प्रॉफिट साठी मेहनत घेतो तो उद्योजक

प्रॉफिट साठी मेहनत घेतो तो उद्योजक

 

बाबुलाल आज सकाळपासून टीव्हीसमोरून हललेले नाहीत. सुन्न अवस्थेत ते बसून होते. ना चहा-नाश्‍त्याकडे लक्ष ना आंघोळ करून निघण्याचं भान. मोबाइलच्या माध्यमातून अजून काही कळेल म्हणून मोबाइलच्या स्क्रीनवर अधूनमधून नजर. सतत फोन खणखणण्याइतका त्यांचा मित्रपरिवार मोठाही नव्हता पण त्यामुळे पूर्ण माहिती मिळतं नव्हती.

 

पुन्हा हेडलाइन झळकली :

*शहरातील प्रसिद्ध उद्योजक व बिल्डर रसिकभाई राठोड यांची आत्महत्या!

*जवळच्या नातलगांना मात्र खुनाचा संशय; त्यांच्याकडून चौकशीची मागणी

हॉटेल स्वागतचा मालक राठोड हा आत्महत्या करणं जवळपास अशक्य होतं. त्याला आत्महत्येला कुणी तरी भाग पाडलेलं असू शकतं. पण तो स्वत:हून मृत्यूला कवटाळणारा नव्हता. त्याच्याकडे प्रचंड जिद्द, हिंमत आणि उमेद होती. परिस्थितीला वाकवण्याचा चतुर आत्मविश्वास होता. साम-दाम-दंड-भेद वापरून आपलं ईप्सित साध्य करण्याचं कौशल्य होतं. नियम वाकवणं, तडजोडीचे व्यवहार आपल्या लाभाचे करणं ही त्याची ताकद होती. बरेचसे चोर, लुच्चे, लफंगे आणि काही वाममार्गी पोलिस यांचा राठोड हा भरवशाचा दलाल होता. तो आत्महत्या का करेल? जर त्याच्या नातलगांचा आरोप मान्य करायचा झालाच तर मग राठोडचा मृत्यू म्हणजे घातपात किंवा खून संभवतो. तसं कुणी आणि का केलं असेल?

 

वेगवेगळ्या टीव्ही चॅनेल्सवर भिन्न प्रकारची माहिती झळकत होती.

कुणी म्हटलं, की त्याच्याकडे कित्येक राजकारण्यांची हजारो कोटींची रक्कम होती जी तो बेनामी पद्धतीने परदेशात पाठवायचा. त्यात राठोडची फसवणूक झाली, म्हणून त्याने आत्महत्या केली.

कुणी विवाहबाह्य संबंधांमधील तणावातून त्याने हे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला.

खुनाच्या थिअरीवर मीडिया तरी विश्वास ठेवायला तयार दिसत नव्हता, ना पोलिस तसं म्हणत होते.

आपल्याला जवळून परिचित असलेल्या व्यक्तीचा अचानक मृत्यू हा शोकाकुल करणाराच असतो; पण असा अपमृत्यू हा यातनादायी आणि क्लेशदायी असतो. राठोडबद्दल बाबुलालना खूप प्रेम होतं अशातला भाग नव्हता. तो घनिष्ठ मित्रही नव्हता. पण क्लाएंटबरोबर एक स्नेहबंध तयार होतोच ना. तसा राठोडशी त्यांचा स्नेहबंध होता. त्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी बाबुलालनी काय कमी प्रयत्न केले? शेवटचा उपाय म्हणून ते प्रवीणभाईंकडे गेले; पण तो व्यवहार आवश्‍यक कागदपत्रं आणि नोंदींअभावी होता होता राहिला. प्रत्यक्ष नोंदींमध्ये असलेल्या मालकाचा वारस वेगळाच होता; आणि त्याला कल्पनाच नव्हती की आपण या जमिनीचे मालक आहोत! आणि प्रत्यक्षात मालक म्हणून ज्या व्यक्तीने राठोडकडून बयाणा घेतला आणि जिचा अति मद्य पिऊन मृत्यू झाला त्या व्यक्तीने तलाठी लेव्हलला सेटिंग करून त्या जमिनीची बनावट कागदपत्रं तयार केली. अगदी सात-बारासकट. राठोडसारखा कसलेला गडीसुद्धा फसला तिथे माजी आमदार आणि त्यांच्या मेव्हण्याची काय हकीकत! अगदी अलीकडची अडचण अशी होती, की मूळ व कायदेशीर मालकाचा कायदेशीर वारस सापडत नव्हता आणि बोगस मालकाची तीन मुलं आता वहिवाटीचा आधार घेऊन त्या जमिनीला गोचिडीसारखी घट्ट चिकटली होती.

