जमाना प्रेझेंटेशनचा आहे, वस्तू, उत्पादन, सेवा काहीही असो, त्याचं पॅकिंग आकर्षकच पाहिजे!

जमाना प्रेझेंटेशनचा आहे, वस्तू, उत्पादन, सेवा काहीही असो, त्याचं पॅकिंग आकर्षकच पाहिजे!

 

वेगवेगळ्या आकाराचे, रंगसंगतीचे, डिझाईनचे वैविध्यपूर्ण बॉक्सेस हा सगळ्यांच्या आवडीचा विषय असतो. बऱ्याचदा त्या बॉक्समधली वस्तू वापरून झाली तरी तो बॉक्स मात्र सांभाळून ठेवला जातो. कधी तो पुन्हा उपयोगात आणण्यासाठी तर कधी केवळ त्याच्या वेगळेपणामुळे तो ठेवला जातो. मोबाईल, इतर लहानसहान उपकरणं, दिवाळी किंवा लग्न समारंभांत भेटवस्तू या साऱ्यांसाठी वापरले जाणारे बॉक्सेस हे खूपच युनिक असतात. याच कारणाने अंबानीच्या मुलांच्या लग्नातल्या पत्रिका चर्चेत राहिल्या होत्या.

 

कोणताही व्यावसायिक आपण बनवत असलेल्या वस्तू आकर्षक पद्धतीने ग्राहकाला देण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्यामागे आकर्षक दिसण्याबरोबरच आतली वस्तू ग्राहकापर्यंत व्यवस्थित पोहोचावी हाही विचार असतो. प्रत्येक वस्तूचा आकार, प्रकार वेगवेगळा असतो आणि त्यानुसार त्यासाठी लागणारी पॅकेजिंगचे प्रकारही वेगवेगळे असतात. वेगवेगळ्या वस्तूंना प्रिमियम पॅकेजिंग करून देणाऱ्या तरूण उद्योजक साहिल राव याची ही यशकथा अनेक तरूणांना प्रेरक ठरावी अशीच आहे. 

 

जर्मनीमध्ये पॅकेजिंग क्षेत्राशी निगडित एक वर्षाचा डिप्लोमा केल्यानंतर साहिलने २०११ साली आकृती प्रिंटर्स या त्याच्या वडिलांच्या व्यवसायात काम सुरू केलं, पण ऑफसेट प्रिंटिंगशिवाय वेगळं काही तरी केलं पाहिजे असं त्याला सारखं वाटतं होतं. हा विचार मनात घेऊनच तो काम करत होता. अर्थातच पॅकेजिंगमधेच काहीतरी वेगळं करावं असा त्याचा विचार होता. बॉक्सेसमधला रिजिड बॉक्सेस (मोबाईल ज्यामध्ये येतो तो प्रकार) हा प्रकार त्याने निवडला आणि अखेरीस २०१४ साली त्यानी ‘अनबॉक्स’ सुरू केली.

 

हा प्रकार निवडण्यामागेही विचार होता. प्रिमियम पॅकेजिंग या विशिष्ट प्रकारात काम करणारे लोक पुण्यात तुलनेनं कमी आहेत. मुंबई, दिल्लीमध्ये यासाठी काम करणारे जास्त उद्योजक आहेत. पण, या सर्व व्यावयायिकांकडे तयार माल मोठ्या प्रमाणात असतो. त्यामध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार बारीकसारीक बदल करून ते ग्राहकाला पॅकेजिंगचे पर्याय देतात. मूळात ग्राहकाचं उत्पादन आणि अंतिम ग्राहक याचा विचार त्यात अगोदर केलेला नसल्यामुळे त्यात वेगळेपण दिसत नाही. साहिलने या गोष्टी नीट लक्षात घेतल्या आणि ग्राहकांच्या गरजेनुसार रिजिड बॉक्सेस बनवून द्यायच्या हे अनबॉक्सचं मुख्य उद्दिष्ट ठरवलं.

