‘दणकट पायजमा’ आणि ‘मुलायम बंडी’, लोकांच्या मनात असा रुजला कपड्यांचा ब्रँड

‘दणकट पायजमा’ आणि ‘मुलायम बंडी’, लोकांच्या मनात असा रुजला कपड्यांचा ब्रँड

 

शालगरचे संस्थापक कै. शंकरसा शालगर हे साताऱ्याहून पुण्यात नेमके कधी स्थलांतरित झाले हे माहिती नाही पण काही काळ त्यांनी खडकी दारूगोळा कारखान्यात नोकरी केली. हा काळ फाळणीनंतरचा होता. अनेक सिंधी लोकांनी पुण्यात आपल्या व्यवसायाला सुरुवात केली होती. याच काळात शंकरसा शालगर यांच्याही व्यवसायाला सुरुवात झाली. वस्त्र ही मनुष्याची मूलभूत गरज आहे. दैनंदिन जीवनासाठी अत्यावश्यक असलेल्या वस्त्रांची गरज ओळखून १९४८ साली शंकरसा शालगर यांनी शालगर होजिअरीची स्थापना केली. त्या काळात ना मोठी जागा होती ना मोठे दुकान होते. शालगर होजिअरी हे नाव असलेल्या हातगाडीवर त्यांनी आपल्या व्यवसायाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्या काळात माणसाच्या गरजा कमी होत्या, त्यामुळे वस्त्रांमध्ये उपलब्ध असलेले प्रकारही अगदी मोजकेच होते. धोतर, बंडी, पायजमा इ. अत्यावश्यक गोष्टी असल्याने त्यांनी याच्या विक्रीचा व्यवसाय करायचा हे निश्चित केले. जसजशी व्यवसायात वाढ होत गेली. तसतशी जागेची कमतरता भासू लागली.

 

कपड्यांच्या गुणवत्तेच्या बाबतीत शालगर यांच्याबद्दल एव्हाना लोकांमध्ये खात्री निर्माण झाली होती. व्यवसायवाढीसाठी त्यांनी आपल्या बंधूंबरोबर १९५३ साली गजानन होजिअरी या नावाने दुकान सुरू केले. ‘बाळासाठी सर्व काही’ संकल्पनेला धरून गजानन होजिअरीच्या व्यवसायाचीही वाढ होऊ लागली. कोणताही उद्योजक आपल्या व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्नशील असतोच. शंकरसा शालगर यांच्या बाबतीतही हेच झाले. पाच वर्षांतील त्यांचे प्रयत्न आणि कष्ट फळाला आले. जागेची कमतरता जाणवू लागली. व्यवसायवाढीसाठी शंकरसा यांनी दुकान घ्यायचे ठरवले. गजानन होजिअरी हे दुकान त्यांच्या भावाने चालवायचे असं ठरलं. १९५८ साली अप्पा बळवंत चौकातील शालगर होजिअरीचे पहिले दुकान पुण्यात सुरू झाले.

 

मर्यादित कष्टांवर थांबणाऱ्यातले शंकरसा शालगर नव्हते. प्रचंड मेहनत करून १९६५ साली शनिपार चौकात देसाई बंधू आंबेवाल्यांजवळ दुकान सुरू झाले. चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी या जोरावर १९७३ साली शनिपार चौकातच जुन्या दुकानासमोर नवीन दुकान सुरू झाले. हातगाडीवर व्यवसायाला सुरुवात झाली असताना आता स्वत:ची तीन दुकाने झाली होती. हा त्यांचा प्रवास त्यांच्या तीनही मुलांनी अगदी कळायला लागल्यापासूनच पहिला होता. श्रीकांत, प्रशांत आणि मिलिंद ही शंकरसा शालगर यांची तीन मुले. नूतन मराठी विद्यालय मुलांची प्रशाला या शाळेत तिघांचेही शालेय शिक्षण सुरू होते. शाळेत जायच्या आधी समोर असलेल्या दुकानात यायचे, तिथून शाळेत जायचे आणि शाळा संपल्यावर पुन्हा दुकानात यायचे हा अलिखित दिनक्रम होता. त्यामुळे अगदी लहानपणापासून या तिघांचीही दुकानाशी, ओघाने व्यवसायाशी फार जवळून ओळख झाली. शंकरसा शालगर यांनी तीनही मुलांना कष्टांची सवय बालपणापासून लावली होती. एखाद्या सहलीला जायचे असल्यास ते मुलांना सांगायचे, “दुकानाबाहेर बसा. छत्रीला रुमाल लावा आणि ते विका. मुद्दल मला परत करा आणि नफ्याचे पैसे सहलीसाठी वापरा.” अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांनी आपल्या मुलांना कष्ट आणि काम यांचे महत्त्व पटवून दिले. मग सणावारानुसार गणेशोत्सवामध्ये दुकानाच्या आत गणपती विकले जायचे, तर बाहेर रुमाल, जानवी जोड; दिवाळीत दुकानात कपडे तर बाहेर फटाके इ. गोष्टी ही मुले बाहेर बसून विकायची. त्यामुळे ओघाने लहानपणापासून या मुलांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण होत गेला. 

