कापड व्यवसायातील उद्योगसंधी

कापड व्यवसायातील उद्योगसंधी

 

कापड उद्योग हा जगभरातला एक महत्त्वाचा उद्योग आहे. एक तयार कपडा आपण परिधान करतो तेव्हा त्याच्यामागे जवळपास चाळीस वेगवेगळ्या प्रक्रिया घडलेल्या असतात. त्या चाळीस प्रक्रियांपैंकी अनेक प्रक्रियांचे स्वतंत्र उद्योग होऊ शकतात. मी आज याच उद्योगसंधींबद्दल सांगणार आहे. पण ते सांगण्यापूर्वी थोडा माझ्या उद्योगाचा इतिहास तुम्हाला सांगतो.   

 

किर्लोस्कर समुहासारख्या प्रतिष्ठित कंपनीमध्ये जनरल मॅनेजर या पदावर काम करत असतानाच वयाच्या चाळीसाव्या वर्षी मी नोकरीचा राजीनामा दिला. आपण स्वतंत्र उद्योग करावा असे विचार माझ्या मनात अनेक वर्षं पिंगा घालत होते. पण कोणता उद्योग सुरू करायचा हे मात्र ठरत नव्हतं. माझ्यासमोर दोन मार्ग होते. पहिला अगदी सहज आणि सोपा होता. तो म्हणजे जे कॉम्प्रेसर मी किर्लोस्करमध्ये विकत होतो त्याची डिलरशिप घ्यायची किंवा कॉम्प्रेसर बनवण्याची स्वत:ची फॅक्टरी सुरू करायची. या व्यवसायातले सर्व बारकावे माहिती असल्यामुळे फारशा अडचणी येण्याची शक्यता नव्हती.       

 

दुसरा मार्ग मात्र संपूर्णपणे नवीन आणि अनोळखी असा होता. तो होता कॉटनच्या तयार कपड्यांची विक्री करण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा. मला कॉटनच्या कपड्यांचं अतोनात वेड होतं आणि अजूनही आहे. त्या काळात शंभर टक्के कॉटनचे शर्टस फार कमी दुकानांमध्ये मिळायचे. त्यात रंगांचं, डिझाईन्सचं वैविध्य फारसं मिळायचं नाही. कामाच्या निमित्ताने अथवा अन्य काही कारणाने मी जाईन त्या गावात अशी दुकानं शोधून तिथून कॉटनचे कपडे विकत घ्यायचो. एकदा मुंबईमध्ये ताज हॉटेलच्या मागच्या बाजूला एक दुकान मिळालं. तिथे असलेल्या कॉटनच्या कपड्यांमधलं वैविध्य पाहून मी हरखून गेलो. त्याचवेळी माझ्या मनात प्रश्‍न आला, आपली ही कॉटनची आवड जपण्यासाठी आपण इतकी पायपीट करतो. प्रत्येकाला ते शक्य नाही. आपण याचाच व्यवसाय केला तर? आणि माझा कॉटन कपड्यांचा व्यवसाय करायचा निर्णय पक्का झाला. गरज ही शोधाची जननी असते असं म्हणतात, माझ्या बाबतीत गरज ही माझ्या उद्योगाची जननी झाली. 

 

माझ्यापुढे दोन पर्याय होते. एकतर घाऊक विक्रेत्यांकडून तयार शर्ट आणून ते विकायचे. किंवा मग स्वत: शर्टचं उत्पादन आणि विक्री करायची. पहिला पर्याय माझ्यासाठी तुलनेनं सोपा होता. कारण उद्योगाची पार्श्‍वभूमी माझ्याकडे नव्हती. अर्थातच मी पहिला पर्याय निवडला. १९९६ साली पुण्यात नळ स्टॉपनजीक कॉटन किंग या नावानं पुरुषांसाठी शंभर टक्के कॉटनचे कपडे देणारं दुकान सुरु झालं. सर्व ब्रँडमधील कपड्यांची रेंज कॉटन किंगमध्ये असे. सुरुवातीपासूनच दुकानाला गिऱ्हाईकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे बरं वाटायचं. पण याचवेळी एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे अनेक कंपन्यांचा माल एकत्र ठेऊनही ग्राहकांच्या अपेक्षांना आपण पुरे पडत नाही. एखाद्या ब्रँडमध्ये ग्राहकाच्या मापाचे कपडे मिळत पण कधी त्याची स्टाइल तर कधी रंग ग्राहकाला आवडत नसे. हे बघितलं आणि स्वत: उत्पादक बनण्याचा विचार मनात डोकावायला लागला.

