आरोग्य क्षेत्रातल्या रोजगाराच्या नव्या संधी
कोणत्याही प्रकारचं कौशल्य असणारी व्यक्ती ही स्वयं प्रगतीला चालना देऊ शकते. कौशल्यात कला असते. या कलेचा सतत विकास होत राहिला तर प्रगतीच्या संधी पर्यंत जाणं सुलभ होऊ शकतं. तसच अशा संधी वाट वाकडी करुन अशा कौशल्यप्राप्त व्यक्तीकडे येऊही शकतात.
म्हणूनच सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार कौशल्य विकासला चालना देणाऱ्या अनेक योजना राबवत आहे. रोजगार आणि स्वयंरोजगाराठी कौशल्य निर्मिती आणि कौशल्य विकास या दोन बाबी महत्वाच्या ठरत असल्याने महाराष्ट्र शासनाने यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी, महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीची स्थापना केलीय.
करोना साथीचा सामना करण्यासाठी मोठमोठ्या पायाभूत सुविधा राज्यात ठिकठिकाणी निर्माण करण्यात आल्या. मात्र या सुविधांचा लाभ संबधितांपर्यंत पोहचवण्यासाठी कुशल मनुष्यबळ पुरेसं प्रमाणात नसल्याचं दिसून आलं. करोनाच नव्हे तर भविष्यातील इतरही आरोग्यावषियक समस्यांच्या सामना करण्यासाठी असं मनुष्यबळ लागणार असल्याचं स्पष्ट झालं. या गरजेमध्ये रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी असल्याचही स्पष्ट झालं. त्यामुळे शासनाच्या वरिष्ठ पातळीवर या अनुषंगाने सखोल चर्चा करण्यात आली. गरजेतून निमार्ण झालेल्या संधीचा लाभ बेरोजगार तरुण-तरुणींना देता येणं शक्य असल्याचं चित्र समोर येताच, शासकीय पातळीवर या अनुषंगाने काही उपक्रम राबवता येईल का याचा विचार सुरु झाला. या विचार मंथनातूनच मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची रुपरेषा निर्धारित करण्यात आली.
आरोग्य सुविधांच्या सुयोग्य पुरवठयासाठी आणि या सेवा-सुविधा गरजूपंर्यंत पोहचवण्यासाठी विविध प्रकारच्या कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर गरज असल्याचं दिसून आलं. कौशल्य विकास योजनेंतर्गत महाआरोग्य कौशल्य योजना ही नवी योजना शासनानं अंमलात आणली.
या कार्यक्रमांतर्गत १८ ते ४५ वयोगटातील तरुण-तरुणींना हेल्थ केअर सेक्टर म्हणजे आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या क्षेत्रात रोजगाराची संधी मिळू शकते. यासाठी सर्वात महत्वाची अट म्हणजे, या तरुण तरुणींना या क्षेत्रात झोकून काम करण्याची इच्छा असणं, बस्स! अशा इच्छुक तरुण तरुणींना हेल्थकेअर, पॅरामेडिकल, नर्सिंग, डोमेस्टिक वर्कर अशा सारख्या संधी मिळव्यात म्हणून संबंधित विषयाचे प्रशिक्षण दिलं जातं.
२०२१-२०२२ या वर्षात २० हजारांहून अधिक उमेदवारांना असं प्रशिक्षण देण्याचं शासनाच्या पातळीवर लक्ष ठरवण्यात आलय. हे ऑन-जॉब (प्रत्यक्ष कार्यरत असताना) प्रशिक्षण राज्यातील शासकीय रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि २० पेक्षा अधिक बेडची व्यवस्था असणाऱ्या खाजगी रुग्णालयांमध्ये दिलं जाईल. एका वेळी किमान २० आणि ३० उमेदवारांना प्रशिक्षण दिलं जाईल. अपावादात्मक परिस्थितीत ५ उमेदवारांसाठी सुध्दा हे प्रशिक्षण सुरु केलं जाईल. सैध्दांतिक ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिकांवर अधिक भर देण्याचं धोरण या प्रशिक्षण कार्यक्रमात अंतर्भूत करण्यात आलं. वैद्यकीय सुविधांचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वाहनांसाठी व रुग्ण्वाहिकेच्या वाहनासांठी आवश्यक असणाऱ्या वाहनचालकांच्या प्रशिक्षणाचाही यात समावेश आहे. या प्रशिक्षणानंतर संबंधित उमेदवारांना किमान ६ महिने शासकीय अथवा खाजगी रुग्णालयात सेवा देणे बंधनकारक राहील. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना शासनाचे प्रमाणपत्र दिले जाईल.
शासन निर्णय –
वैद्यकीय क्षेत्राशी संलग्नित मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास योजना/महाराष्ट्र शासन कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभाग/शासन निर्णय क्रमांक : कौववउ–2021/प्र.क्र.48/कौशल्य-1 मादाम कामा मागय, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक : 19 मे, 2021
संपर्क –
(१) https://kaushalya.mahaswayam.gov.in/users/mahaaarogya_scheme
(२) डायरेक्टोरेट ऑफ स्किल डेव्हलपमेंट, एमप्लॉयमेंट ॲण्ड आंत्रप्र्यिन्युरशीप, ३ रा माळा, विस्तारित कोंकण भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई- ४०० ०६१४, दूरध्वनी- ०२२- २७५७१९४२, ईमेल – de.support@ese.maharashtra,gov.in
(३) महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटी, चौथा माळा, एमटीएनएल बिल्डिंग, जी.डी सोमाणी मार्ग कफ परेड, मुंबई— ४००००५, ईमेल – helpdesk@mssds.in
(४) मॅनेजिंग डायरेक्टर, अण्णासाहेब पाटील मागास विकास महामंडळ मर्यादित, जीटी हॉस्पिटल कम्पाउंड बद्रुद्दीन तय्यबजी मार्ग, जे.जे.स्कूलच्या पाठिमागे, सीएसटीएम स्टेशनजवळ- ४००००१,दूरध्वनी- ०२२-२२६५७६७२, ईमेल – dir.apam@maharashtra.gov.in
(५) संकेतस्थळ- www.mahaswayam.gov.in / हेल्पलाइन- १८६०२३३०१३३
– सुरेश वांदिले