‘ग्लॅमर’ असलेल्या जाहीरात क्षेत्रातली नोकरी सोडली आणि कुंचलाच बनला उत्पन्नाचं साधन

‘ग्लॅमर’ असलेल्या जाहीरात क्षेत्रातली नोकरी सोडली आणि कुंचलाच बनला उत्पन्नाचं साधन

 

चित्रं, त्यातल्या आकृत्या, साजरे रंग यांच्याशी माणसाची बांधिलकी असते. काहींना ती शब्दात मांडता येते, काहींना ती प्रत्यक्षात चितारता येते तर काही जण फक्त बघून आनंद घेतात. या रंगांच्या जगातली मुशाफिरी अनेकांच्या उत्पन्नाचे साधन बनू शकते. त्यापैकीच एक आहेत पुण्यातल्या अश्विनी म्हसवडे आणि त्यांचे एलिगंट क्रिएशन’. 

 

२००२ साली करून तर बघू असं म्हणत सुरू झालेले प्रयत्न आज एलिगंट क्रिएशननावाने स्वतंत्र ओळख बनून गेली आहे. ही स्वतंत्र ओळख काही एका दिवसात झाली नाही. त्यासाठी अश्‍विनीताईंचा आजवरचा प्रवास कसा झाला ते समजून घेऊ. 

 

अश्विनीताईंनी कला महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ जाहिरात एजन्सीमध्ये काम केलं. कामासाठी दिला जाणारा वेळ आणि त्यातून मिळणारं मानधन याचा मेळ बसत नव्हता. म्हणून जाहिरात क्षेत्रातील श्रमांना पूर्णविराम देऊन स्वतःचं काही सुरू करावं हा विचार त्या करायला लागल्या. पण नक्की काय करायचं हे ठरत नव्हतं. या प्रश्नचिन्ह परिस्थितीत त्यांना मदत झाली त्यांच्या नणंदेची. अश्‍विनीताई पूर्वी लहान मुलांना शिकवत असत आणि त्यांना शिकवण्याची आवड होतीच.

 

फावल्या वेळेत त्या स्वत:ची कलाही जोपासत होत्या. हे सगळं लक्षात घेऊन लहान मुलांना पेंटिंग शिकवायचा सल्ला नणंदेनी दिला. कोथरूड भागात त्यांचं आणखी एक रिकामं घर होतं. त्याच वास्तूमध्ये चार विद्यार्थ्यांसह क्लास सुरू झाला. या विद्यार्थ्यांकडूनच तोंडी प्रचार पुष्कळ झाला आणि विद्यार्थी संख्या वाढायला लागली. चार पासून सुरु झालेला प्रवास पुढे मार्च २०२० पर्यंत दोन शाखा आणि सर्व मिळून आठ बॅचेस (२० विद्यार्थी प्रति बॅच) इतका मोठा झाला. क्लासेसमध्ये आजवर दीड हजार विद्यार्थी शिकले आहेत आणि अजूनही शिकत आहेत.

 

क्लासेस जोमाने सुरू असतानाच पेंटिंग्ज विक्रीची अनपेक्षित सुरुवात झाली. क्लासला आता दहा वर्षं पूर्ण झाली होती. विद्यार्थ्यांचे पालक ओळखीचे झाले होते. समारंभाना आणि शुभकार्यात भेट देण्यासाठी म्हणून पेंटिंग्ज बनवून देण्याची विनंती ते अश्‍विनीताईंकडे करू लागले. एलिगंटचे पहिले ग्राहक हे विद्यार्थ्यांचे पालक हेच होते. आधी हे प्रमाण कमी होते मग ते वाढत गेले. त्यानंतर क्लासशिवाय बाहेरून विचारणा सुरू झाली आणि पेंटिंग विक्रीच्या व्यवसायाला अधिकृत सुरुवात झाली.

 

वॉलपेंटिंग पासून ग्लासपेंटिंगपर्यंत प्रत्येक कलाप्रकार ताई सुरुवातीपासूनच हाताळतात. एकदा दहा बाय पंधरा फूट साइजचे मोठे गरुडाचे म्युरल अशाच पद्धतीने तयार झाले. म्युरल म्हणजे मोठे भित्तीचित्रं. या चित्रानंतर मागणी वाढतच गेली. यातल्या उद्योजकतेचा विचार करतांना मोठमोठी पेंटिंग्ज करून, त्याची जास्त किंमत ठेऊन, प्रदर्शन मांडण्यापेक्षा सर्वसाधारण सर्वांना समजतील, आवडतील आणि महत्वाचं म्हणजे परवडतील अशी पेंटिंग्ज बनवण्याकडे अश्‍विनीताईंचा ओढा असतो.

