी अजून काही तरी शिकणं ही संकल्पना तेव्हा जगातल्या विविध देशांमध्ये सुरू झाली होती. मग लीगोने लर्निंग टूल या कोरियन कंपनीबरोबर हातमिळवणी केली. या कंपनीच्या प्रशिक्षण कार्यक्रमांसोबत लीगोच्या विटांच्या साहाय्याने विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनियरिंग आणि गणित हे विषय मुलांना शिकवणं, अशा सेवा लीगो पुरवणार होतं. उदाहरणार्थ, मुलांना लीगो गिअर्समधून रेशो शिकवले जायचे. या काळात लर्निंग टूलसाठी अभ्यासक्रम ठरवणं, शिक्षकांना प्रशिक्षण देणं, शिक्षणासाठी स्पेशल किट्​सचं उत्पादन काढणं असे प्रयोग लीगोने केले. एका वर्षात कोरियामध्ये १४० लीगो एज्युकेशन सेंटर्स उभी राहिली.

 

ग्राहकाभिमुखता हे तिसरं सूत्र वापरताना लीगोने इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारपेठेकडे आपलं लक्ष वळवलं. पाश्चिमात्य देशांतली दोन-तीन मुलं इलेक्ट्रॉनिक्सकडे वळल्याने पारंपरिक खेळणी नाकारत चालली आहेत असं सर्वेक्षण सांगत होतंच. या सुमारास लीगोच्या बाबतीतली महत्त्वाची घटना म्हणजे स्टार वॉर्स या मालिकेतल्या ॲक्शन फिगर्स तयार करणं. जॉर्ज ल्युकास या स्टार वॉर्सच्या निर्मात्याची ल्युकास फिल्म्स ही कंपनी. तिथल्या सर्वांना लीगोच्या विटा आवडत होत्या. अमेरिकेत तेव्हा चित्रपट आणि टीव्ही कार्टून मालिका यांच्या व्यक्तिरेखांचं लायसेन्स घेऊन अनेक उत्पादनं निघत होती. जेल्ड हा स्वत: स्टार वॉर्सचा जबरदस्त फॅन होता. लीगोतल्या इतर अधिकाऱ्यांना स्टार वॉर्स ही त्यातल्या हिंसेमुळे मान्य नव्हती; पण जेल्डने आपला अधिकार वापरून ल्युकास फिल्म्सबरोबर करार केला. लीगो स्टार वॉर्स मालिकेने लीगोचा खप ५०० टक्क्यांनी वाढला. 

 

नंतर लीगो हॅरी पॉटरही जन्माला आला. लष्करी पोशाख असलेला अमेरिकन जॅक स्टोन तयार केला गेला. या सगळ्यातून काही तरी बांधण्यापेक्षा या फिगर्स घेऊन एकमेकांत खेळणं मुलांना सहज शक्य होतं. याच काळात लीगोने जे उत्पादन काढलं ते म्हणजे लीगो बीइंग्ज. या किटमध्ये सुरवंटाचं शरीर, बदकासारखे पाय, एलियनचं डोकं अशा व्यक्तिरेखा मुलांना तयार करता येणार होत्या. या किटमध्ये काय आणि कसं करावं याच्या सूचना नव्हत्या. मुलांच्या कल्पनाशक्तीला त्यात भरपूर वाव होता. तसंच एका एका किटमधले भाग दुसऱ्या किटमधल्या भागांना बसायचे. या सगळ्यात लीगो ब्रिक मात्र नव्हत्या. 

 

चौथं डिस्​रप्टिव्ह इनोव्हेशन हे सूत्र इनोव्हेटर्स डायलेम्मा या पुस्तकात क्लेटन ख्रिस्टिसन याने प्रथम मांडलं होतं. एखादं कमी किमतीचं आणि त्या काळात फारशी मागणी नसलेलं उत्पादन बाजारात आणायचं. ते उत्पादन सावकाशपणे बाजारपेठ काबीज करतं. याला डिस्​रप्टिव्ह इनोव्हेशन म्हणलं जातं. डिजिटल फोटोग्राफी हे याचं उत्तम उदाहरण आहे. 