 

इथेही पुन्हा दोन पर्याय होते. आपल्याला हवे तसे शर्ट छोट्या उद्योजकांकडून बनवून घ्यायचे आणि आपल्या ब्रँडच्या नावाने ते विकायचे. दुसरा पर्याय होता तो स्वत:च उत्पादन करण्याचा. यावेळी मात्र मी दुसरा पर्याय निवडला. त्या दृष्टीने मग अभ्यास सुरु केला. कोणती उत्पादक कंपनी कॉटनचा किती माल बनवते, त्यामध्ये रंगांची-मापांची व्हरायटी किती असते, तो माल किती किमतीला विकला जातो, त्यासाठी कंपनीची व्यवहाराची पद्धत काय असते, ग्राहकांची पसंती कोणत्या डिझाइन्सना जास्त असते, कोणत्या मापातल्या कपड्यांना अधिक मागणी आहे, या व्यवसायामध्ये नफ्याचं प्रमाण किती आहे, मागणी आणि पुरवठा यामधलं अंतर कशा प्रकारचं आहे, इथपासून वर्षभरातले तेजीचे आणि मंदीचे सीझन्स कोणते असतात, इथपर्यंत अनेक बाबी समजून घेतल्या. ज्यांना कपड्यांचं उत्पादन स्वत: करण्याची इच्छा असेल त्यांनी हा अभ्यास करणं आवश्‍यक आहे. १९९८ साली कॉटनच्या कपड्यांच्या उत्पादनाला सुरुवात झाली. सुरुवातीला छोट्या जागेत व्यवसाय सुरु झाला. पण काहीच दिवसात बारामतीला पंचाऐंशी हजार चौरस फूट जागा घेऊन अद्ययावत पद्धतीने उत्पादनाला सुरुवात केली. 

 

हा काळ आमच्यासाठी अत्यंत धावपळीचा होता. कारण मोठ्या प्रमाणावर कापड मिळवण्यापासून ते कपड्यांची (शर्ट्‌‍स, ट्राउझर्स आणि टी-शर्ट्‌‍स) स्टाइल ठरवणं, साइझेस नक्की करणं, रंगांमध्ये वैविध्य आणणं आणि कॉटन किंगहा ब्रँड उभा करणं असं सगळं एकाच वेळेला चालू होतं. त्याचा परिणाम म्हणून पुण्यात तर सर्वदूर त्यांचं नाव झालंच, पण पुण्याबाहेरच्या शहरातही कॉटन किंगया नावाची चर्चा सुरू झाली. नुसतं उत्पादन पुरेसं नाही, तर त्याचं ब्रँडिंग कसं होईल याकडेही लक्ष देण्याची गरज असते हे या निमित्तानं मुद्दाम सांगावसं वाटतं. 

 

कॉटन किंगची पाळंमुळं हळूहळू घट्ट झाली. आता विस्तार करायचा होता तो जमिनीच्या वर वेगवेगळ्या शाखांच्या रुपांनी. केवळ कर्मचारी वाढवून व्यवसायाचा विस्तार करणं अवघड असतं. कारण कितीही प्रयत्न केले तरी एका मर्यादेपलीकडे कर्मचाऱ्यांच्या मनात आपल्या व्यवसायाविषयी आस्था निर्माण करता येत नाही. एका उद्योजकाच्या मनात आपल्या उद्योगाविषयी असणारी कळकळ, ओढ ही कर्मचाऱ्याच्या मनात असू शकत नाही. मग असा एक विचार मनात आला की आपण आपला नफा शेअर करु आणि आणखी काही उद्योजकच आपल्या या व्यवसायाशी जोडून घेऊ. विनविन सिच्युएशन तयार केली तर आणखी उद्योजक याच्याशी जोडले जातील. म्हणजेच कॉटन किंगची फ्रँचाईसी द्यायची. फ्रँचाईसी घेणाऱ्याला हा व्यवसाय प्रतिष्ठित वाटला पाहिजे, न खपलेल्या मालाचं नुकसान त्याला सोसावं लागता कामा नये अशा सगळ्या शक्यता फ्रँचाईसीचं मॉडेल तयार करताना लक्षात घेणं गरजेचं होतं.

