आयटीतली नोकरी सोडून सुरू केली कंपनी, टाटा, बिर्ला, अंबानींसारखे आहेत १०० ग्राहक

आयटीतली नोकरी सोडून सुरू केली कंपनी, टाटा, बिर्ला, अंबानींसारखे आहेत १०० ग्राहक

आय.टी. इंडस्ट्रीमध्ये चित्रपटसृष्टीप्रमाणे अनेकांना हिरो व्हायचे असते, ग्लॅमरच्या आकर्षणामुळे चित्रपट सृष्टीत येणार्‍यांना अभिनय करण्याची इच्छा असतेच असे नाही. त्यामुळे तिथल्या ग्लॅमरचा पाठलाग करता करता एक्स्ट्राची कामे करण्याची वेळ अनेकांवर येते. आय. टी. क्षेत्रामध्येही चकचकीत इमारती आणि भरभक्कम पगार या ग्लॅमरच्या आकर्षणामुळे आलेल्या युवकांना पैसा मिळतो पण कामाचे समाधान मिळत नाही.

 

पुण्यात बिझिनेस इंटेलिजन्स क्षेत्रात काम करणारी पहिली कंपनी काढली 

प्रशांत पानसरे यांना आय.टी. क्षेत्रामध्ये पैशाच्या ग्लॅमरपेक्षा रिसर्च करण्याची, काही नाविन्यपूर्ण करण्याची आवड होती. पण भारतातील आय.टी. इंडस्ट्रीमध्ये प्रॉडक्ट तयार करण्यावर भर नाही. अनेक कर्मचारी नेमून, दुसऱ्या कंपनीची मिळतील ती कामं करण्यासाठी कर्मचारी पुरवणे, त्यातून कमीत कमी जोखीम घेऊन जास्तीत जास्त उत्पन्न मिळवत राहणे, यावर भर दिला जातो. त्यामुळे जेव्हा प्रशांत पानसरे यांनी आय.टी. मधली भरभक्कम पगारी नोकरी सोडून २००४ साली Inteliment Technologies  या कंपनीची स्थापना केली तेव्हा बिझिनेस इंटेलिजन्स करणारी ती भारतामधील तिसरी आणि पुण्यातली पहिली कंपनी होती. टाटा, बिर्ला, अंबानी यांच्यासारखे शंभराहून जास्त क्लायंट असल्यामुळे या क्षेत्रात त्या कंपनीचे नाव विशेषत्वाने घेण्यास सुरुवात झाली. 

 

प्रशांत यांनी मेकॅनिकल इंजिनिअरींग नंतर एम.बी.ए. करताना सॉफ्टवेअर प्रोजेक्ट केल्यामुळे आय.टी इंडस्ट्रीमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. ERP म्हणजे दोन कंपन्या एकत्र आल्यानंतर त्यांचे एकत्रीकरण सॉफ्टवेअरमधून करणे, त्यांच्या काम करण्याच्या पद्धती एकत्र करून एक सर्वसमावेशक कार्यपद्धती अवलंबणे अशा प्रकारचे काम केले. बिझिनेस इंटेलिजन्सचा वापर करून उद्योगाचे विश्लेषण करण्यास त्यांनी सुरुवात केली. यासाठी बिझिनेस आणि तंत्रज्ञान या दोन्हीची जोड देऊन काम करण्याची आवश्यकता असते.

 

विविध मल्टी-नॅशनल कंपन्यांसाठी हे काम करताना, अनेक देशांमध्ये फिरताना अनेक माणसे वाचण्याची संधी त्यांना मिळाली. कॉम्प्युटर तंत्रज्ञानामध्ये आपण पाश्चात्य देशांवर बरंच अवलंबून आहोत. त्यामुळे प्रशांत यांनी विचार केला की अशा अनेक कंपन्यांसाठी बिझिनेस इंटेलिजन्सची बाग फुलवताना त्यातली जमीनच आपली नाही अशी स्थिती होती. 