 

ग्राहकाच्या उत्पादनाचा विचार करून त्याप्रमाणे बॉक्स बनवायचा ही त्याची कल्पना हळूहळू उचलून धरली गेली. आटोपशीर पॅकेजिंगमुळे प्रॉडक्ट उठावदार दिसतं. वेगळेपणामुळे चटकन ओळखताही येतं. अनबॉक्स आपलं आणखी एक वैशिष्ट्य जपून आहे. ते म्हणजे एखाद्या ग्राहकाला एकच बॉक्स जरी हवा असेल तरी तो सुद्धा बनवून देते. ही त्यांची विशेष खासियत (यु.एस.पी) आहे. या सगळ्या वैशिष्ट्यांमुळेच चितळे बंधू मिठाईवाले, परांजपे स्कीम्स, अविनाश भोसले, नायका, केलझाई यासारख्या वेगवेगळ्या ८५ मान्यवर ग्राहकांसाठी कस्टमाइझ्ड बॉक्सेस बनवत आहेत.

 

इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आताचा जमाना हा प्रेझेंटेशनचा आहे. तुमची वस्तू, उत्पादन, सेवा कोणतीही असो ती देताना आकर्षक पॅकिंगमध्ये दिली तर ग्राहकाला समाधान वाटतं. चितळे बंधूंच्या मिठाईसाठी जसे आकर्षक बॉक्स लागतात तसेच ते एखाद्या बांधकाम व्यावसायिकालाही लागतात. एखादा ग्राहक जेव्हा खूप मोठ्या किमतीचं, आलिशान घर बांधकाम व्यावसायिकांकडून घेतो, तेव्हा त्याचा ताबा घेताना घराची किल्ली एखाद्या मखमली डबीतून मिळाली, घराशी संबंधीत कागदपत्रं साध्या फाईलऐवजी सुटसुटीत बॉक्समध्ये मिळाली तर स्वत:च्या घराचं मोल त्याच्या लेखी आणखीनच वाढेल. असाच विचार प्रत्येकच उद्योग-व्यवसायात करता येऊ शकतो. अनबॉक्सने हे नेमकेपणाने हेरलं आणि आपला ग्राहकवर्ग विस्तारत ठेवला.

 

‘eयशस्वी उद्योजक’ 20 मित्रांसोबत SHARE करा आणि मिळवा एक खास आकर्षक भेट!

 

अनबॉक्स सुरू केल्यानंतर साहिल पहिलं एक दीड वर्ष दोन्ही व्यवसायात लक्ष देत होता. पण अनबॉक्सचं काम वाढायला लागल्यानंतर मात्र त्याने पूर्णवेळ ‘अनबॉक्स’चं काम करायला सुरूवात केली. त्यावेळी या व्यवसायासाठी लागणारे कुशल कारागीर पुण्यामध्ये फारसे नव्हते. ते मुंबई आणि दिल्लीमध्ये उपलब्ध होते. वर सांगितल्याप्रमाणे तिथे ग्राहकाभिमुख कामापेक्षा मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणं याला जास्त प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे तिथल्या कारागीरांकडे भरपूर काम असतं. हातात काम असताना कारागीर बसलेलं बस्तान सोडून पुण्यासारख्या शहरात येणं अवघड होतं. मग सुरूवातीला काही दिवस साहिल घेतलेल्या ऑर्डर्स मुंबईहून पूर्ण करून द्यायला लागला. पण, आपल्यासाठी जर गुणवत्ता महत्त्वाची आहे तर हे असं दुसऱ्याच्या भरवशावर काम घेणं रास्त नाही, हे लक्षात आल्यावर काही कारागीरांना पटवून पुण्याला आणण्याचं काम साहिल यानं केलं. ते सोपं नव्हतं. पुण्याला यायला हे लोक नकार देत होते. पण अखेरीस त्यांना पुण्याला आणण्यात साहिल यशस्वी झाला आणि एक मोठी कामगिरी त्याने सर केली. 

