भारताने विज्ञान, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, उद्योग, Start-up यासह अनेक क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली आहे. बेरोजगारीच्या प्रश्नावर मात्र आपल्याला समाधानकारक उत्तर अजुनही शोधता आलं नाही. भारतात दरवर्षी 1 कोटींपेक्षा जास्त रोजगारक्षम तरूणांची भर पडते. रोजगाराच्या संधी मात्र तुलनेने फारच कमी प्रमाणात निर्माण होतात. त्यामुळे देशाच्या विकासाचा वेग मंदावतो आणि समाजिक प्रश्नांची भर पडते.
पर्सिस्टंट सिस्टिम्स लिमिटेडचे संस्थापक आणि संचालक डॉ. आनंद देशपांडे यांच्या मते तरूणांनी केवळ नोकरी करणारे न होता नोकरी देणारे बनावं. उद्योग व्यवसाय वाढले तरच या समस्येची तीव्रता कमी होऊ शकेल.
हीच गरज लक्षात घेऊन डॉ. आनंद देशपांडे आणि त्यांच्या पत्नी सोनाली यांनी 2015 मध्ये deAsra फाउंडेशनची स्थापना केली. deAsra हे ना नफा तत्वावर चालणारं (Section 8) फाउंडेशन आहे.
समाजात उद्योजकता वाढावी हे deAsra फाउंडेशनचं मिशन आहे. उद्योग सुरू करणं, चालवणं आणि भरभराटीला नेणं या प्रत्येक टप्प्यावर deAsra फाउंडेशन मदत करतं. त्यासाठी deAsra फाउंडेशनने तज्ज्ञांच्या मदतीने एक खास मॉडेल तयार केलं आहे. आज देशभर deAsra फाउंडेशनच्या या मॉडेलची दखल घेतली जाते.