करिअरची सुरुवात १३०० रुपयांच्या नोकरीपासून, आज आहे स्वत:ची कोट्यवधींची कंपनी

करिअरची सुरुवात १३०० रुपयांच्या नोकरीपासून, आज आहे स्वत:ची कोट्यवधींची कंपनी

विजय माने या चाळीशीतल्या तरुणानं 2017 साली आपल्या दोन सहकार्‍यांसमवेत मुंबईत ‘एस.व्ही. गॅस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची नोंदणी केली. आणि 2018 पासून घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि सी.एन.जी. जोडण्यांसाठी पाईपलाईन टाकणं, त्यासाठी महत्त्वपूर्ण अवजारांचं उत्पादन करणं, पाईपलाईन्सचं लेखापरीक्षण, त्या कार्यान्वित करणं, त्यांची देखभाल करणं आणि त्या अनुषंगानं इतर अनेक सुविधांची निर्मिती करणं अशा वेगवेगळ्या सेवा पुरवायला सुरुवात केली. आज कंपनीची उलाढाल सुमारे साडेपाच कोटी असून तिचे 35 कर्मचारी आहेत. भारतातल्या प्रत्येक गॅस कंपनीत ‘एस.व्ही. गॅस’ची अधिकृत नोंदणी आहे. देशांतर्गत 60 ते 65 आणि आंतरराष्ट्रीय 22 ग्राहक असून भारतातल्या शेकडो जिल्ह्यांमध्ये एस.व्ही. गॅसनं जोडण्या केलेल्या आहेत. 

 

कर्‍हाडमध्ये शालेय शिक्षण घेतल्यावर विजयने इस्लामपूरच्या आर.आय.टी. कॉलेजमधून 2001मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. शेवटची उत्तरपत्रिका लिहिल्यानंतर तो मुंबईला आला. महिना 1300 रुपयांवर एका प्रायव्हेट कंपनीत विपणन विभागात त्याला नोकरी मिळाली. त्यात त्याला भरपूर फिरती होती. 

 

त्यानंतर महानगर गॅस लिमिटेड’ या मुंबईत गॅस पुरवठा करणार्‍या कंपनीत विजयला नोकरी मिळाली. क्षेत्र वेगळं असलं तरी 5000 रु. पगार आणि भटकंती कमी म्हणून विजय रुजू झाला. अंधेरी पश्‍चिम ते विलेपार्ले पश्‍चिम या भागातल्या निवासी वसाहती आणि व्यवसायांना पाईपलाईनद्वारे गॅसचा पुरवठा करण्यासाठी नेमलेल्या अभियंत्यांपैकी विजय एक होता. काम आवडल्यामुळे विजयनं इथे 8 वर्षकाम केलं. प्रकल्प अंमलबजावणी, डिझाईन, उच्च दाबाच्या स्टील पाईपलाईन हाताळणे, ऑपरेशन्स आणि देखभाल विभाग, गळती संबंधीचा विभाग असा चौफेर अनुभव त्याला मिळाला. 

 

लठ्ठ पगाराची नोकरी सोडून भारतात परतण्याचा निर्णय 

त्यानंतर हैद्राबाद भाग्यनगर गॅस लिमिटेड या कंपनीत वार्षिक 12 लाख पगारावर प्रोजेक्ट्स मॅनेजर या पदावर 2010 साली विजय रुजू झाला. इथे चांगल्या उभारण्यांबरोबरच भारतभरातल्या या क्षेत्रातल्या विक्रेत्यांबरोबर त्याचे उत्तम संबंध प्रस्थापित झाले. 2012 मध्ये जगातल्या तिसर्‍या क्रमांकाच्या अबुधाबी नॅशनल ऑईल कंपनीत पाईपलाईन डिझाईन इंजिनिअर म्हणून विजयची नियुक्ती झाली. आणि 2015 मध्ये तिथेच सिनिअर पाईपलाईन इंजिनिअर म्हणून त्याला बढती मिळाली. तेव्हा त्याचा पगार होता 6 लाख रुपये महिना! जीवनमानही उच्च प्रतीचं होतं. मात्र तरीही 2018 मध्ये विजय ‘परत मातृभूमी’ला आला. भारतातल्या कौटुंबिक कार्यक्रमांना जाऊ न शकणं, आपल्या गोतावळ्यापासून दुरावणं आणि मुलांच्या दृष्टीनं तिकडची शैक्षणिक प्रणाली थोडी शिथिल असणं या कारणांनी तो परत आला. 

 

‘eयशस्वी उद्योजक’ 20 मित्रांसोबत SHARE करा आणि मिळवा एक खास आकर्षक भेट!
 