 

या व्यवसायामधला पहिला ग्राहक साहिलने कसा मिळवला हे सांगताना तो म्हणाला की, ‘एका ओळखीच्या बांधकाम व्यावसायिकाकडे कसला तरी कार्यक्रम होता. तो नेहेमीप्रमाणे निमंत्रण पत्रिका छापणार होता. मी त्यांना माझी कल्पना सांगितल्यावर त्यांनी हा प्रयोग करायला होकार दिला. त्यांच्या मागणीनुसार मी बॉक्स मुंबईला बनवून घेतले आणि पुण्यात आणले. पण त्यात काही त्रुटी होत्या. ऑर्डर छोटी असल्यामुळे त्यामध्ये मी सांगितलेले बदल केले आणि ऑर्डर पूर्ण केली. पण या सगळ्या गोंधळामुळे मीच या कामावर खुश नव्हतो. पुढे कधीही असा प्रकार होऊ दिला नाही आणि १०० टक्के गुणवत्ता जपायचा प्रयत्न सातत्याने करतो आहे.’

 

व्यवसाय म्हटलं की जागा, मशिनरी, भांडवल हे सगळं आलंच. कोणत्याही व्यवसायात जागा हा मुख्य प्रश्‍न असतो. पण, वडिलांचा प्रिंटींग व्यवसाय असल्यामुळे आणि प्रिंटींग साहिलच्या व्यवसायासाठी आवश्‍यक असल्याने त्यानी त्याचठिकाणी आपल्याही व्यवसायाचा सेटअप केला. यामुळे जागेचा मुख्य प्रश्‍न सुटला. सध्या अनबॉक्सची २००० स्के.फूटांची जागा आहे. याशिवाय मशिनरी आणि इतर गोष्टींसाठी लागणारं भांडवल बँकेकडून कर्ज घेऊन साहिलने उभं केलं. पॅकेजिंगच्या या व्यवसायासाठी कोणतेही विशेष परवाने, रजिस्ट्रेशन लागत नाही. लघु व मध्यम उद्योगांसाठी रजिस्टर होऊन, जी.एस.टी, पॅन या इतर गोष्टींची पूर्तता केल्यावर व्यवसाय सुरू करता येतो. शिवाय अनबॉक्स त्यांची उत्पादनं निर्यात करत असल्यामुळे निर्यातदारांसाठी लागणारी नोंदणी करणं त्यांना आवश्‍यक होतं. 

 

निर्यात करता येईल असा माल बनवणं म्हणजे गुणवत्तेत सातत्य राखणं महत्त्वाचं आहे. काहीही झालं तरी काम हे उत्तमचं झालं पाहिजे हे साहिलला त्याच्या वडिलांकडून मिळालेलं बाळकडू आहे. त्यामुळे बॉक्स बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल हाही चांगल्या प्रतिचा असला पाहिजे याकडे त्याचं लक्ष असतं. हा सर्व कच्चा माल मुंबई आणि दिल्ली मधून घेतला जातो आणि मग त्यावर ग्राहकाच्या गरजेनुसार हव्या त्या आकारामध्ये बॉक्सेस बनविले जातात. या बॉक्सचं डिझाइन हे ग्राहकाच्या मागणीनुसार बदलत असतं. बॉक्समध्ये ठेवायची वस्तू कोणती आहे आणि ती नीट कशी राहिल यावर विचार करून कलात्मकतेनी हे बॉक्स डिझाइन केले जातात. यावरचं ग्राफिक, ग्राहकाचा लोगो हे ग्राहकाकडून घेतलं जातं किंवा मागणीनुसार बाहेरून बनवून घेतलं जातं. डिझाइनर आणि इतर लोक मिळून एकूण ११ ते १२ लोकांची टीम अनबॉक्ससाठी काम करते. आत्तापर्यंत या टीमने २६ ते ३० हजार ग्राहकाच्या गरजेनुसार बॉक्स बनवले आहेत.