 

Artificial Intelligence व Data scienceचे भारतातील पहिले प्रॉडक्ट बनवले

स्वतःचे बिझिनेस इंटेलिजन्स प्रॉडक्ट बनवावे या विचाराने २०२० मध्ये प्रशांत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह RubiScape ही product based कंपनी सुरू केली. Artificial Intelligence व Data science चे भारतातील पहिले प्रॉडक्ट बनवले. अनेक सॉफ्टवेअर एका प्लॅटफॉर्मवर आणल्यामुळे कंपनीला आणि ग्राहकाला अधिक स्वातंत्र्य मिळाले. अनेक दरवाजे खुले झाले. ११ मे २०२२ RubiScape ने VIIT च्या सहयोगाने ‘आर्टीफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स’च्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ची स्थापना केली. याची खासियत हीच आहे की इथे पूर्णपणे भारतामध्ये बनवलेली कॉम्प्युटर Applicationच वापरली जातात. प्रशांत RubiScape चे संस्थापक आणि सी.ई.ओ. आहेत.


कॉम्प्युटर युगाच्या या टप्प्यावर आता कंपन्यांकडे बराच डेटा उपलब्ध आहे. परंतु त्याचे विश्लेषण करण्यासाठी तज्ञांची आवश्यकता असते. जसे की एखाद्या शाळेच्या मैदानावर बरेच विद्यार्थी – विद्यार्थिनी खेळत असतील तर त्याचे विश्लेषण केल्यानंतर त्यामध्ये विद्यार्थी किती, विद्यार्थिनी किती, रोज सक्रियपणे खेळणारे किती, सहसा मागे राहणारे किती, बघे किती आणि इतरांना खेळू न देणारे किती, अशाप्रकारे बरीच माहिती अशा विश्लेषणामधून रिपोर्ट सिस्टीमद्वारे मिळू शकते. कोणत्याही कंपनीसाठी ग्राहकांच्या सवयीचे असे विश्लेषण पुढील विक्रीचे नियोजन करण्यासाठी उपयोगी असते. 

 

भारतीय कंपनी म्हणून कौतुक झालं तरी काम आंतरराष्ट्रीय कंपनीला दिलं जायचं

प्रशांत यांनी सांगितलं की कंपन्यांसाठी आय टी इंडस्ट्रीचा भर आय.टी. सर्व्हिस देण्यावर आहे. स्वतःचे प्रॉडक्ट बनवण्यावर नाही. त्यामुळे त्या ‘कारकुनी’ कामामध्ये बऱ्याच वेळेला समाधान मिळत नाही. आय.टी. क्षेत्रात काम केल्यानंतर स्वतःची कंपनी स्थापन करताना प्रशांत यांनी त्याच क्षेत्रात उपक्रमशीलता कायम ठेवली. ग्राहकाबरोबर स्वतःलाही समाधान मिळेल अशा पद्धतीने काम करण्यास सुरुवात केली. प्रवाहाच्या विरुद्ध पोहताना कुटुंबामधून भक्कम पाठिंबा मिळाला.

 

पण अनेक मित्र प्रश्न विचारू लागले की इतके दिवस देशा-परदेशात भ्रमंती करणाऱ्याने अशी स्वतःची कंपनी स्थापन करून काय मिळवले? सुरुवातीला ग्राहक मिळवताना असाच अनुभव आला. भारतीय प्रॉडक्ट बनवणारी भारतीय कंपनी याचे सगळ्यांकडून कौतुक व्हायचे, परंतु काम मात्र आंतरराष्ट्रीय कंपनीला दिले जायचे. आता दिवस पालटले आहेत. त्यामध्ये जसा दर्जेदार आय.टी. प्रॉडक्टचा वाटा आहे तसा RubiScape च्या ग्राहकाभिमुख सेवेचा, प्रशांत यांच्या संवाद शैलीचाही आहे, हे त्यांच्याशी संवाद साधताना जाणवले.

 

‘eयशस्वी उद्योजक’ 20 मित्रांसोबत SHARE करा आणि मिळवा एक खास आकर्षक भेट!