 

कितीही छोटामोठा व्यवहार झाला तरी दोघांसाठी विनविन सिच्युएशन असेल हे या मॉडेलचं मुख्य सूत्र आहे. फ्रँचाईसी घेणाऱ्याला एक रुपयासुद्धा डिपॉझिट म्हणून कॉटन किंगकडे ठेवावा लागत नाही. त्यामुळे त्याचा पैसा अडकून राहत नाही. फ्रँचाईसी घेणारा हे ऐकूनच आधी निश्‍वास टाकतो. दुकान उभं करण्यासाठी जी गुंतवणूक करावी लागते तितकीच त्यानं करायची असते आणि ते दुकान तर त्याच्याकडेच राहणार असतं. दुकानात ठेवायचा माल त्याला पूर्ण रोखीने घ्यावा लागतो. ही जर गुंतवणूक मानली तर त्या मालाच्या विक्रीतून त्याला त्याची परतफेड मिळायलाही लगेचच सुरुवात होते. शहरी भागात सुरुवातीला साधारणपणे वीस लाख आणि ग्रामीण भागात पंधरा लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते. यात जागेचं भाडं, फर्निचर वगैरे गोष्टी आणि मालाची खरेदी यांचा समावेश असतो.

 

सुरुवातीला केलेली गुंतवणूक भरुन निघण्यासाठी वर्षाला ग्रामीण भागात किमान साठ लाख रुपयांची विक्री तर शहरी भागात किमान एक कोटी रुपयांची विक्री होणं गरजेचं असतं. हे ऐकून काहीजणांना दडपण येतं. पण कॉटन किंगच्या मॉडेलमधलं याबाबतीतलं सूत्र ऐकलं की फ्रँचाईसीच्या मनावरचा ताण एकदम हलका होतो. काय आहे ते सूत्र ? तर वर्षाला साठ लाखांपेक्षा फ्रँचाईसीचा जितका कमी व्यवसाय होईल तेवढ्याची जबाबदारी कॉटन किंग घेईल आणि साठ लाखांच्या वर जो नफा होईल तो सगळाच्या सगळा फ्रँचाईसीचा असेल. फ्रँचाईसीच्या व्यवसायातली सुरुवातीची ही मोठी जोखीमच कॉटन किंगने काढून घेतली आहे. याचा इतका सकारात्मक परिणाम फ्रँचाईसीवर होतो की साठ लाखांच्या पुढे आपला व्यवसाय होईल असं प्रत्येक फ्रँचाईसी बघतोच. आतापर्यंत कॉटन किंगवर एकाही फ्रँचाईसीला असं नुकसान भरुन देण्याची वेळ आलेली नाही ही मोठीच उल्लेखनीय बाब आहे. कॉटन किंग फ्रँचाईसी घेणाऱ्या व्यक्तीला सगळ्यात मोठा दिलासा देते. तो म्हणजे न खपलेला माल कॉटन किंग विनाअट परत घेते. एखाद्या विशिष्ट ब्रँडची फ्रँचाईसी घेणं हा या उद्योगातला एक तसा सहजसोपा प्रकार आहे. 

 

कुठल्याही ब्रँडची फ्रँचाईसी घेणं ही जशी या उद्योगात एक महत्त्वाची संधी आहे तशाच अनेक संधी वस्त्रांच्या उद्योगात आढळून येतील. कपडे बनवणाऱ्या कोणत्याही कंपनीची रिटेलरशिप घेतली तरी हा एक सतत चालू राहणारा आणि फायदेशीर उद्योग आहे. कपडे ही गोष्ट आता फक्त अन्न, वस्त्र, निवारा यातील एक गरज राहिलेली नाही. फॅशनच्या नावाखाली कपड्यांच्या बाजारात प्रचंड मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. पूर्वीच्या काळी फक्त सणावारी अथवा लग्नसराईत कपडे खरेदी केली जायची. आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. कपडेखरेदीसाठी आता निमित्त लागत नाही. कपड्यांची कितीही दुकानं असली तरी कमीच अशी परिस्थिती आहे. मात्र त्यामुळेच स्पर्धादेखील खूप आहे. त्यात टिकून रहायचं असेल तर विक्री व्यवहारात कौशल्य असायला हवं. ग्राहकाची अभिरुची, आवड, बजेट लक्षात घेतलं, ते कपडे कोण परिधान करणार आहे त्याप्रमाणे निरनिराळ्या रंगसंगतीचे, फॅशनचे कपडे दाखवले तर ग्राहक खूश होतात. विक्रीकौशल्यातील असे बारकावे अमलात आणत कपड्यांचा किरकोळ विक्रीचा व्यवसाय केला तर तो नक्कीच फायदेशीर ठरतो.