 

गुणवत्तेसोबतच किती प्रमाणात उत्पादन करायचं हा विचारही तितकाच महत्त्वाचा असतो. अनबॉक्सचा मुख्य उद्देश हा जरी गुणवत्तेवर भर देण्याचा असला तरी जर एखाद्या ग्राहकाला अगदी कमी प्रमाणात बॉक्सेस हवे असतील तरी तेही अनबॉक्स देते आणि जास्त प्रमाणावर हवे असतील तरी तेही देते.

 

नवीन व्यक्तीला या व्यवसायात यायचं असेल तर बाजारात नेमकी कोणत्या प्रकारच्या बॉक्सची गरज जास्त आहे याचा अभ्यास करून आपल्याला नक्की कोणत्या प्रकारचे बॉक्स बनवायचे आहेत हे पक्कं ठरवणं गरजेचं आहे. त्यानुसार काम मिळवणं महत्त्वाचं आहे. पॅकेजिंगच्या क्षेत्रात स्पर्धा जास्त आहे त्यामुळे आपल्याला नक्की काय द्यायचं आहे याचा विचार करूनच या व्यवसायात यावं असं साहिल सांगतो. 

 

साहिलला व्यवसायात स्थिरस्थावर होण्यासाठी ३ वर्षाचा कालावधी लागला. पहिली दीड वर्षं नफ्यातोट्याचा फारसा विचार न करता सातत्याने काम करत राहणं गरजेचं आहे. त्यानंतर व्यवसाय यशस्वी आहे की अयशस्वी हे बघितलं पाहिजे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये घरच्यांचा पाठिंबा तितकाच महत्त्वाचा ठरतो. सुरूवातीला साहिलच्या घरच्यांनी काळजीपोटी थोडा विरोध केला. पण, नंतर थोड्या महिन्यांनी तो पण निवळला. 

 

कुठलाही व्यवसाय म्हणजे चढ उतार हा असणारच. पण, पॅकेजिंगच्या या व्यवसायाला मरण नाही. आणि लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन व्यवसायाला मिळालेल्या चालनेमुळे पॅकेजिंग क्षेत्राला खूप मागणी वाढली आहे. आणि कोणत्याही क्षेत्रात कष्ट करण्याची जिद्द असेल तर संधीचं सोनं नक्कीचं होऊ शकतं.

 

एकदा एका लाईटचे स्विच बनवण्याऱ्या कंपनीसाठी बॉक्स बनवण्याचं काम अनबॉक्सला मिळालं होतं. त्या कंपनीला हटके डिझाईन आणि ग्राहकाला आकर्षक वाटेल असं डिझाईन हवं होतं. अनेक प्रयोग करून वेगवेगळी डिझाईन्स केल्यावरही त्यांना काही पसंत पडत नव्हती. अखेरीस हा ग्राहक आपण सोडून द्यावा असा विचार साहिल करायला लागला. पण अखेरीस एक शेवटचा प्रयत्न करून पाहू असं म्हणत स्विचच्या मागे वॉलपेपर लावून ग्राहकाला दाखवला. तो त्या कंपनीला खूप आवडला आणि त्याच बॉक्ससाठी पुढे ‘अनबॉक्स’ला ‘बेस्ट इन्होवेशन’चं नॅशनल अवॉर्ड मिळालं.

 

– पद्माक्षी घैसास

युनिक फीचर्समध्ये कार्यरत, विविध विषयांवर लेखन

padmakshi.ghaisas@gmail.com

 

एकाच शेतजमिनीवर वेगवेगळे थर लावून अनेक मजल्यांवर शेती करण्याला हायड्रोपो...

नोकरी करतानाच आजूबाजूच्या कंपन्यांचा अभ्यास केला आणि मालाची विक्रीही  एक...

आय.टी. इंडस्ट्रीमध्ये चित्रपटसृष्टीप्रमाणे अनेकांना हिरो व्हायचे असते, ग्...

विजय माने या चाळीशीतल्या तरुणानं 2017 साली आपल्या दोन सहकार्‍यांसमवेत मुंबईत...

‘छत्रपती शिवाजी महाराज’ हा महाराष्ट्रातील सर्वांच्याच अभिमानाचा विषय आहे...