 

या सूत्रावर आधारित असलेल्या लीगोच्या डार्विनच्या जन्माची एक कथाच आहे. १९९४ च्या हिवाळ्यात एक स्विस माणूस अचानक जेल्डशी बोलायचं आहे असं सांगत लीगोमध्ये दाखल झाला. खांद्यापर्यंतचे केस, छातीपर्यंत रुळणारी दाढी, अस्ताव्यस्त पेहराव असलेल्या त्या डाँडी नामक माणसाने सोबत चार मिनिटांची व्हिडिओ क्लिप आणली होती. त्यात लीगोपासून बनवलेली अंतराळयानं गगनात विहरताना दिसत होती. या क्लिपमधलं ३-डी मॉडेलिंग अफाट होतं. लीगोच्या ब्रिक्सला डिजिटल बनवायचं डाँडीचं स्वप्न होतं. ब्रिक्स, चाकं, रॉड्​स, गिअर्स असा डेटाबेस बनवून डिजिटल आकृत्या तयार करणं आणि त्या कार्टून्स, फिल्म्स, टीव्हीवरच्या जाहिरातींमध्ये वापरणं, अशी योजना त्यातून साकार झाली. या डार्विन नावाच्या प्रकल्पाने कम्प्युटर ॲनिमेशनची बाजारपेठ लीगोला खुली झाली. यानंतर त्या विषयातल्या १२० तज्ज्ञांची टीम कामाला लागली. सिलिकॉन ग्राफिक्स सुपरकॉम्प्युटर्समध्ये तेव्हा लीगोला भरघोस गुंतवणूक करावी लागली. पण डार्विनने लीगोला प्रचंड नफा कमावून दिला. 

 

कंपनीच्या बाहेरच्या लोकांचं इनोव्हेशन स्वीकारणं, या पाचव्या सूत्राबद्दल लीगो कमालीची साशंक होती. आभासी जगातून आलेलं इनोव्हेशन मान्य करणं हे आपल्या इंटलेक्चुअल प्रॉपर्टीच्या हक्कांबद्दल कमालीच्या जागरूक असलेल्या लीगोला अशक्य वाटत होतं. तोपर्यंत आपले फॅन्स फक्त ग्राहक आहेत असं लीगो मानत होती. पण १९९५ पर्यंत एलयूजीनेट डॉट कॉमसारख्या वेबसाइट्​स तयार झाल्या होत्या. जगभरातले लीगोप्रेमी तिथे एकमेकांशी जोडले गेले होते. लीगोच्या विटांबद्दल चर्चा करत होते. त्यांनी केलेली मॉडेल्स ते एकमेकांना दाखवू शकत होते. त्यांच्या मॉडेल्सवरून त्यांनी केलेल्या डिझाइन्सचा विचार करण्याची गरज लीगोला जाणवली. २००० सालापर्यंत लीगोने एक स्वतंत्र विभाग यासाठी तयार केला. या विभागाद्वारे व्हर्च्युअल ३-डी ब्रिक्समधून लोकांनी तयार केलेलं मॉडेल लीगो बनवायची. ते मॉडेल लीगोच्या वेबसाइटवर तर झळकायचंच, पण ज्याने ते मांडलं असेल त्याला प्रत्यक्ष उत्पादन केलेलं मॉडेलही लीगो पाठवायची. याचं उदाहरण म्हणजे लीगो ब्लॅकस्मिथ शॉप हे मॉडेल लीगोचा फॅन डॅनियल सिसकिंड याने तयार केलं. २००३ साली लीगोने त्याचा सेट बनवला आणि त्याला पाठवला. ६२२ तुकड्यांचा तो पहिला फॅन डिझाइन सेट ३९.९९ डॉलर्सचा होता. नंतर त्याचं लायसेन्सही लीगोने घेतलं.