 

कारखान्यापासून वितरकापर्यंत अथवा वितरकापासून किरकोळ विक्रेत्यांपर्यंत माल पोहोचवणे हा इतर सगळ्याच उद्योगांप्रमाणे वस्त्रोद्योगातही एक मोठा पूरक उद्योग आहे. कपड्यांना नुकसान पोहोचणार नाही आणि ते वेळेत अपेक्षित ठिकाणी पोहोचतील याची काळजी मात्र घ्यायलाच हवी. ही काळजी घेतली तर लॉजिस्टिकमध्ये संधी भरपूर आहेत. मूळ कपडे उत्पादनाच्या उद्योगात तर पूरक उद्योगांच्या अनेक संधी दडलेल्या आहेत. तयार कपडे शिवण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर कापड खरेदी केलं जातं. त्यातलं काही प्रकारचं कापड हे कपडे बनवण्यापूर्वी धुवून घ्यावं लागतं. त्याची विशिष्ट अशी पद्धत असते. काही ठराविक डिटर्ज़ंट्सचा वापर त्यावेळी केला जातो. अवाढव्य अशा वॉशिंग मशीनमध्ये विशिष्ट वेळ ते धुवावं लागतं. ही सगळी पद्धत समजून घेतली तर निव्वळ फॅब्रिक धुण्याचा एक स्वतंत्र व्यवसाय होऊ शकतो. 

 

या कापडापासून जो कपडा बनवायचा असेल (शर्ट / पँट / टीशर्ट / पंजाबी ड्रेस / फ्रॉक / गाऊन आणि असे अनेक) त्याप्रमाणे तो कापून देणं याचा उद्योग होऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ १००० मीटर कापडापासून ६०० शर्ट तयार करता येतात असं आता कॉटनकिंगला अनुभवानं माहिती झालेलं आहे. हे समजून घेऊन जर कोणी त्यांना ताग्यातून तितक्या शर्टचं कटिंग करुन दिलं तर मोठी मदत मिळते. पण हे नुसतं शिवणकाम नाही. हे काम नीटपणे समजून आणि काळजीपूर्वकच करायला हवं. त्या शर्टचा साईज, फॅशन या सगळ्याचा विचार करायला हवा. प्रत्येक टप्प्यावर क्वालिटीचं महत्त्व समजूनच काम करायला हवं. कपडे शिवताना लागणारे निरनिराळ्या रंगांचे आणि दर्जांचे दोरे, धागे, बटणं, चेन्स, प्राईस टॅग्ज, लेबल्स, कॉलर आणि कफ्समध्ये घालण्यासाठी कॅनव्हास मटेरियल पुरवण्याचा एक उद्योग होऊ शकतो. तयार कपड्यांच्या पॅकिंगसाठी लागणारं सामान पुरवण्याचं काम करणं शक्य आहे. दुकानांमध्ये मिळणारे तयार कपडे बऱ्याचवेळा थोडेफार आल्टर करावे लागतात. आल्टरिंगचं काम शक्य असेल त्यांनी ते जरुर करावं. 

 

फॅशन डिझाईनर हा अलीकडे कापड उद्योगातला एक प्रतिष्ठित व्यवसाय समजला जातो. बहुतांशी वेळा सिनेमा अथवा टीव्हीवरच्या मालिकांमध्ये या फॅशन्स आधी येतात आणि मग समाजात रुळतात. पुरुषांच्या कपड्यांच्या बाबतीत त्याला तुलनेनं कमी स्कोप असला तरी महिला आणि मुलांच्या कपड्यांच्या बाबतीत या व्यवसायाला प्रचंड स्कोप आहे. ज्याच्याकडे कल्पकता आहे त्याच्यासाठी ही उत्तम उद्योगसंधी आहे.  

 

तयार कपड्यांवर एम्ब्रॉयडरी करुन देणं हा एक मोठाच व्यवसाय आहे. पुरुषांच्या कपड्यांच्या बाबतीत शर्टच्या कॉलर अथवा खिशांवर छोटी एम्ब्रॉयडरी असते, विशेषत: युनिफॉर्म्स असतील तर त्यावर कंपन्यांचे, शाळांचे लोगो असतात. मुलांच्या किंवा महिलांच्या कपडे/साड्यांच्या बाबतीत तर हे काम मोठंच असतं. कपड्यांवरचं पेंटिंग हाही मोठा उद्योग आहे. त्याचबरोबर साड्यांना, ओढण्यांना लेस लावणं, वेगवेगळ्या बॉर्डर्स, गोंडे, मोती, टिकल्या, लटकन लावून देणं, साड्यांचे फॉल-पिको करुन देणं अशी अनेक कामं असतात. नऊवारी साड्या शिवणं, साड्यांपासून ड्रेस शिवणं अशीही कामं करणं शक्य आहे. मुख्य कपड्यांसोबत लागणाऱ्या हातरुमाल, सॉक्स, टाय, स्टोल्स, ओढण्या अशा गोष्टींचं उत्पादन करणं हाही एक उद्योग आहे.