 

१९८२ साली शंकरसा शालगर यांचे अचानक निधन झाले. तेव्हा त्यांचा मोठा मुलगा श्रीकांत हे २१ वर्षांचे, मधला मुलगा प्रशांत हे १७ वर्षांचे तर धाकटा मुलगा मिलिंद हे १४ वर्षांचे होते. वडील गेल्यावर त्यांच्या कौटुंबिक आयुष्यात पोकळी नक्कीच निर्माण झाली, परंतु व्यवसायाचे पुढे काय, हा प्रश्न नक्कीच नव्हता. मुलांना लहानपणापासूनच व्यवसायाची ओळख असल्याने काम पुढे सुरू ठेवणे त्यांना फार अवघड गेले नाही. फक्त दुकानाबाहेर व्यवसाय करत असलेली ही तीनही मुले आता दुकानाच्या आत येऊन जबाबदारीने व्यवसाय सांभाळू लागली. शिवाय १९७९ पासूनच शांता शालगर या शंकरसा यांच्या पत्नीने व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केलेली होती. २००४ पर्यंत त्या सतत मुलांच्या बरोबरीने दुकानात असायच्या. शालगर बंधुंना त्यांचा मोठाच आधार या काळात मिळाला.

 

वडिलांनी उभा केलेला व्यवसायाचा पसारा त्या काळात खरंच मोठा होता. व्यवसायवृद्धीच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले. नवनवीन संकल्पना घेऊन त्या अमलात आणल्या गेल्या. शालगर होजिअरीचा यूएसपी बंडी आणि पायजमा असा होता. त्याचा खप वाढावा या दृष्टीने ‘दणकट पायजमा ’ आणि ‘मुलायम बंडी ’ या टॅगलाइन घेऊन मार्केटिंगच्या दृष्टीने विचार सुरू झाला. आजही शालगर यांच्या बंडी आणि पायजम्यांना याच टॅगलाइन्सने ओळखले जाते. अशा वैविध्यपूर्ण संकल्पना वापरत पुढच्या पिढीनेही व्यवसायवृद्धीच्या दिशेने आपले प्रयत्न सुरू केले. पारंपरिक वस्त्रांवर भर देऊन दुकानात मिळणाऱ्या प्रॉडक्ट्समध्ये वाढ केली. शाळांचे गणवेश ठेवायला सुरू केले. मोठ्या लोकांसाठी लागणारी पारंपरिक वस्त्रे म्हणजे धोतर, पायजमा, कुडता या गोष्टी शालगर यांच्याकडे मिळत असत, परंतु लहान मुलींसाठी साडी मिळत नसे. अनेक ग्राहक त्याची मागणी करायला लागले. यातून ‘बेबी साडी’चा जन्म १९८५-८६ साली झाला. २००० साली लहान मुलींसाठी तयार शिवलेली नऊवारी साडी, २०१२ साली लहान मुलींचे तयार पंजाबी ड्रेस तर २०१६ मध्ये ‘साड्यांपासून लहान मुलींसाठी फ्रॉक्स’ हे नवीन उत्पादन सुरू केले. त्यामुळे एकाच दालनात कुटुंबातील सर्वांसाठी पारंपरिक वस्त्रे मिळण्यासाठी शालगर प्रसिद्ध झाले. 