 

सरकारी धोरणातील अनुकूल बदलांमुळे व्यवसायाच्या निर्णयाला बळकटी 

परत आल्यावर नोकरी न करता स्वत:चा व्यवसाय करावा असा विचार त्याच्या मनात घोळत होता. हा विचार बळकट केला त्याच्याबरोबर काम करणार्‍या विजय खाडे आणि सय्यद एहसन यांनी! सय्यद हे विजयचे मुंबईतले बॉस होते. तिघांनाही एव्हाना या क्षेत्रात 20 ते 25 वर्षांचा अनुभव होता. त्याच्या जोरावर परत जाऊन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 

 

20 वर्षांत विजयचे भारतात या क्षेत्रात उत्तम संबंध प्रस्थापित झाले होते. केंद्रसरकारने या क्षेत्रात अनुकूल धोरण आणलं होतं. सरकारनं तेल आणि नैसर्गिक वायू या क्षेत्राचा प्राधान्यक्रम बदलला. शिवाय ‘स्टार्टअप इंडिया’ आणि लघु-मध्यम उद्योजकांसाठी (एम.एस.एम.ई.) बदललेले नियम यामुळे विक्रेत्यांची गरज वाढली होती. या क्षेत्रात कोणत्याही कंपनीचं काम घ्यायचं असेल तर सुरक्षा ठेव ठेवावी लागते. त्यात खूप पैसे अडकून पडतात. मात्र नवीन कायद्यानुसार जर कंपनी लघु/मध्यम उद्योगाअंतर्गत (एम.एस.एम.ई.) नोंदणीकृत असेल तर ही ठेव न ठेवता थेट निविदा भरता येते. व्यवसायाच्या दृष्टीनं हा खूप उपयुक्त कायदा ठरणार होता. शिवाय 2015पर्यंत संपूर्ण भारतात 73 जिल्ह्यात काम चालू होतं. मात्र सी.एन.जी. वितरणासाठी केंद्र सरकारनं 368 जिल्हे या अंतर्गत आणले. त्यामुळे लोकांच्या गरजा, मागणी अर्थातच वाढली. 

 

या क्षेत्रातील आधीच्या संबंधामुळे एस.व्ही. गॅसला आखाती देशातली कामही मिळाली. आज कतार, अबुधाबी, दुबई, सौदी इथे कंपनी उपकरणांचा पुरवठा करते आहे. शिवाय अबुधाबीत मटेरियल पुरवणार्‍या पुरवठादारांनी सांगितलं, ‘तुम्ही भारतात परत जाताय तर आमच्या उत्पादनांची विक्री करू शकता’. आज अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, टर्की, दुबई अशा 6/7 देशातल्या उत्पादनांच्या पुरवठा एस.व्ही. गॅस भारतभर करते आहे. 

 

ऑक्टोबर 2017 मध्ये तिघांनी भागीदारीत कंपनीची नोंदणी केली. तिघांनी सुरुवातीला प्रत्येकी दोन लाख गुंतवले पण काम कसं मिळवणार? इथे बँकेत खातंही नसताना फक्त विश्‍वासावर विजयचे या क्षेत्रातले मित्र श्री. सिंग यांनी पहिली अवजारांची 10 लाखांची ऑर्डर दिली. कंपनीतर्फे तिघांनी गोरेगावला वर्कशॉपसाठी भाड्यानं जागा घेतली. आज 35 जणांची टीम, उत्पादनासाठी गोरेगाव आणि खेड-शिवापूरला प्रशस्त वर्कशॉप्स असा कंपनीचा विस्तार आहे.

 

ठेकेदारी, मनुष्यबळ पुरवठा यात न अडकता वैशिष्ट्यपूर्ण सेवांवर भर

कंपनी सुरू करताना तिघांनी पक्कं ठरवलं होतं, की आपल्या आंतरराष्ट्रीय अनुभवाचं तंत्रज्ञान भारतात आणून वैशिष्ट्यपूर्ण सेवा पुरवायच्या. पाईपलाईन्स उभारण्या तर करायच्याच, पण ठेकेदारी, मनुष्यबळ पुरवठा या नेहमीच्या कामांत अडकायचं नाही. एस.व्ही. गॅसनं याबाबतीत तीनच वर्षात फार मोठी मजल मारली आहे.

 

विजय स्वत: पाईपलाईनचं अभियांत्रिकी डिझाइन करतो. दुसरं म्हणजे कोणतंही सी.एन.जी. स्टेशन किंवा प्‍लँटच्या आराखड्याची सुरक्षितता! त्याची योग्य पद्धत आणि सुरक्षित स्थान अत्यंत महत्त्वाचं. त्यासाठी कंपनी प्रशिक्षणही देते. मध्यंतरी आंध्रप्रदेशातल्या तीन कंपन्या आणि पुण्यातल्या एम.एन.जी.एल.ला असं प्रशिक्षण दिलं गेलंय. 