 

तसंच त्या रिॲलिस्टिक (वास्तववादी) पद्धतीनेच पेंटिंग करतात, ॲबस्ट्रॅक्ट हा चित्र प्रकार सहसा टाळतात. कला हे आस्वादाचे माध्यम असल्याने चित्रं पाहिल्यावर त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात अश्‍विनीताईंना रस असतो. कालांतराने त्यांची हीच शैली विकसित होत गेली. लोकांनी चित्र पहिल्यावर त्यांना बरं वाटलं पाहिजे असा त्यांचा प्रयत्न असतो. माझ्या हातून अशीच कला जन्माला यावी अशी माझी इच्छा आहे, असं अश्विनीताई नम्रपणे सांगतात. 

 

बरेचदा आर्किटेक्ट आणि डिझायनर व्यवसायातील लोकांकडून पेंटिंग्जसाठी विचारणा होते. त्यांच्यासाठी विशेष अपेक्षांप्रमाणे आकार, रंगसंगती या गोष्टी लक्षात घेऊन पेंटिंग करावं लागतं. वास्तूच्या भिंतींचा रंग, फर्निचर इ. ची संगती सांगून चित्र बनवण्याची विनंती त्यांच्याकडून होते. तसंच अनेक जणांना आपण आधी काढून ठेवलेली निवडीसाठी पेंटिंग्ज दाखवली की त्यातून ते निवडतात. यासाठी दोन्ही प्रकारे तयारीत राहावं लागतं. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी हे पक्क लक्षात ठेवायला हवं की अशा प्रकारच्या कस्टमाईज ऑर्डरसाठी आपण तयार असायला हवं.

 

एलिगंटची ड्रॉइंग पोर्ट्रेट्स आणि ही कला शिकण्याचे क्लासेस या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे क्लासेस २००२ साली सुरू झाले. सध्या त्याचं विसावं वर्ष चालू आहे. चित्र शिकू इच्छिणाऱ्या लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत सर्व जण क्लासला येतात. सध्याच्या काळात गृहिणी आणि काम करणाऱ्या महिला ताण कमी करण्यासाठी म्हणून ड्रॉइंग शिकायला येतात. तसंच पुरुष सुद्धा येतात. काम करणारा वर्ग आपल्या क्लासमध्ये येतो म्हणून त्यांच्या सुट्टीचं नियोजन करून क्लासेसच्या वेळा ठरवाव्या लागतात. मोठ्या माणसांप्रमाणे लहान मुले सुद्धा क्लासला येतात.

 

सातवी ते नववीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या एलिमेंन्ट्री इंटरमीडिएटच्या परीक्षा असतात. तसंच दहावीनंतर ज्यांना फाइन आर्ट्‌‍स निवडायचे आहे किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम निवडायचा आहे त्यांच्यासाठी प्रवेश परीक्षा असतात. त्याची तयारी एलिगंट क्रिएशनमध्ये करून घेतली जाते. या सर्वांची त्यांच्या वयाच्या श्रेणीनुसार, हातातल्या कलेनुसार पातळी ठरवून त्यांना चित्रं शिकवली जातात. सध्या हे संपूर्ण शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. आधी कलेचे वर्ग ऑनलाइन घेण्याचा विचारसुद्धा कोणी केला नसता. पण न्यू नॉर्मलच्या या जगात हा एकच मार्ग भेटीसाठी उपलब्ध आहे.