 

एकविसाव्या शतकाची सुरुवात म्हणजे पुण्यातली वाढती बाजारपेठ आणि पुण्याला झालेली तंत्रज्ञानाची ओळख होय. वाढत्या बाजारपेठेमुळे लोकांनी आपल्या व्यवसायात तंत्रज्ञानाचा उपयोग करायला सुरुवात केली. हाताने तयार केलेल्या बिलांच्या जागी मशिनची प्रिंटेड बिले आली. कॉम्प्युटरचा वापर होऊ लागला. आपल्याही व्यवसायात तंत्रज्ञानाचा उपयोग करता येईल, असा विचार करून मिलिंद शालगर यांनी २००० साली कॉम्प्युटर कोर्स केला. ॲडव्हान्स कोर्स होता हा. यातून त्यांनी बिलिंग सॉफ्टवेअरचे ज्ञान घेतले. त्याचा उपयोग त्यांना दुकानांचे अकाउंट्स समजून घेण्यात आणि मेंटेन करण्यात झाला. या कोर्समुळे त्यांना बिलिंग सिस्टीम आणि लॉजिक समजण्यास मदत झाली. यानंतर त्यांनी आपल्या सर्व दुकानांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणून २००६ मध्ये मशिनवर बिले तयार होऊ लागली, तर २००७ पासून बारकोड सिस्टीम सुरू झाली. या मशिन्सच्या वापरामुळे दिवसाचा, महिन्याचा रिपोर्ट त्यांना मिळत गेला. त्यामुळे कुठले प्रॉडक्ट महिन्याला किती विकले जाते याचा अंदाज आला. त्याचा उपयोग ओघाने वस्तूंच्या निर्मितीमध्ये झाला. महिन्याची माहिती समोर आल्यामुळे कामाचे नियोजन करणे सोपे जाऊ लागले. सुरुवातीला कर्मचारीवर्ग बिलांसाठी मशिन हातात घ्यायलाही तयार नसे; परंतु कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन, त्यांना तयार करून शालगर यांच्या सर्व दुकानांमध्ये अशा प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला. 

 

प्रॉडक्ट्स वाढत गेली, व्यवसायाचा विस्तार होत गेला, व्याप वाढला, कामाचा पसारा मोठा झाला तशी आणखी जागेची आणि दुकानांची गरज भासू लागली. कामाचा आवाका वाढला तसे सर्वच बाबींमध्ये लक्ष घालणे यांना अवघड होऊ लागले. त्यामुळे वेळ पुरेनासा झाला. यावर उपाय म्हणून प्रत्येक दुकानात कॅशियरची नेमणूक झाली. दुकानांमध्ये काम करण्यासाठी माणसांची गरज भासू लागली. त्यामुळे कर्मचाऱ्यांची नेमणूक होऊ लागली. २०११ मध्ये अप्पा बळवंत चौकातील पहिल्या दुकानाचा विस्तार झाला. तीन मजल्यांपर्यंत दुकान मोठे झाले. शालगर ब्रँड आता प्रस्थापित झाला. एच.आर.ची गरज भासू लागली. असा एकेक टप्पा पार करून प्रत्येक कामासाठी माणसे नियुक्त करून व्यवसायवाढ करण्याचा निर्णय झाला. २०१५ पासून दुकानांच्या विस्तारासाठी प्रयत्न सुरू झाले. २०१५ ते २०१९ या काळात दर वर्षी एक यानुसार पाच नवीन दुकाने सुरू झाली. आठ दुकानं आहेत. आजमितीला शालगर होजिअरी यांच्याकडे पुण्यातील ४० शाळांचे गणवेश उपलब्ध आहेत. पुण्यातील शाळांचे गणवेश म्हटले की अजूनही शालगर हेच नाव अग्रगण्य आहे. दर वर्षी गणेशोत्सवात भारताबाहेरच्या ठराविक देशांमध्ये गणपतीच्या ढोल-ताशा पथकांसाठी शालगर यांच्याकडून वस्त्रांची निर्यात केली जाते. आज सर्व दुकाने मिळून ७० कर्मचारी त्यांच्यासाठी काम करतात. संक्रांतीला काळ्या रंगाच्या ५००० वस्त्रांची शालगर होजिअरीने विक्री केली. शालगर होजिअरीच्या ग्राहकांबद्दल मिलिंद शालगर सांगतात, “कित्येक कुटुंबांची चौथी पिढी आज आमची ग्राहक आहे. इतक्या पूर्वीपासून ग्राहकांनी शालगर होजिअरीबरोबर विश्वासाचे नाते जपले आहे.” महाराष्ट्राच्या पारंपरिक वस्त्रांचा विचार केला की शालगर यांचे नाव कायमच पुढे असते. प्रत्येक वर्षाच्या सणांची तयारी तीन ते चार महिने आधी सुरू करण्यात येते. महिन्यातून एकदा कामे वाटून घेणे, कर्मचाऱ्यांशी संवाद साधणे, महिन्याच्या कामांचा आढावा घेणे, जबाबदाऱ्या वाटून देणे या गोष्टी केल्यामुळे त्यांना व्यवसायवृद्धीच्या दिशेने पावले टाकण्यास मदत झाली.

