बांबूची बाटली, बांबूचा पेन, करवंदाचे सरबत आणि पैशांची ‘पाउलवाट’
उद्योजकतेचा ध्यास असणारे फक्त शहरातच असतात का? नक्कीच नाही. खरे तर शहरातील अनेक युवकांचा कल उद्योगापेक्षा नोकरी करणे हाच असतो. गावाकडील युवकांना नोकरी करण्यापेक्षा उद्योग करावा असेच वाटत असते. परंतु अनेक युवक गावात शेती करण्यापेक्षा नोकरी शोधण्यासाठी शहरात येतात. गाव सोडून शहरामध्ये येण्यापूर्वी त्यांनी स्वतःकडे असणाऱ्या कौशल्याचा विचार केलेला असतोच असे नाही. त्यामुळे शहरामध्ये मिळेल ते काम करण्यात त्यांची उमेदीची वर्षे जातात. गावाकडच्या लोकांच्या दृष्टीने हा युवक शहरामध्ये काम करत असतो पण तो नेमके काय काम करतो हे माहित नसते.
यावर उपाय काय आहे? गावाकडे शेती आणि त्याला अनुषंगिक बरेच उद्योग करता येतात परंतु युवकांनी आपल्याच घरामध्ये अनुभवलेले असते की शेतीमध्ये पैसा मिळत नाही. शेतातले उत्पादन आपणा सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असले तरीही शेती फायदेशीर नाही असा समज गावाकडे का आहे? शेतीमध्ये पैसा असेल तर तसे पटवून देणारे कोणी काम करते का? यावर उत्तर अर्थातच आहे.
पुण्यापासून ६० कि.मी. अंतरावर वेल्हे तालुक्यातील पासली या गावामध्ये आशिष क्षीरसागर यांनी गेल्या दहा वर्षामध्ये शेती आणि त्याला अनुषंगिक उद्योग सुरु करण्यासाठी पाउलवाट फाउंडेशनची स्थापना केली आणि तिथल्या युवकांना गावामध्येच काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. पाच वर्षांपूर्वी त्यांचा परिचय झाला आणि त्यांचे काम समजून घेण्यासाठी पासली गावाला भेट दिली. आशिष क्षीरसागर यांचा उद्देश गावातील लोकांना गावामध्येच उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन देणे होता आणि आहे. परंतु पासली गावामध्ये काम करण्यास सुरुवात केल्यावर आशिष यांच्या लक्षात आले की या गावामध्ये चांगल्या शिक्षणाची सोय नाही. इथल्या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी अनेक मुले जवळपासच्या गावांमधून डोंगर दऱ्या पार करून किमान ५ कि.मी. चालत येतात. त्यामुळे आशिष क्षीरसागर यांनी मुलांचे वसतिगृह बांधण्यास सुरुवात केली.
एक-दोन मुलांनी आशिष यांच्या घरामध्ये राहण्यास सुरुवात केली आणि आज तिथे २५ मुले राहतात आणि पासली गावातल्या शाळेत शिक्षण घेतात. मुलांचे आई-वडील शेतावर काम करतात परंतु मुलांना शेतात काम करण्याची इच्छा नाही, कारण शेतीमध्ये पैसा नाही ही ठाम समजूत. यावर उपाय शोधता शोधता आशिष क्षीरसागर यांनी अनेक उद्योग सुरु केले आणि त्याचा ताबा गावातल्या रहिवाश्यांना दिला. अशाप्रकारे गावकऱ्यांमध्ये उद्योजकता रुजवणाऱ्या आशिष क्षीरसागर यांनी सुरु केलेल्या अनेक उद्योगांचा हा परिचय.
