पुण्याच्या कंपनीची कमाल! ४० लाखापेक्षा जास्त बांबू टुथब्रशची निर्मिती आणि १८ देशांमध्ये निर्यात

पुण्याच्या कंपनीची कमाल! ४० लाखापेक्षा जास्त बांबू टुथब्रशची निर्मिती आणि १८ देशांमध्ये निर्यात

 

शेतकरी असो वा कोणताही उद्योजक, वेगळा विचार करणारा, काही धाडस करणारा यशस्वी होऊ शकतो. पारंपारिक शेतीपेक्षा वेगळ्या पद्धतीची किंवा वेगळ्या पिकाची शेती केली तर फायदेशीर होऊ शकते असा विश्वास असणारा आणि शेतकऱ्याना तसा विश्वास देणारा उद्योजक भेटला तर? “वेगळे पिक म्हणजे काय? बांबूची शेती? त्या बांबूचा आपल्याकडे काय उपयोग? टोपल्या, शिडी करणे हाच ना?” अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर “बांबूचे टुथब्रश” असे उत्तर दिल्यानंतर कोणीही विचारेल? “अहो, पण ते टुथब्रश घेणार कोण?” असा प्रश्न येणे साहजिक आहे. परंतु त्यावर उत्तर आहे ‘बाबू इंडिया’ चे प्रवर्तक योगेश शिंदे. 

 

चौदा वर्षाच्या आय.टी. मधील अनुभवामध्ये योगेश यांनी डेव्हलपर, प्रोग्राम मॅनेजर पासून ‘कंट्री हेड’ अशा विविध पदांवर काम करता करता जवळजवळ २० देशांमध्ये भ्रमंती केली आणि आय.टी. व्यतिरिक्तही निरीक्षणातून जग बघण्याचा अनुभव घेतला. त्यानंतर योगेश यांनी एक वर्षाचा ब्रेक घेतला आणि स्वतःची ओळख निर्माण करणे, भारतातील शेतकऱ्यांच्याबरोबर काम करणे, काहीतरी हटके करताना मानसिक समाधान मिळवणे या उद्देशाने अभ्यास सुरु केला. या काळात योगेश यांना ‘बांबू’ या पिकाबद्दल माहिती मिळाली आणि २०१६ साली ‘बांबू इंडिया’ ही कंपनी सुरु केली.

 

सुरुवातीला बांबूपासून गिफ्ट आर्टिकल तयार केली, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला. याच दरम्यान प्लास्टिकच्या टुथब्रशचे गंभीर दुष्परिणाम योगेश यांच्या लक्षात आले. १९३८ पासून प्लास्टिक टुथब्रशचा वापर करण्यास सुरुवात झाली. गेल्या ८० वर्षात असंख्य ग्राहकांनी अनेक टुथब्रश वापरले आणि सहा महिन्यांनी फेकून दिल्यावर नवे प्लास्टिक टुथब्रश विकत घेतले. आपल्यापैकी प्रत्येकाने लहानपणापासून वापरून फेकून दिलेले सर्व टुथब्रश या पृथ्वीवर कुठेतरी आहेत ज्यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. प्लास्टिक कचऱ्याचे दुष्परिणाम, प्लास्टिक वापर टाळणे, निसर्गामधून मिळणाऱ्या आणि निसर्गात सहज मिसळू शकणाऱ्या वस्तूंचा वापर करण्याबद्दल काहीजण सजग आहेत परंतु त्यांना पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे योगेश यांनी प्लास्टिक टुथब्रशला पर्याय म्हणून बांबूपासून टुथब्रश तयार केले.

 

कालांतराने बांबूपासून बनवलेल्या टूथब्रशला मागणी वाढली. त्यामधील फायदे ग्राहकांच्या लक्षात आले आणि त्यानंतर ‘ओरल बी’ कंपनीसाठी अमेरिका-इंग्लंडमधील मार्केटकरिता टुथब्रश तयार करून देण्याचे काम ‘बांबू इंडिया’ला मिळाले. आजपर्यंत ‘बांबू इंडिया’ने ४० लाखापेक्षा जास्त बांबू टुथब्रश तयार केले आहेत आणि भारताव्यतिरिक्त १८ देशामध्ये निर्यात केले आहेत. नैसर्गिक बांबूपासून बनवलेला आणि वापरणे बंद केल्यानंतर निसर्गात सहजासहजी मिसळणारा बांबू टुथब्रश भारतामधील २००० पेक्षा अधिक गावा-शहरामध्ये पोहोचला आहे.