 

कपडे ही माणसाची मूलभूत गरज आहे. तसेच भारतीय संस्कृतीमध्ये सणावारांना विशेष महत्त्व दिले गेले असल्याने त्यांच्या या व्यवसायावर मंदीचा परिणाम जाणवला नाही. उलट, शालगर होजिअरीचा व्यवसायाचा आलेख पाहता ते कायमच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या एकूण उत्पादनांपैकी ६० ते ७० टक्के उत्पादने त्यांची स्वतःची आहेत. १९९० सालीच त्यांनी कपड्यांचा कारखाना सुरु केला. या सगळ्या प्रवासात शालगर यांनी जाहिरातींनाही विशेष महत्त्व दिले होते. लोकांपर्यंत पोचण्यासाठी, ब्रँड तयार होण्यासाठी जाहिरातींची गरज पडते. रेडिओ, टीव्ही, वर्तमानपत्र या माध्यमांद्वारे शालगर लोकांपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करत असतात. वेबसाइटवरूनही खरेदीचा पर्याय त्यांनी आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. जाहिरातींबद्दल सांगताना मिलिंद शालगर एक गमतीदार किस्सा सांगतात. २००७ मध्ये कोणी तरी दोन अज्ञात इसम रिक्षांच्या मागे लावल्या जाणाऱ्या जाहिरातींसाठी मिलिंद शालगर यांना भेटले. ते त्यांच्याकडून काही रक्कम घेऊन गेले; परंतु त्या व्यक्ती नंतर गायब झाल्या. समोर आल्याच नाहीत. या घटनेमुळे शालगर यांना अतिशय वाईट वाटले. आपण स्वतःच रिक्षा शोधून त्यांना जाहिराती द्यायच्या असे त्यांनी ठरविले. ओळखीच्या रिक्षाचालकांपासून त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर अनेक रिक्षाचालक जाहिरातींसाठी स्वत:हून त्यांच्याकडे यायला लागले. कोणत्याही एजन्सीकडून या जाहिराती करून घेण्यापेक्षा त्यांनी स्वतः हा प्रयोग करण्याचे ठरविले. आज पुण्यातील २०० रिक्षा शालगर होजिअरी यांच्याशी जाहिरातींच्या माध्यमातून नाते जोडून आहेत.

 

या व्यवसायात नव्याने येऊ पाहणाऱ्यांसाठी मिलिंद शालगर सांगतात, “या व्यवसायाला कधीच मरण नाही. कष्ट आणि सातत्य यांच्या जोरावर कोणीही व्यवसायात यशस्वी होऊ शकते. कोणत्याही व्यवसायात येण्याआधी त्याचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे. या व्यवसायाचा विचार करता सगळ्यात आधी बाजारपेठेचा अभ्यास केला पाहिजे. स्वतःचे उत्पादन असल्यास कच्चा माल कुठून येतो, एखाद्या वस्त्राची अंतिम किंमत कशी ठरवली जाते, आपला ग्राहक कोण असणार आहे, आपल्या मालाची विक्री होईल त्या परिसराचा अंदाज, इ. गोष्टींचा अभ्यास करून व्यवसायात पाऊल ठेवले पाहिजे. व्यवसायाची सुरुवात करताना आपल्याला आपले ध्येय माहीत असले पाहिजे. ध्येयाच्या दिशेने पावले उचलत गेल्यास यशाच्या मार्गाने प्रवास सोपा होतो. कोणताही व्यवसाय करताना तो १००० दिवस तग धरून राहिला तर तो टिकतो असे साधारण गणित मांडता येते. त्यानंतर समोर येणाऱ्या प्रत्येक अडचणीमधून मार्ग काढत व्यवसाय-वृद्धीसाठी प्रयत्न करावा. सुरुवात करताना साधारण २०० ते ३०० चौ. फूट जागेपासून करावी. माणसाला लागणाऱ्या गरजेच्या वस्त्रांपासून सुरुवात केल्यास व्यवसायाचा पाया चांगला रचला जाईल. आपल्याकडे विक्रीला असलेल्या सर्व उत्पादनांची संपूर्ण माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. सुरवातीला साधारण पाच लाख रुपये भांडवलापासून आपण या व्यवसायाला सुरुवात करू शकतो. अंदाजे तीन वर्षांनंतर या व्यवसायातून नफ्याची अपेक्षा ठेवावी. या सगळ्यात स्वतःवर विश्वास असणे अतिशय महत्त्वाचे आहे. सध्याच्या काळात पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहारज्ञानाला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. मॅनेजमेंटचे शिक्षण घेतल्यास त्याचा व्यवसायात नक्कीच फायदा होतो.”

