उद्योजक तयार करण्याची धडपड आणि जग बदलायचा फॉर्म्युला

उद्योजक तयार करण्याची धडपड आणि जग बदलायचा फॉर्म्युला

जे पुण्यात घडलं तेच नायजेरियात. भिन्न खंडातील दोन उद्योजक सामाजिक हिताचा विचार करताना किती सारख्या वाटेवर चालतात, हेच लक्षात येतं. ‘पर्सिस्टंट सिस्टीम्स’चे डॉ. आनंद देशपांडे यांनी छोट्याशा जागेत सुरू केलेली त्यांची कंपनी आज बरीच विस्तारली आहे. या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं आतून वाटल्यानं वयाच्या पन्नाशीत त्यांनी स्वतःच्या उत्पन्नातून एक कंपनी स्थापन केली – ‘दे आसरा’. हातांना नवनिर्मितीचं वेड लागू द्या, असं म्हणत त्यांनी या समाजातून छोटे छोटे उद्योजक, व्यावसायिक निर्माण व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, हे आपण जाणतोच.

 

आफ्रिका हा भारतापेक्षाही गरीब. याच आफ्रिका खंडातील नायजेरियात टोनी एलुमुलू या पन्नाशीतील उद्योजकांने ‘टोनी एलुमुलू फाउंडेशन’ उभारून हेच काम सुरू केले आहे. आफ्रिकेत एक हजार उद्योजक निर्माण करण्यासाठी त्यांचं हे फाउंडेशन कामाला लागलं आहे. एलुमुलू यांचं बालपण अतिशय गरिबीत गेलं आहे. पुढं ते स्वतःच्या बुद्धिमत्तेवर मोठे उद्योजक झाले. विशेषतः तोट्यात आलेल्या बॅंकांचं पुनरुज्जीवन करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी जानेवारी २०१५ मध्ये एक विश्वस्त निधी निर्माण केला. या विश्वस्त निधीद्वारे होतकरू तरुणांना नवनिर्मितीची संधी दिली जाणार आहे. ज्यांच्याकडे नवीन उद्योग करण्याची कल्पना आहे, अशा युवकांना आर्थिक मदत व मार्गदर्शन करण्याचं काम हा विश्वस्त निधी करणार आहे. यासाठी अटी दोन. पहिली अट अशी की, या युवकांची कल्पना नावीन्यपूर्ण असायला हवी. त्यानं नवीन तंत्राचा वापर करून शेती, पर्यटन किंवा व्यवसायउदीम सुरू करावा किंवा त्यानं शास्त्रज्ञांच्या मदतीनं नवीन तंत्रज्ञान विकसित करावं. म्हणजे जे असेल ते नवं असावं. इतर लोक करतात तेच पुन्हा करण्यासाठी एलुमुलूंची मदत होणार नाही. मात्र उद्योग व संशोधन यांच्या एकत्र येण्यातून नवीन उपकरणं विकसित होतील. त्यांनी आपल्या देशातील युवकांना सांगितलं आहे की, “युवकांनो, नवीन भविष्यकाळ निर्माण करा. केवळ जमिनी हडप करून बांधकाम करण्याचे व्यवसाय, भेसळीची औषधे तयार करणारे कारखाने, सगळे करतात म्हणून आपणही रुळलेलेच उत्पादन वेगळ्या नावाने आणण्यात काहीच गंमत नाही. ही असली जुनी मनोवृत्ती सोडून द्या आणि ज्ञान, विज्ञान व संशोधन यावर आधारित नवीन उद्योग निर्माण करा.”

 

नायजेरियाची आर्थिक परिस्थिती बदलण्यात हा प्रयत्न उपयुक्त ठरेल. नवीन काही करून पाहण्यात आव्हान असतं. ते आव्हान पेलण्यासाठी युवकांच्या हातांना बळ देण्याचं काम हा विश्वस्त निधी करणार आहे. 