 

याचा फायदा असा की ऑनलाइन माध्यमावर कोणालाही जॉइन होता येतं म्हणून राज्य, देश या सीमा तोडून विद्यार्थी सहभागी झाले. सध्या ऑनलाईनच्या सात बॅचेसमध्ये हे शिक्षण चालते. परदेशी विद्यार्थी, घरून- बाहेरून काम करणारे या सगळ्यांच्या सोयीच्या वेळा ठरवून क्लास चालतात. परदेशी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या वेळा सांभाळतांना अश्‍विनीतार्इंना वेळेची थोडी कसरत करावी लागते. पण हे न्यू नॉर्मल आहे हे विसरता येणार नाही. क्लासमध्ये कॅनव्हास पेंटिंग्ज, पेन्सिल शेडिंग, कॅलिग्राफी, हस्ताक्षर, वारली-मधुबनी तसेच ग्लास पेंटिंग इत्यादी प्रकार शिकवले जातात. या शिक्षणाची फी विद्यार्थ्यांच्या पातळीनुसार ठरते. या वेगवेगळ्या पातळ्यांसाठी एलिगंट पाचशे रूपयांपासून अडीच हजार रुपयांपर्यंत प्रती महिना इतकी फी आकारते.

‘eयशस्वी उद्योजक’ 20 मित्रांसोबत SHARE करा आणि मिळवा एक खास आकर्षक भेट!

प्रत्येक व्यवसायाच्या पोटातले म्हणून काही उद्योग असतात. पेंटिंग उद्योगात चित्राचे विशेष रंग, कागद, रंगांचे ब्रश इत्यादी बनवणाऱ्या उद्योगांना मदत होते. यात आणखी एक उद्योग म्हणजे कागदावर चित्रं आकार घेत असतांना अनेक प्रकारची मदत घेतली जाते. उदाहरण द्यायचं झालं तर आपण चित्र काढायचं आणि रंग भरायला मदतनीस घ्यायचा किंवा चित्रं तयार करुन घेऊन आपण साजरे रंग भरायचे असे प्रकार सर्रास चालतात. अश्‍विनीताई त्यांच्या वैयक्तिक अभिव्यक्तीसाठी आग्रही आहेत.

 

त्या अशा प्रकारची कोणतीही मदत घेत नाहीत. अशा वेळेस काम कमी होण्याचा धोका असतो. पण एलिगंटच्या आजवरच्या प्रवासात मूल्यांना नेहेमीच प्राधान्य दिले गेले आहे. अश्विनीताईंच्या मते अनेकांची कला आणि त्यांची मेहेनत त्यांना त्यांच्या नावावर विकणं योग्य वाटत नाही. आपल्या स्वतंत्र अस्तित्वाचा आलेख स्वतःजवळ नेटका मांडता येतो. यातून आपली कला विकसित होत जाते. प्रत्येक ग्राहकाला हा मुद्दा पटवणं कठीण असतं. ज्यांच्याकडे कलेबाबत संवेदनशीलता आहे अशी व्यक्तीच कलेशी प्रामाणिकपणा जपणं म्हणजे काय हे समजू शकते. त्यामुळे या मूल्यांचा विक्री दर्जा सांभाळतांना कस लागतो. 

 

कुठल्याही उद्योजकतेमध्ये आपण ग्राहकांना देत असलेल्या वस्तु वा सेवेच्या दर्जाची गणितं आपल्या-आपल्यासाठी म्हणून नेटकी मांडावी लागतात. या अचूक गणिती पायावरच एलिगंटने आजपर्यंतचा दोन दशकांपेक्षा जास्त प्रवास केला आहे. आपला दर्जा सिद्ध करण्यासाठी प्रत्येक चित्रात एक प्रकारची परिणामकारकता असायला हवी. उदाहरणार्थ पक्ष्याचं चित्र असेल तर चित्रातला पक्षी, पक्षाचे पंख, त्याची पिसं, डोळे या बारकाव्यांवर व्यवस्थित परिणाम साधेपर्यंत काम केले जाते. यासाठी रंग आणि इतर साधने दर्जेदार वापरली जातात. यात तडजोड नसते. चित्राला लॅकर कोटींग सुद्धा केले जाते. लॅकर हे एक रसायन आहे. या रसायनाच्या थरात कलाकृतीची परिणामकारकता, टीकाऊपणा वाढतो तसेच त्यातला फ्रेशपणा दीर्घकाळ टिकून राहतो. लॅकर हे लाकडावर, गणपतींच्या मूर्तीवर सुद्धा वापरले जाते. या सर्वांचा नवउद्योजकांनी नीट अभ्यास करायला हवा. 