 

पूर्ण तयार झालेल्या कपड्यांचं फायनल प्रोसेसिंग करणं हेही एक काम असतं. यात पॅकिंगसाठी तयार असलेल्या कपड्यांवर काही डाग राहिलेले नाहीत ना, कुठे धागेदोरे लोंबत नाहीत ना, काजंबटणं व्यवस्थित आहेत ना हे तपासून त्यानुसार काही काम शिल्लक असेल तर ते पूर्ण करणे, कपड्यांच्या फॅब्रिकच्या प्रकारानुसार त्यांचं वॉशिंग करुन, इस्त्री करुन पॅकिंगसाठी पाठवणे. अर्थात या कामानंतरही मुख्य उत्पादकाकडे क्वालिटी कंट्रोलचं काम केलं जातंच. पण त्यापूर्वीचं हे काम करुन देणं शक्य आहे. 

 

सगळ्याच व्यवसायांप्रमाणे याही व्यवसायात ऑटोमेशन आलेलं आहे. वस्रोद्योगातील कामं सहज, सुलभ आणि तत्परेतनं होण्यासाठी तसंच गुणवत्तापूर्ण काम होण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करणं, त्यानुसार मशीन्स अथवा यंत्रसामग्री उत्पादित करणं, असलेल्या मशीन्सची नियमित देखभाल आणि दुरुस्ती करणं अशा उद्योगांचा समावेशही यात होतो. एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे यापैकी कुठलंही काम निवडलं तरी ते परिपूर्ण करण्याची धडपड असलीच पाहिजे. त्या विषयाचा पूर्ण अभ्यास असायला हवा. ग्राहकांच्या गरजा नेमकेपणानं लक्षात घ्यायला हव्यात. अन्यथा ग्राहक नाराज होतील आणि काम जाईल. ग्राहकांना सामोरं जायची तयारी असायला हवी. मी केबिनमध्ये मालकाच्या थाटात बसेन आणि होईल तसं काम होईल अशा वृत्तीनं कुठलाच उद्योग यशस्वी होणार नाही.

 

उद्योगाचं मार्केटिंग आणि जाहिराती करण्याचं काम ही एक यातली मोठी उद्योगसंधी आहे. त्यामध्ये कल्पकता आणि तंत्रज्ञान यांचा समन्वय योग्य पद्धतीनं घातला जाईल याची काळजी मात्र घ्यायला हवी. 

 

या उद्योगाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो काही फक्त शहरांतच चालणारा उद्योग आहे असं नाही. कुठल्याही गावात तो चालू शकतो. पण यातला कुठलाही पूरक उद्योग करायचा असेल तर आपले ग्राहक नेमके कुठे आहेत आणि त्यांच्यापर्यंत आपण वेळेत आणि त्यांच्या गुणवत्तेच्या स्टँडर्डनुसार माल पुरवू शकणार आहोत ना याचा अंदाज घेणं गरजेचं आहे.   

आपल्याला नेमकं काय आवडतं, आपल्याकडे कोणतं कौशल्य आहे, ते विकसित करण्यासाठी प्रशिक्षण घेण्याची तयारी आहे का, गुंतवणूक करणं शक्य आहे का, जागा किती आहे अशा अनेक गोष्टींवर उद्योग कोणता करायचा आणि तो किती वाढवायचा हे अवलंबून असतं. पण त्या सगळ्याची तयारी असेल तर वस्त्र उद्योगात अनेक उद्योगांचे धागे गुंफलेले आहेत हे नक्की.

  प्रत्येक उद्योजकाला त्याच्या उद्योगामध्ये त्याने विक्री करताना किंवा...

  “मी काय बावळट आहे का अशिक्षित आहे?” नंदिताच्या डोळ्यांत राग होता. नंदिता...

परवा माझ्याकडे एकजण आले होते. बोलता बोलता एका मोठ्या रेस्टॉरन्टबद्दल एकदम ...

उद्योग, व्यवसाय, स्टार्टअप सुरू करायचं असेल तर पहिला प्रश्न असतो तो भांडवला...

व्यवसायात अडचणी, आव्हाने येणारच नाहीत हे शक्यच नाही. पण त्या आव्हानांचा मुक...