आकाशकंदील
गावातील शेतकरी शेतात तांदुळाचे पिक घेतात त्याचबरोबर बांबूचे पिक जवळपासच्या शेतात अमाप असल्याचे आशिष यांच्या लक्षात आले. त्या बांबूचे काय करायचे, त्यामधून पैसा कसा मिळवावा याची माहिती गावातील शेतकऱ्यांना नव्हती. त्यामुळे आशिष यांनी गावकऱ्यांना बांबूपासून आकाश कंदील तयार करण्यास शिकवले. प्रयोग स्वरूपात ५० आकाशकंदील तयार केले ते त्याच वर्षीच्या दिवाळीत हातोहात विकले गेले. दुसऱ्या वर्षी २५० आकाशकंदील तयार केले आणि गावकऱ्यांना बरोबर घेऊन पुण्यामध्ये विक्री करण्याचे नियोजन केले. असे करता करता हाच उद्योग आता बहरला आहे आणि प्रत्येक दिवाळीच्या सिझनमध्ये पासली गावातील गावकऱ्यांनी बांबूपासून तयार केलेले २००० आकाशकंदील तयार केले जातात आणि त्याच सिझनमध्ये सर्व विकले जातात.
गेल्या दोन वर्षातील लॉकडाऊनच्या काळामध्येही हा उद्योग दिवाळीच्या आधी ३ महिने सुरु होता ज्यामधून पन्नास कुटुंबाना रोजगार मिळाला आहे आणि काही आकाशकंदील अमेरिकेमध्येसुद्धा निर्यात करण्यात यश मिळाले आहे. अशाप्रकारे गेल्या काही वर्षामध्ये गावकऱ्यांना या उद्योगामधून एकूण ३ लाख रुपये मिळवता आले आणि त्यामधून त्यांची दिवाळी साजरी झाली, हे विशेष. आता गावकरी बांबूची बाटली, बांबूचा पेन करतात तसेच या किफायतशीर पिकामधून अजून काही वस्तू बनवता येतील का याची चाचपणी सुरु आहे.
करवंदाचे सरबत – जॅम
पासली आणि आसपासच्या गावामध्ये सर्वात मुबलक असणारे पिक म्हणजे करवंदे. त्याचे काय करायचे हा शेतकऱ्यांच्यापुढे मोठा प्रश्न होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी आशिष क्षीरसागर दापोलीमध्ये जाऊन प्रशिक्षण घेऊन आले आणि करवंदाचे सरबत तयार केल्यानंतर वर्षभरात फक्त ८० बाटल्याच विकल्या गेल्या. त्यानंतर अधिक धाडस करून दुसऱ्या वर्षी तयार केलेल्या २५० बाटल्या पंधरा दिवसात विकल्या गेल्या. आता या मागणीचा विचार करून यावर्षी १,००० किलो करवंदाचे सरबत तयार करण्याचे उद्दिष्ट आहे आणि शहरातून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता ते उद्दिष्ट सहज साध्य होईल, यात शंका नाही.
यावर्षी या उद्योगामधून गावकऱ्यांना किमान दोन लाख रुपये मिळतील असा विश्वास आशिष क्षीरसागर यांनी व्यक्त केला. करवंदाचे जॅम आणि करवंदाचे लोणचे या उत्पादनाला अशीच मागणी मिळत आहे, त्याला मिळणारा प्रतिसाद बघता काही वर्षांपूर्वी मुबलक असणाऱ्या करवंदाचे काय करायचे असा प्रश्न असलेले हे पिक जोमात लावावे लागेल असे दिसते.
शेती
पासली आणि आसपासच्या गावामध्ये तांदूळ पिकवला जातो. जून-जुलैमध्ये जोरदार पावसात भात-लावणी झाल्यानंतर नोव्हेंबरपर्यंत तांदूळ तयार होतो. त्यानंतर त्या जमिनीचा दुबार पेरणीसाठी वापर करण्याचे तंत्र आशिष यांनी गावकऱ्यांना शिकवले. अर्थात काही शेतकऱ्यांना हे माहित होते परंतु त्यामधून काही उत्पन्न मिळेल हा विश्वास नव्हता, तो आशिष यांच्यामुळे मिळाला. आज कोकणातले बरेच शेतकरी दुबार पेरणी करण्याचे टाळतात ज्यामुळे सहा महिने त्या शेत जमिनीमधून कोणतेही उत्पन्न मिळत नाही.