 

यातील दुसरी अटही महत्त्वाची आहे. कोणतीही मदत ही फुकट देऊ नये. केलेल्या मदतीची परतफेड अपेक्षिण्यात काहीच गैर नाही. टोनी यांनी या युवकांना घातलेली दुसरी अट परतफेडीचीच आहे. समाजाप्रती परतफेड करण्याची. म्हणजे असं की, टोनी यांच्या विश्वस्त निधीच्या मदतीनं यशस्वी झालेल्या उद्योजकानं आपल्या नफ्यातला काही भाग दुसऱ्या होतकरू तरुणांसाठी वापरला पाहिजे. म्हणजे आणखी उद्योजक तयार होतील. उद्योजकांची एक साखळीच तयार होईल. 

 

एलुमुलूंनी आफ्रिकेतील युवकांना आवाहन केलं आणि मार्क शटलवर्थ या उद्योजकांनं त्यातून प्रेरणा घेतली. टोनींपेक्षा वयानं व आर्थिक दृष्ट्याही लहान असलेले मार्क यांनीही नवीन उद्योजक व उपयुक्त सामाजिक कल्पना असणारे प्रकल्प यात स्वतःची संपत्ती गुंतवायला सुरूवात केली आहे. 

 

पणतीने पणती उजळत गेली की, दिवेलागण होते. एक पणती आपल्या आसपासचा अंधार दूर सारत प्रकाश पसरत जाते. फक्त एक पणती आपण उजळायला हवी. 

(स्त्रोत – इंटरनेट)

 

 जग बदलायचा फॉर्म्युला 

अमेरिकेतल्या डेट्राइट नावाच्या शहरापासून थोडं दूर असलेलं ग्रीनफिल्ड नावाचं एक छोटंसं गाव. तिथल्या एका शेतकरी कुटुंबात ३० जुलै १८६३ रोजी हेन्री फोर्डचा जन्म झाला होता. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षीच तो डेट्राईट इथं वाफेची इंजिनं बनवायच्या एका कारखान्यात नोकरी करू लागला. पण त्याचं संपूर्ण लक्ष केंद्रित झालं होतं ते स्वयंचलित मोटारगाडी तयार करण्याकडं; पण त्यासाठी योग्य असं एक इंजिन बनवणं फार आवश्यक होतं. गेली दोन वर्ष तो सतत याच कामात व्यग्र होता. आपल्या घरामागं असलेल्या टपरीत त्यानं एक वर्कशॉप सुरू केलं होतं. इंजिन बनवण्याचं हे काम अत्यंत वेळखाऊ, गुंतागुंतीचं, अवघड होतं. त्या इंजिनचा प्रत्येक छोटामोठा पार्ट हेन्रीलाच तयार करावा लागे. तयार केलेला पार्ट तपासून घ्यावा लागे. त्याच्या या वेडापायी इंजिनियरची नोकरीसुद्धा सोडावी लागली त्याला. पण…. पण अखेरीस ‘तो’ क्षण आला! १८९६ चा जून महिना. त्या दिवशी रात्री सतत हेन्री काम, काम आणि कामच करत होता. बाहेर धो धो पाऊस कोसळत होता; आणि आत, हेन्रीच्या वर्कशॉपमध्ये त्याची पहिली मोटारगाडी चाचणीसाठी तयार होत होती! रात्र संपण्याची आणि पाऊसही थांबण्याची वाट बघायलाही हेन्री तयार नव्हता. मध्यरात्र उलटून गेली होती. सगळी जुळवाजुळव झाली होती; आणि… हेन्री गाडीत ड्रायव्हर्स सीटवर स्वार झाला. आता तो वर्कशॉपमधून गाडी बाहेर काढणार, तोच त्याच्या लक्षात आलं की…. गाडीचा आकार मोठा आहे आणि वर्कशॉपचं दार अरुंद आहे! गाडी बाहेर काढणार कशी? आता मात्र हेन्री पुरता वैतागला. गाडीच्या चाचणीसाठी प्रचंड उत्सुक, आतुर आणि अधीर झालेल्या हेन्रीनं सरळ एक कुदळ घेतली आणि वर्कशॉपच्या समोरची भिंतच पाडली. तोपर्यंत पहाटेचे चार वाजले होते. पाऊसही थांबला होता; पण रस्ते ओले होते; जणू निसर्गानंच सडे शिंपले होते; हेन्रीच्या गाडीसाठी!