या परिस्थितीमुळे हतबल झाला असेल का राठोड?

की या घोडचुकीबद्दल माजी आमदाराने जबाबदार धरलं असेल राठोडना आणि मागितली असेल संपूर्ण भरपाई?

की राठोडनी पूर्वकल्पना असूनही हे डील केवळ मधल्या कमिशनवर डोळा ठेवून केलं ज्यामुळे माजी आमदारांना आजवर आठ-दहा कोटींचा फटका बसला?

कसं ओळखायचं खरं नि खोटं?

राठोड नक्की कशात तरी फसले होते. एका कोणत्या तरी अनपेक्षित क्षणी आयुष्याने त्यांची परीक्षा घेतली आणि त्यात ते फेल झाले.

राठोड सरळमार्गी नक्कीच नव्हते. ते स्वत: उद्योजक होते का? याचं होकारार्थी उत्तर मिळणं अवघड आहे. त्यांचा उद्योग नव्हता. ते डमी उद्योजक होते, असं म्हणता येईल. पण हे मीडियाला कुणी समजावून सांगायचं? मीडिया म्हणत होतं की ते उद्योजक होते. कुणी तरी त्यांना शाब्दिक अज्ञानामुळे उद्योगपती म्हणून झालं. शेतकरी वर्गापाठोपाठ उद्योजकांचं आत्महत्या सत्र सुरू का झालं? यावर रात्री कुणी तरी लाईव्ह टॉकशो जाहीर करून टाकला….

******************************

शेतकरी आणि उद्योजक यांची तुलना करता येईल का?

एकजण केवळ बियाणं, खतं, कर्ज, विमा, कीटकनाशक, पाऊसपाणी, हवामान, प्रादेशिक मर्यादा, बाजारपेठ, वाहतूक यांवर अगतिकपणे अवलंबून. सगळं जोखमीच्याही पलीकडलं. नियतीने जबरदस्तीने मांडलेला एकतर्फी जुगारच हा. शिवाय तो परिस्थितीवश शेतकरी झालेला. त्याचं कशावरच नियंत्रण नाही आणि तो मात्र सगळ्यांच्याच नियंत्रणाखाली.

आणि उद्योजक हा डोळस निर्णयानंतरच स्वखुषीने उद्योजक झालेला……

दोघांची कशी तुलना करणार?

उद्योजकाचं जजमेंट चुकू शकतं.

निवडलेल्या क्षेत्राचं व उत्पादनाचं, कच्च्या मालाचं, उत्पादनखर्चाचं, मागणीचं, कामगारांचं, वेगवेगळ्या बंधनकारक परवान्यांचं, काही अधिकारीवर्गासाठीच्या लाचलुचपतीचं, पगार आणि बोनसचं, वेळेचं, मार्केटचं, विक्रीचं, कर्जाच्या परतफेडीचं, मुख्य म्हणजे नफ्याचं जजमेंट चुकू शकतं. ही शुद्ध चूक असते. चॉइसची चूक.

राठोडने ज्या कार्यपद्धतीची निवड केली, आपला भवताल म्हणून ज्या लोकांची आणि मूल्यांची निवड केली तेव्हाच त्याच्या हातातून जगणं निसटलं….

राठोडने स्वत:हून माजी आमदारासाठी बुजगावणं होणं स्वीकारलं होतं. त्याच्या स्वत्वाचा तो शेवट तेव्हाच झाला जेव्हा त्याचं बुजगावणं झालं. राठोडला आपली कल्पकता वापरण्याची अनुमतीच नव्हती, मग तो कसला उद्योजक? मीडियाला कुठे माहिती होतं हे माजी आमदाराचं प्रकरण? बाबुलाल एकाच प्रश्नाने कमालीचे अस्वस्थ झाले होते.