आशिष यांनी संद्रीय शेती करणे, बी-बियाणे देणे, हमी भाव देणे अशा उपक्रमामधून पासली आणि आसपासच्या गावातील शेतकऱ्यांना शेतीमधून पैसा मिळू शकतो असा आत्मविश्वास दिला आहे. तरीही अजूनही गावाकडील अनेक शेतकरी दुबार शेती करण्यास तयार नाहीत. भातानंतर कांदा, रताळी, बटाटा, मुळा, हरभरा, काळा वाटाणा, गहू, ज्वारी, मेथी, कोथिंबीर अशी पिके जमिनीचा पोत समजून, पाण्याचे नियोजन करून लावण्यासाठी कुंबळे गावातील शेतकरी, आशिष यांच्या अथक प्रयत्नानंतर तयार झाले आहेत.
भाजणी
गावामधील महिलांना रोजगार मिळावा यासाठी शहरातील मागणीचा अभ्यास करून आशिष क्षीरसागर यांनी गावातील महिलांना जात्यावरील पिठाची भाजणी तयार करून विकण्याचे तंत्र शिकवले आहे. अर्थात गावातील महिला घरगुती वापरासाठी पिठाची भाजणी जात्यावर पूर्वापार करत आहेत परंतु त्याला शहरात मागणी आहे आणि ती भाजणी नियमितपणे जात्यावर दळून शहरात विकता येते आणि त्यामधून आपले कुटुंब चालवता येते हा विश्वास देण्यात आशिष यशस्वी झाले आहेत. आता गावातील ज्येष्ठ महिला १२ प्रकारचे डाळ-तांदूळ चुलीवर भाजून जात्यावर दळून जीवनसत्वयुक्त भाजणी तयार करून विकतात. नुकत्याच सुरु झालेल्या या उद्योगामुळे एका महिन्यात २०० किलो भाजणी विकली जात आहे, हे विशेष.
पासली गावाजवळच्या फार्म हाउसमध्ये, Agro टुरिझमच्या संकल्पनेनुसार शहरातील लोक जेव्हा इथे विकेंड साजरा करण्यासाठी येतात, तिथे गावकरी छोटा स्टॉल लावून असे पदार्थ विकतात, ज्याला गावरान पदार्थ या स्वरूपात भरपूर मागणी आहे. अशी मागणी तयार करण्याची कल्पना सुचवण्याचे श्रेय आशिष यांचे आहे.
पासली आणि आसपासच्या गावामध्ये उद्योजकतेचे बीज रुजवणारे आशिष क्षीरसागर यांचा उद्देश गावकऱ्यांना स्वयंपूर्ण करणे हा आहे. त्यांनी सांगितले की “मी त्याना पिकाचे उत्पादन, त्यामधून तयार होणारे पदार्थ, त्याचे मार्केटिंग, त्याची विक्री अशा सर्व बाबींचे असे ट्रेनिंग देत आहे की त्यांनी यापुढे माझ्यावरही अवलंबून राहू नये”. शहरामधून कोणी गावाकडच्या लोकांना काही सल्ले द्यायला गेले तर ते सल्ले सकारात्मकरीत्या घेतले जात नाहीत याचे कारण “तुम्हाला गावाकडची परिस्थिती माहित नाही” असे सांगितले जाते.
यावर उपाय म्हणून आशिष क्षीरसागर यांनी त्या गावामध्येच वास्तव्य करण्यास सुरुवात केली. आज गावामधील बरेचजण बांबूपासून वस्तू बनवण्यास तयार असले तरी पहिला आकाशकंदील तयार करण्यासाठी आशिष यांना बरेच महिने प्रयत्न करावे लागले. शेती आणि शेती-सलग्न उद्योगामधून पैसा मिळतो असा विश्वास गावातल्या तरुणाला देण्याचे आशिष यांचे उद्योजकतेमधून पूर्ण गाव स्वयंपूर्ण करण्याचे कार्य म्हणूनच मोलाचे आहे.
आशिष क्षीरसागर, पाउलवाट फाउंडेशन,
पासली गाव, ता. वेल्हे, जि. पुणे –
9923204484
– सुहास किर्लोस्कर
(चित्रपट आणि संगीत विषयांचे अभ्यासक,
विविध विषयांवर लेखन )
suhass.kirloskar@gmail.com