 

मिलिंद शालगर यांच्या बाबतीत आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांनी व्यवसायाबरोबरच आपला छंद आणि फिटनेस यांनाही तेवढेच महत्त्व दिले आहेत. मिलिंद शालगर यांना सायकलवरून भ्रमंतीची अतिशय आवड आहे. दोन जागतिक विक्रमांची त्यांच्या नावावर नोंद आहे. या तीन भावांनी आपल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत. मिलिंद शालगर यांचे मोठे बंधू श्रीकांत शालगर हे सर्व आर्थिक व्यवस्थापन आणि खरेदी व्यवहारांचे नियोजन करतात. तसेच दोन शाखांची जबाबदारी त्यांनी उचलली आहे. मधले बंधू प्रशांत शालगर यांनी उत्पादनाची (प्रॉडक्शन) जबाबदारी स्वीकारली आहे. त्याशिवाय दोन शाखांची धुराही ते यशस्वीपणे सांभाळत आहेत, तर मिलिंद शालगर हे व्यवसायवृद्धी, पब्लिक रिलेशन, मार्केटिंग, ॲडव्हर्टायजिंग, डेव्हलपमेंट या गोष्टी सांभाळतात. तसेच चार शाखांची जबाबदारीसुद्धा त्यांच्याकडे आहे. सौ मधुरा मिलिंद शालगर या फॅशन डिझाईनर आहेत. २०११ सालापासून लहान मुलींच्या कपड्यांमध्ये विविधता आणण्यासाठी त्या नवनवीन डिझाईन्सची निर्मिती करत असतात. या सर्व प्रवासात शालगर, मनीष गुप्ता, महेंद्र गोखले व उल्हास जोशी हे सहकारी कायम आपल्या पाठीशी उभे असल्याने ते त्यांचे मनापासून आभार मानतात.

 

शालगरच्या व्यवसायाचं नेमकं वर्णन करायचं तर उद्योजकतेचा वारसा हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसा प्रवाहित होतो याचं ते उत्तम उदाहरण आहे. शंकरसा शालगर यांनी बालपणीच्या संस्कारांसोबतच मुलांना उद्योजकतेचं बाळकडू दिलं. तर मुलांनी केवळ सांगे वडिलांची कीर्ती असं म्हणून न थांबता वडिलांनी पेरलेल्या छोट्या बीजाचं रुपांतर यशस्वी ब्रँडमध्ये केलं. फॅमिली बिझनेस म्हणजे कौटुंबिक व्यवसायांनी अभ्यासून अनुसरावं असं हे उदाहरण आहे.

 

– सानिका घळसासी

  उद्योजकतेचा ध्यास असणारे फक्त शहरातच असतात का? नक्कीच नाही. खरे तर शहरात...

  लहानपणच्या शाळेतल्या आठवणींचा एक हळुवार कप्पा प्रत्येकाच्याच मनात अस...

  शेतकरी असो वा कोणताही उद्योजक, वेगळा विचार करणारा, काही धाडस करणारा यशस्...

  विवेक वसंतराव जाधव यांचे मूळ गाव चाकण असले तरी ते स्वतः मुंबईकरच. फायनान...

  चित्रं, त्यातल्या आकृत्या, साजरे रंग यांच्याशी माणसाची बांधिलकी असते. क...