आत्महत्या की खून? आणि का?

त्यांना एकीकडे असंही वाटत होतं की आपण राठोडच्या संपर्कात असतो तर कदाचित ही दुर्घटना टळली असती. प्रवीण बिल्डर्सनी हा प्रोजेक्ट रहित केल्यानंतर बाबुलालनी हॉटेल स्वागतची पायरी चढणंही थांबवलं. तो प्रोजेक्ट मार्गावर आणणं आता त्यांच्यासाठी अशक्य बनलं होतं.

टीव्हीच्या आवाजापुढे फिकी पडलेली मोबाइलची रिंग बाबुलालना बराच वेळ ऐकू आली नाही. आली तेव्हा त्यांनी झटकन मोबाइल उचललाही. मोबाइलवर प्रवीणभाई होते.

बातमी कळली ना?” त्यांनी विचारलं.

हो ना.. वाईट बातमी!बाबुलाल

कामात आहात?” प्रवीणभाई

कामाचं सुचतच नाहीए काही… कितीही म्हटलं तरी रोजचं उठणं-बसणं होतं. क्लायंट हा जवळचा वाटायला लागतो कधी कधी. त्यात हा विचित्र आणि गूढ मृत्यू. शॉक बसल्यासारखं झालंय…बाबुलालनी आपली मनोवस्था त्यांना मोकळेपणाने सांगितली.

येता माझ्या ऑफिसात?” प्रवीणभाईंच्या विचारण्यात प्रश्नापेक्षा सूचना जास्त होती. त्यांनी ती तत्काळ स्वीकारली.

**********************************

प्रवीणभाई भेटल्यावर बाबुलालना बरं वाटलं.

बाबुलाल, तुम्ही जरा जास्तच सेंसिटिव्ह आहात.प्रवीणभाई म्हणाले.

खरंय.जे खरं आहे ते मान्य करण्यावाचून बाबुलालपुढे पर्याय तरी काय होता?

बाकी क्षेत्राचं माहीत नाही फारसं, पण बिझनेसमध्ये बेसिक गोष्ट लागते- ती म्हणजे स्थितप्रज्ञता. प्रॉफिट वगळला तर आपलं असं कुणीच नसतं… म्हणून कशातच आपली गुंतवणूक असता कामा नये. ऐकायला खूप क्रूर वाटेल, पण तेच सत्य आहे!असं म्हणून प्रवीणभाईंनी सुस्कारा सोडला. ते मागे रेलले.

जमवण्याचा प्रयत्न करतोय, पण जमत नाही बघा प्रवीणभाई. आता तर आयुष्याची संध्याकाळ होत आलीय.असं म्हणून बाबुलाल खिन्नसे हसले.

वाढत्या वयाला असे त्रासही झेपत नाहीत ना… समोरच्याचा किती विचार करायचा, याचाही विचार करायला पाहिजे ना?” प्रवीणभाईंनी नेमकं वर्मावर बोट ठेवलं.

माझ्या मर्यादा…दुसरं काय?” बाबुलालनी कबुलीच दिली.

प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं असं म्हणतात. त्यापैकी प्रेमाचं मला ठाऊक नाही, पण व्यापारउद्योगात सगळं नसलं तरी बरंचसं माफ असतं… कारण उद्योग हे एक युद्धच आहे…. प्रॉफिटचं युद्ध. इथेही आपला आणि परका असा कुणी नसतो. आपल्याला तोट्याकडे ढकलणारा प्रत्येक व्यवहार, माणूस, घटना यापासून आपल्याला फारकत घेता आलीच पाहिजे- मग ते आपल्या कितीही जवळचे का असेनात. भावनेत गुंतला तो व्यापारात आणि उद्योगात संपलाच म्हणायचा!असं म्हणत प्रवीणभाई खुर्चीत थोडे रेलले.

माणूस म्हटला की भावना या आल्याच ना!बाबुलालचा मुद्दा रास्त होता.