 

‘eयशस्वी उद्योजक’ 20 मित्रांसोबत SHARE करा आणि मिळवा एक खास आकर्षक भेट!

 

योगेश याना शार्क टँकच्या एका एपिसोडमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली ज्यामध्ये बांबू इंडियाला वित्तपुरवठा करण्यास अनेक जज तयार झाले. युनायटेड नेशन्सकडून ‘बांबू इंडिया’ला निमंत्रण मिळाले. योगेश यांचा TedEx talk झाला आहे. बांबू टुथब्रश असे इंटरनेटवर शोधले तर बांबू इंडियाचेच टुथब्रश दिसतात जे आपण Amazon सारख्या वेबसाईटवरून खरेदी करू शकतो. रोज शंभर टुथब्रश तयार करणारी कंपनी आता रोज ५०,००० टुथब्रश तयार करते, हे विशेष. बांबूचे उत्पादन करण्यात भारत हा देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. तरीही आपण बांबूचा तितका वैविध्यपूर्ण वापर करत नाही, हे योगेश यांच्या लक्षात आले. त्यामुळे २०१५ साली बांबू टूथब्रश तयार करणारी ‘बांबू इंडिया’ ही भारतातील पहिली कंपनी आहे. आज या कंपनीमध्ये ५० कर्मचारी काम करतात, १५० जणांना अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळाला आहे आणि विशेष म्हणजे ४,५०० शेतकऱ्यांच्याबरोबर ही कंपनी काम करत आहे. 

 

योगेश शिंदे आय.टी. क्षेत्रात काम करण्याच्या निमित्ताने विविध देशात फिरत होते त्यावेळी त्यांनी जर्मनीमध्ये लाकडी टुथब्रश बघितला आणि असा ब्रश भारतात का तयार होत नाही, असा त्याना प्रश्न पडला. योगेश यांनी सांगितले की बांबूचे टुथब्रश चीनमध्ये २०१५ सालापासून तयार होत आहेत आणि त्यामध्ये चीन देशाने आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांचे कारखाने बघण्यासाठी योगेश यांनी चीनमध्ये काही आठवडे मुक्काम केला. तिथल्या उद्योजकांनी योगेश यांना त्यांचे कारखाने दाखवले, विचारलेल्या सर्व प्रश्नाना मनमोकळेपणाने उत्तरे दिली आणि भारतात असा उद्योग सुरु करण्यास प्रोत्साहन दिले, हे विशेष. याचप्रमाणे योगेश आता कोणाही युवा उद्योजकाला मार्गदर्शन करण्यास तयार आहेत. योगेश यांनी सांगितले की आज कोणत्याही कॉलेजमध्ये उद्योजक कसे बनावे यावर फार कमी उद्योजक व्याख्यान देतात. आज खरी त्याचीच गरज आहे ज्यामुळे युवा वर्गाला उद्योजक बनण्याचे प्रोत्साहन मिळेल. 

 

 

– सुहास किर्लोस्कर

(चित्रपट आणि संगीत विषयांचे अभ्यासक,
विविध विषयांवर लेखन )
suhass.kirloskar@gmail.com

एकाच शेतजमिनीवर वेगवेगळे थर लावून अनेक मजल्यांवर शेती करण्याला हायड्रोपो...

नोकरी करतानाच आजूबाजूच्या कंपन्यांचा अभ्यास केला आणि मालाची विक्रीही  एक...

आय.टी. इंडस्ट्रीमध्ये चित्रपटसृष्टीप्रमाणे अनेकांना हिरो व्हायचे असते, ग्...

विजय माने या चाळीशीतल्या तरुणानं 2017 साली आपल्या दोन सहकार्‍यांसमवेत मुंबईत...

‘छत्रपती शिवाजी महाराज’ हा महाराष्ट्रातील सर्वांच्याच अभिमानाचा विषय आहे...