 

त्या काळात मोटारी फक्त श्रीमंतांना परवडतील इतक्या महागड्या असायच्या. सामान्य लोकांनाही परवडतील अशा मोटारी बनवायचं त्याचं स्वप्न होतं. आपलं स्वप्न साकार करण्यासाठी त्यानं असंख्य गुंतवणूकदारांना गळ घातली. त्यासाठी त्यानं ‘डेट्रोइट ऑटोमोटिव्ह’ नावानं कंपनीही स्थापन केली. त्यानं २५ गाड्या बनवल्या देखील. पण त्याची किंमत इतकी जास्त होती की, त्याला त्या कवडीमोल किमतीत विकाव्या लागल्या. हेन्री फोर्डला पदार्पणातच अपयशाचा सामना करावा लागला. तरीही तो पुन्हा उभा राहिला. त्यानं दुसरी कंपनी ‘हेन्री फोर्ड कंपनी’ नावानं स्थापन केली. पण त्यानं श्रीमंतांसाठीच गाडी बनवायला हवी असा ठेका भागीदारांनी धरल्यामुळे त्याला ती कंपनीही गुंडाळावी लागली. पुन्हा एकदा अपयशी आल्यामुळेसुद्धा हेन्री फोर्ड खचला नाही. कारण अपयश म्हणजे पुन्हा एकदा नवीन सुरुवात करायची संधी, अशी त्याची धारणा होती.

 

तिसऱ्या वेळी त्यानं आणखी एक कंपनी स्थापन केली. नाव होतं- ‘फोर्ड मोटर कंपनी’. १९०७ मध्ये त्यानं आपल्या स्वप्नातली कार बनवायला घेतली. १ ऑक्टोबर १९०८ मध्ये त्यानं ‘फोर्ड मॉडेल टी’नावानं आपली गाडी मार्केटमध्ये आणली. त्याच्या या गाडीनं पुऱ्या जगामध्ये खळबळ माजवली. शहरातील मध्यम वर्गापासून गावातील शेतकऱ्यांपर्यंत त्याच्या गाडीनं वेड लावलं. पहिल्या वर्षी १७४५ गाड्या विकल्या गेल्या. तर दुसऱ्या वर्षी १९०६ गाड्या विकल्या गेल्या. त्याची ही गाडी अवघ्या ८५० डॉलरला मिळत होती. मागणी प्रचंड होती आणि पुरवठा त्या प्रमाणात करणं शक्यच नव्हतं. अशा वेळी हेन्री फोर्डला एक अफलातून कल्पना सुचली. त्यामुळे वाहन उद्योगात एक क्रांतीच घडली. त्या काळात एक गाडी बरेच कामगार मिळून करायचे. त्याऐवजी त्यानं ‘असेम्ब्ली लाइन’ पद्धत सुरु केली. ज्यामुळे एकाच वेळी असंख्य गाड्या मोजके पार्टस बसवल्यावर पुढे सरकून पुढचे कामगार इतर कामं पार पाडू लागले. हेन्री फोर्डच्या त्या कल्पनेला अफलातून यश मिळालं. गाड्यांची संख्या हजारातून लाखावर जाऊन पोहोचली. दोन लाखांवर गेली, तरी त्याची मागणी काही कमी होईना. प्रत्येक सामान्य माणसाला गाडी घेता यायला हवी हेच त्याच खरं स्वप्न होतं. त्यानं केवळ अमेरिकाच बदलली नाही, तर अख्ख्या जगाला बदलायचा फॉर्म्युला दिला. 

 

(स्त्रोत : ‘माय लाईफ अँड वर्क’ – हेन्री फोर्ड)

– जान्हवी संतोष

  प्रत्येक उद्योजकाला त्याच्या उद्योगामध्ये त्याने विक्री करताना किंवा...

  “मी काय बावळट आहे का अशिक्षित आहे?” नंदिताच्या डोळ्यांत राग होता. नंदिता...

परवा माझ्याकडे एकजण आले होते. बोलता बोलता एका मोठ्या रेस्टॉरन्टबद्दल एकदम ...

उद्योग, व्यवसाय, स्टार्टअप सुरू करायचं असेल तर पहिला प्रश्न असतो तो भांडवला...

व्यवसायात अडचणी, आव्हाने येणारच नाहीत हे शक्यच नाही. पण त्या आव्हानांचा मुक...