 

स्थितप्रज्ञ २

भावना येणारच. पण भावनेचा भर नको. भावना वरचढ नकोत. त्यावर पूर्ण नियंत्रण हवं…. कारण भावना क्षणाक्षणाला बदलत असतात. मग आपणही सैरभैर नि अस्थिर होतो. आणि अस्थिरता हा उद्योग नि उद्योजकतेचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू म्हणायचा. अस्थिरता आतली असो किंवा देशातली, उद्योगांसाठी घातकच ठरते…प्रवीणभाई बोलत होते. आता तर बाबुलालकडे प्रतिवादही उरला नाही. काय बोलणार? ते जे बोलत होते ते सत्यच म्हणायचं.

अगदी खरंय तुम्ही म्हणता ते. अन्य माणसाला मदत करता करता मी थोडा वाहूनच जातो. माझी बायको कायम सुनावत असते मला त्यावरून!बाबुलालनी हसतच सांगितलं.

मदत? क्रिकेटर बॅट किंवा बॉलमधून बोलतो. लेखक शब्दांमधून बोलतो. योद्धा शस्त्रातून बोलतो. डॉक्टर औषधोपचारांतून बोलतो….आपण उद्योजकांनी नफ्यातून बोललं पाहिजे. तेच आपलं सामर्थ्य आहे. इतरांना नफा कमवायला शिकवणं हीच काय ती आपली मदत!प्रवीणभाई म्हणाले.

का कुणास ठाऊक पण समाजाने नफा हा अतीव स्वार्थाशी जोडलाय.बाबुलाल खंतावून म्हणाले.

नफा आहे म्हणून जगरहाटी सुरू आहे. नफा आहे म्हणून प्रगती आहे. नफा आहे म्हणून गुंतवणूक आहे. नफा आहे म्हणून सुधारणा आहेत. नफा आहे म्हणून नवनवीन शोध आहेत. नफा आहे म्हणून माणसाचं जीवनमान सुधारतं आहे…. नफा नष्ट करण्याचे सगळे जागतिक प्रयोग नष्ट झालेत. नफा मात्र अढळ आहे!प्रवीणभाई हे पक्के नफावादी होते म्हणूनच ते अब्जाधीश होऊ शकले.

बाबुलाल अंतर्मुख होऊन स्तब्ध बसले.

माझ्या दोन्ही मुलांना मी त्यांच्या या ऑफिसच्या पहिल्या दिवशी काय सांगितलं माहितेय? मी त्यांना सांगितलं की आपलं नातं घरी ठेवायचं. इथे आपण सगळे प्रॉफिटच्या नात्याने बांधले गेलोय. त्यात कमी-जास्त झालं तर आपलं इथलं नातं संपलं. बाकी, घरात आपण बाप-मुलं-भावंडं आहोतच…प्रवीणभाई भरभरून बोलत राहिले. 

मला महाभारतातली गोष्ट आठवली. ती….अर्जुनाची-पक्ष्याची- पक्ष्याच्या डोळ्याची आणि अर्जुनाच्या एकाग्रतेची. तुमचा प्रॉफिटवरचा फोकस खूप उत्तम आहे.बाबुलालनी मनोमन दाद दिली त्यांना.

 

स्थितप्रज्ञ ३

मला दुसरं काही येत नाही, फक्त नफा कमावता येतो. बाकीच्या सर्व विषयांत मी बुद्दू आहे. त्यामुळे मला एकाग्रतेवाचून पर्याय नाही!असं म्हणत स्वत:च्याच विनोदावर प्रवीणभाई खो खो हसायला लागले. हसल्यामुळे डोळ्यांत जमा झालेलं पाणी त्यांनी खिशातल्या रुमालाने पुसलं.

बाबुलाल, आपले पूर्वज प्रवास करताना दिवसा सूर्याचा वेध घेऊन आणि रात्री ध्रुवतारा पाहून आपली दिशा ठरवायचे. बिझनेसमध्ये प्रॉफिटचं तेच स्थान आहे. सगळी सुखदु:खं स्थितप्रज्ञाप्रमाणे विसरून तुम्हाला नफ्यावर लक्ष केंद्रित करायचंय. एकदा ते जमलं की बिझनेस भरकटत नाही. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहात. तुम्हाला माहितेय की…असं म्हणत त्यांनी बाबुलालच्या संमतीची वाट न पाहता दुसरा चहा मागवला.