 

मोठमोठ्या कंपन्या आणि मोठमोठी हॉटेल्स यासारख्या औद्योगिक ग्राहकांना ‘मिटरींग अँड रेग्युलेशन स्टेशन (एम.आर.एस.) लागतं. हे गुंतागुंतीचं साधन बनवणारी एस.व्ही. गॅस ही भारतातली तिसरी तर ‘ओडोराईझेशन सिस्टीम’ (गळती समजण्यासाठी रसायन भरण्याचं मशीन) तयार करणारी भारतातली दुसरी कंपनी आहे. एका जर्मन कंपनीच्या साथीनं सी.एन.जी. स्टेशनमध्ये लागणार्‍या स्टेनलेस स्टीलची ट्यूब पुरवणारी ही एकमेव कंपनी आहे. (ट्यूबिंग) 

 

तेल आणि नैसर्गिक वायूच्या संपूर्ण प्रणालीमध्ये आत आग लागली तरी सुट्या भागांवर कोणताही परिणाम होऊ न देणारी (पॅसिव्ह फायर प्रोटेक्शन) इटलीवरून आयात केलेलं हे उत्पादन पुरवणारी ही भारतातली दुसरी कंपनी आहे. 

 

गॅस पाईपलाईनसाठी लागणार्‍या काही अवजारांचं उत्पादन हा कंपनीसाठी मैलाचा दगड ठरला आहे. ब्रिटनच्या 2 कंपन्या भारतात पूर्वी त्याचा पुरवठा करत होत्या. ती खूप महाग पडायची आणि त्यांच्याकडून समस्यापूर्ती पण होत नसे. भारतातच त्याचं उत्पादन करण्याचं कंपनीनं ठरवलं. तसंच डिझाईनमध्ये अनेक ग्राहक योग्य सॉफ्टवेअर वापरत नव्हते. एच.व्ही. गॅसने ग्राहकांना योग्य सॉफ्टवेअर वापरण्याचे फायदे सांगितले, आणि वेगवेगळ्या भागातल्या पाईपलाईन्सचे डिझाईन अशा सॉफ्टवेअरमध्ये बनवून दिले. गुजरात गॅसकडून ‘ओडोराईझेशन सिस्टीम’ची खूप मोठी ऑर्डर कंपनीला मिळाली आहे.

 

वायू उद्योगात जगात अग्रेसर कंपनी म्हणून नावारूपाला येण्याचं स्वप्न

भारत सरकारची अधिकृत परवानगी मिळाल्यानंतर पाईपलाईनचं डिझाइन करून ती प्रत्यक्ष टाकणं, रोज त्याची तपासणी करून गॅस सोडण्याआधी त्याचं लेखापरीक्षण, ‘मिटरींग’ या संकल्पनेचं डिझाइन, फॅब्रिकेशन, उभारणी, ती कार्यान्वित करणं, आणि ऑपरेशन्स- मेंटेनन्स, शेड्युल अ‍ॅक्टिविटीज, सी.एन.जी. स्टेशनचं ट्यूबिंग असा कंपनीच्या कामाचा मोठा आवाका आहे. वर्षभरापासून कंपनीनं ‘ऑटोमॅटिक मीटर रीडिंग’ (ए.एम.आर.) हा भारतात बनवलेला स्वदेशी सॉफ्टवेअर प्रोग्राम तयार केलाय. नियंत्रण कक्षात बसून कंपनीचा अभियंता 100 किलोमीटर दूर असलेल्या बिलींग न केलेल्या, इनवॉईस न दिलेल्या ग्राहकाची प्रणाली (गॅस) बंद करू शकतो.

 

वायू उद्योगात जगातली अग्रेसर अभियांत्रिकी आणि सल्लागार कंपनी म्हणून नावारूपाला येणं हे विजय आणि त्याच्या सहकार्‍यांचं स्वप्न आहे. कोणत्याही कंपनीच्या या क्षेत्रातल्या समस्येवर तोडगा काढणं, ओमानपासून इराक-इजिप्तपर्यंत सगळ्या आखाती कंपन्यांना अवजारं आणि साधनांचा पुरवठा करणं (4 देशात सध्या करत आहेत) अनेक आफ्रिकन देशात (टांझानिया, नायजेरियात सुरू आहे.) आणि आखाती देशात कार्यालयं उभारणं या भावी योजना आहेत आणि हे सारं भारतातून करायचं कारण इथे खूप व्यावसायिक संधी आहेत. कुशल तंत्रज्ञ आहेत. या क्षेत्रात भारत जगाला चांगल्याप्रकारे सेवा देऊ शकतो. 

 

– ज्योत्स्ना नाईक

(एच.बी.जे स्मार्ट लीगसी या कंपनीच्या संचालक असून

पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव, विविध विषयांवर लेखन)

jyotsna.s.naik@gmail.com

इंडियन एयरफोर्स आणि इतर खासगी विमान कंपन्यांमध्ये पायलट म्हणून आपली कारकी...

व्यवसाय करण्यासाठी ‘फूड इंडस्ट्री’ मध्ये जायचं ठरवले की, सुरूवातीला ‘मेन...

चाळीशी पार केलेला एक अभियंता ‘उल्हास पेद्दावाड’ हा या कथेचा नायक आहे. उल्हा...

आपल्याला आपल्या स्वप्नांसाठी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अनंत अडचणीं...

अंबेजोगाईचा शुभम महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आला. पुण्याच्या गरवार...