 

उद्योजकाने आपल्या बिझिनेसची इको सिस्टीम तयार करावी 

 

इतर उद्योजकांना मदत करत रहावे

प्रशांत यांनी स्वतःची कंपनी स्थापन केल्यावर अनेकांना प्रॉडक्ट स्टार्टअप स्थापन करण्यासाठी उद्युक्त केले. याची कारणमीमांसा करताना प्रशांत यांनी सांगितले की प्रत्येक उद्योजकाने आपल्या व्यवसायापुरता संकुचित विचार न करता आपल्या बिझिनेसची इको सिस्टीम कशी तयार करता येईल याचा विचार करावा. इतर उद्योजकांना मदत करत रहावे. त्यामुळे एकूणच पोषक वातावरण निर्माण होण्यास मदत होते. आणि अनेक उद्योजक मिळून बरंच काही साध्य करू शकतात. 

 

सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्यासाठी अनेकजण इच्छुक असल्याचे आपण बघतो. पण इंडस्ट्रीच्या दृष्टीकोनातून सॉफ्टवेअर इंजीनिअरींग हे क्षेत्र कोणी निवडावे, या प्रश्नावर प्रशांत यांनी सांगितले की आपली शिक्षण पद्धती परीक्षा केंद्रित आहे, ज्यामध्ये ज्ञान मिळवणारे फार कमी असतात. त्यामुळे चार वर्षे घोकंपट्टी करून अनेक युवक पदव्या मिळवतात परंतु ज्ञान मिळवण्यासाठी पदवी घेता घेता प्रयत्न करणारेच इथे काही हटके करू शकतात. या क्षेत्रात कल्पकतेला भरपूर वाव आहे.

 

त्यामुळे प्रोग्रामिंग शिकताना युवकांनी परीक्षार्थी होण्यापेक्षा हे प्रोग्रॅम बँकिंग, इन्शुरन्स, मेडिकल सारख्या वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी कसे वापरता येतील याचा विचार करावा. कल्पकतेने Problem solving skills शिकण्याची तयारी इंजिनिअर होऊ इच्छिणाऱ्या युवकांनी दाखवली आणि त्यासाठी प्रयत्न केले तर भवितव्य उज्ज्वल आहे, अन्यथा इंडस्ट्रीमधील एक कामगार एवढेच अस्तित्व राहण्याचा धोका आहे. प्रशांत यांनी आय.टी. इंडस्ट्रीमधला ग्लॅमरचा मार्ग सोडला आणि इंडस्ट्रीमधील प्रश्न भारतात तयार केलेल्या प्रॉडक्टमधून भारतातच कसे सोडवता येतील याचा विचार केला.

 

आय.टी. मध्ये समाधान नाही, कल्पकता नाही अशी तक्रार करण्यापेक्षा प्रशांत यांनी त्यावर उपाय शोधला, स्वतःची कंपनी स्थापन केली, त्यामध्ये कल्पकता जपली जाईल याची काळजी घेतली. आय.टी. इंडस्ट्री म्हणजे फक्त तंत्रज्ञान नव्हे तर ते तंत्रज्ञान वापरणारी माणसे. उद्योजकाने उत्तम संवादक असावे, भिन्न कौशल्ये असणाऱ्या अनेक साथीदारांना बरोबर घेऊन त्यांच्याबरोबर काम करणारे असावे. प्रशांत यांनी ही वैशिष्ट्ये जपली आहेत आणि तेच त्यांच्या यशस्वी उद्योजक होण्यामागचे रहस्य आहे.

 

– सुहास किर्लोस्कर

(चित्रपट आणि संगीत विषयांचे अभ्यासक,

विविध विषयांवर लेखन )

suhass.kirloskar@gmail.com

इंडियन एयरफोर्स आणि इतर खासगी विमान कंपन्यांमध्ये पायलट म्हणून आपली कारकी...

व्यवसाय करण्यासाठी ‘फूड इंडस्ट्री’ मध्ये जायचं ठरवले की, सुरूवातीला ‘मेन...

चाळीशी पार केलेला एक अभियंता ‘उल्हास पेद्दावाड’ हा या कथेचा नायक आहे. उल्हा...

आपल्याला आपल्या स्वप्नांसाठी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अनंत अडचणीं...

अंबेजोगाईचा शुभम महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आला. पुण्याच्या गरवार...