तुम्हाला राठोडच्या जाण्याने इतका शॉक का बसलाय? तो इतकाही भला गृहस्थ नव्हता…प्रवीणभाईंच्या वाक्यावर बाबुलाल अवाक झाले. तो ठीक आहे पण त्याची संगत ठीक नाही, हाच बाबुलालचा या क्षणापर्यंतचा समज होता.

म्हणजे?” बाबुलालला बहुधा अजून स्पष्टीकरण हवं होतं.

माझा राठोडबद्दलचा अनुभव खूप वाईट आहे आणि त्याच्यामुळे आम्ही मनस्तापही भोगलाय… त्याच्याबरोबर काम करणं थांबवलंय, असं तुम्ही पूर्वीच सांगितल्यामुळे तुम्हाला मी काही बोलूही शकलो नाही.असं म्हणताना प्रवीणभाई गंभीर झाले.

त्याचं इंटेन्शन फसवण्याचं होतं. जमिनीच्या व्यवहारात त्याने अनेकांना शेंडी लावली. तो भानगडीच्या जमिनी खोटी कागदपत्रं बनवून विकण्यासाठी पुढे करायचा. कागदपत्रं तुम्ही तुमच्या वकिलाकडून पडताळून घ्या, उद्या मला जबाबदार धरू नका, असंही दहा वेळा बजावायचा. आमच्याप्रमाणे ज्यांना टायटल सर्च कळतो त्यांना वास्तव पटकन कळायचं, बाकीचे फसायचे. जे फसले त्यांना खडे बोल सुनवायला हाच पुन्हा पुढे! तरी मी तुम्हाला सांगितलं होतं…ठीक आहे, काढू या काही तरी मार्ग-असं म्हणून तीच जमीन मातीमोलाने अजून कुणाला तरी विकायचा. म्हणजे राठोड कमिशनपोटी फक्त मदत करणार. विकायचं काम नवा मालकच करायचा…असं म्हणून प्रवीणभाईंनी उसासा टाकला.

किती दिवस असं चालू शकतं? एका व्यवहारात त्याने मोठ्या राजकीय असामीला फसवलं. माजी आमदाराला हॉटेल स्वागतच्या जमिनीबद्दल फसवलं तसंच…. त्या माणसाला याची लबाडी कळली. मग त्या नेत्याने पैसे परत करण्यासाठी एका आठवड्याची मुदत दिली. मुदतीच्या शेवटच्या दिवशी राठोडने आत्महत्या केली… तसाही मुदत संपल्यावर त्याचा खून झालाच असता म्हणा!प्रवीणभाई बोलायचे थांबले.

बाबुलालना बोलायचं सुचतच नव्हतं.

प्रॉफिटसाठी मेहनत घेतो तो उद्योजक. राठोडच्या बाबतीत आपण चुकलो, फसलो. कारण तो ठक होता, उद्योजक नव्हताच.

लालच बुरी चीज़ है बाबुलाल। मुनाफ़ा और लालच साथ नहीं चल सकते।हे प्रवीणभाईंचं शेवटचं वाक्य घरी आल्यानंतरही बाबुलालच्या कानांत आणि मनात घुमत राहिलं.

 

– संजीव लाटकर

  “राजा, तू तुझा हट्ट सोडणार नाहीस, हे मला ठाऊक होतंच. त्या कोणा भिक्षूसाठी ...

  “राजा, तुझ्या जिद्दीचं, धारिष्ट्याचं, सातत्याचं, न कंटाळता तेच ते काम कर...

  अमावास्येच्या त्या भयाण रात्री सारं जंगलही स्तब्ध झालं होतं. जंगलाच्या...

  पेच तर मोठा कठीण होता ! अब्राऱ साहेबांना थत्तेंनं बरोब्बर कोंडीत पकडले ह...

  त्या दिवशी मी देखील जरा तणतणतच ऑफिसला आलो होतो. बायकोची कटकट कोणत्या नवऱ...