 

पेंटिंग्जची विक्री ही बारा महिने होत असते. साधारणपणे पेंटिंग्ज हे कोणाला तरी वाढदिवसाला किंवा इतर समारंभांना भेट म्हणून देतात. नव्या घरात लावण्यासाठीचं ते औचित्य असतं. वर्षभरात या गोष्टींची ठराविक अशी वेळ नसते. म्हणूनच वर्षाच्या विशिष्ट काळात या उद्योगाला तेजी असते असे होत नाही. पण तुम्ही या उद्योगासोबत क्लासेस घेणार असाल तर वेळ महत्त्वाची ठरते. कारण सणस्नेही असे अनेक उपक्रम क्लासेसमध्ये राबवता येतात.

 

जसे की, गणपती जवळ आले की शाडू मातीच्या गणपती मूर्ती शिकवता येतात, दिवाळी आली की आकाशकंदील- पणत्या बनवण्याचे वर्कशॉप्स घेता येतात. त्याची जाहिरात माहिती किंवा माहितीपत्रक तयार करुन आपल्याकडे शिकत असलेल्या आणि शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत समाजमध्यमाद्वारे पाठवता येते. या विद्यार्थ्यांद्वारे त्यांच्या ओळखीत, नातेवाईकांमध्ये आपली तोंडी जाहिरात होत असतेच. त्या विशिष्ट सणाच्या एखाद महिन्यापूर्वी हे वर्कशॉप्स सुरू होतात.

 

या उद्योगात नव्याने येऊ इच्छिणाऱ्यांना सल्ला देतांना अश्विनीताई सांगतात, डिजिटल माध्यमांचा पुरेपूर वापर करा. तुमची कला फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब सह स्वतःच्या वेबसाइट या डिजिटल माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचायला हवी. यातून व्यवसाय पुढे जात राहतो. मात्र यासाठी चिकाटी लागते. इतर उद्योगांप्रमाणेच या व्यवसायातील यश ही एक प्रक्रिया आहे. एका रात्रीत तुम्हाला यश मिळणार नाही. स्वतःवर आणि स्वतःच्या कलेवर निरपेक्ष काम करा. यशस्वी होण्यासाठी वेळ लागतो. तसंच वर म्हटल्याप्रमाणे संसाधनांचा, तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर हे ही यासाठी महत्वाचे ठरते. या प्रक्रियेमध्ये नवनव्या कल्पना सुचत जातात.

 

एलिगंट गेली वीस वर्ष या व्यवसायात तग धरून आहे कारण वेगवेगळे पेन्टिंग्जचे प्रकार अश्‍विनीताई हाताळत आहेत. लोकांना वैविध्य आवडतं. आपल्या चित्रांमध्ये तोचतोचपणा आला की तुम्ही हळूहळू प्रवाहातून बाहेर फेकले जाता. नव्या जागा पहा, इतरांनी बनवलेली चित्रं पहा, माणसांशी संवाद करा, साहित्य वाचा तुम्ही नक्की समाजमान्य व्हाल. तुमच्या यशस्वी भविष्याकरता शुभेच्छा.

 

कला आणि व्यवसाय यांच्यात सांगड घालणे कठीण असते. या दोघांमधला पुल सांधताना दमछाक होऊ शकते. त्यासाठी विचारांची स्पष्टता आवश्‍यक आहे. अश्‍विनीताईंची कथा वाचताना हे नेमकेपणाने लक्षात येतं. निव्वळ व्यावसायिक दृष्टीकोनातून त्या चित्रांची निर्मिती करत नाहीत. पण विक्रीसाठी चित्रं बनवताना कलेशीही प्रतारणा करत नाहीत.

 

– सचिन घोडेस्वार

 

एकाच शेतजमिनीवर वेगवेगळे थर लावून अनेक मजल्यांवर शेती करण्याला हायड्रोपो...

नोकरी करतानाच आजूबाजूच्या कंपन्यांचा अभ्यास केला आणि मालाची विक्रीही  एक...

आय.टी. इंडस्ट्रीमध्ये चित्रपटसृष्टीप्रमाणे अनेकांना हिरो व्हायचे असते, ग्...

विजय माने या चाळीशीतल्या तरुणानं 2017 साली आपल्या दोन सहकार्‍यांसमवेत मुंबईत...

‘छत्रपती शिवाजी महाराज’ हा महाराष्ट्रातील सर्वांच्याच अभिमानाचा विषय आहे...