 

सर्व पातळ्यांवरचं इनोव्हेशन कंपनीत वापरणं, या सहाव्या सूत्राद्वारे लीगोने गॅलिडर : डिफेंडर्स ऑफ द आउटर डायमेन्शन ही चक्क टीव्ही मालिकाच काढली. लीगोने तेव्हा गॅलिडर या नवीन किटमध्ये सायफाय विश्वातले हीरो, खलनायक, रोबोट अशा ॲक्शन फिगर्स घातल्या होत्या. टाचण्या आणि छिद्रं यातून हे भाग मुलांना जोडता येत होते. हा किट लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मालिकांच्या मधल्या वेळात जाहिराती करण्याऐवजी लीगोने थॉमस लिंच याला त्या नावाची टीव्ही मालिकाच काढायला सांगितलं. गॅलिडर तेव्हा व्हिडिओ गेम्समध्येही पोचला होता आणि मॅकडोनाल्ड्​सच्या हॅपी मील्सबरोबर मुलांना जी चिमुकली खेळणी दिली जातात त्यातही होता. याच काळात लीगोलँड थीम पार्क्स आणि लीगोची दुकानं निघाली. आता बिलुंडमधल्या लीगोलँडला दरवर्षी १५ लाख पर्यटक भेट देतात. लंडन, कॅलिफोर्निया, म्युनिक अशा सर्व ठिकाणी लीगोलँड लोकप्रिय झाली आहेत. 

 

एकूणच, कंपनीत इनोव्हेशन संस्कृती राबवणं, हे सातवं सूत्र सांभाळताना लीगोने अनेक डिझायनर्सना जगातल्या महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्त केलं आहे. लीगोमध्ये जो कोणी आऊटसाइड बॉक्स थिंकिंग करेल त्याला प्राधान्य मिळतं. त्यामुळेच ७५७ कोटी डॉलर्स मूल्य असलेली लीगो आज खेळण्यांच्या उत्पादनाच्या दुनियेत जगात पहिल्या स्थानावर आहे. ॲनिमेटेड टेलिव्हिजन मालिका, चित्रपट, रोबोटिक्स शिकवणारा शैक्षणिक कार्यक्रम, पारितोषिकविजेती व्हिडिओ गेम्सची मालिका, हजारो पुस्तकं, मासिकं, कॉमिक्स, उद्योगधंद्यांसाठी टीमवर्क शिकवणारे कार्यक्रम, कपडे बनवणारे कारखाने असे अनेक उद्योग लीगो करत असते.

 

ङशस सेवीं.. म्हणजे प्ले वेल असं नाव असलेल्या लीगोने आपली कंपनी म्हणजे बच्चोंका खेल नहीं है हे समर्थपणे दाखवून दिलंय. 

 

संदर्भ : 

ब्रिक बाय ब्रिक- डेव्हिड रॉबर्टसन

१. लीगो अँड फिलॉसॉफी : Roy T. Cook / Sondra Bacharach

 

– नीलांबरी जोशी

इंटरनेट ही गोष्ट आता सगळ्यांच्याच आयुष्यात अपरिहार्य बनत चालली आहे. उद्योग...

मायकेल कॉलेजमध्ये असताना त्याला संगीताची खूप आवड होती. पदवी मिळाल्यानंतर त...

  आपली दोन पावलं सारख्याच लांबी-रुंदीची असतात असं आपल्यापैकी अनेकजणांना ...

  उद्योग, व्यवसाय हा कोणत्याही उत्पादनाचा अथवा सेवेचा असला तरी मार्केटिं...

  स्टीफनने माझ्या शेजाऱ्याच्या घराला रंग देण्याचं काम उत्कृष्ट केलं. त्य...