उद्योग वाढवायचा असेल शिकून घ्या मार्केटिंग!

उद्योग वाढवायचा असेल शिकून घ्या मार्केटिंग!

 

प्रश्न – आपल्या व्यवसायाचे नेमके स्वरूप काय आहे आणि हाच व्यवसाय निवडावा असे का वाटले? 

मंजुषा भट – मला पहिल्यापासूनच वेगवेगळ्या कलाकौशल्याच्या गोष्टी करण्याची आवड होती. मी मॅरेज काउन्सेलर म्हणून फ्रीलान्सिंग काम करत होते. हे करताना लक्षात आले, की मुले मोठी झाली, आपल्याकडे आता वेळ उरायला लागला आहे. साधारण ९-१० वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. त्यावेळी छंद म्हणून मी कलाकुसरीच्या वस्तू करायला सुरुवात केली. सुरू केल्यावर वाटले, या वस्तू छान दिसतायत. मग गणपतीच्या काळात सोसायटीमध्ये स्टॉल लावला. खूप छान प्रतिसाद मिळाला. मग वाटले, की हे आपण व्यवसाय म्हणूनच करू शकतो. मग मी होलसेल करणाऱ्यांना वस्तू दाखवल्या. खरे सांगायचे तर पैसे कमवणे, किंवा मोठा बिझनेस करणे असा काहीच उद्देश मूळात नव्हता. तेव्हा कुंदनच्या रांगोळ्या म्हणा किंवा दिवे, ही संकल्पनाच मार्केटला नवीन होती. होलसेलर्सनाही या वस्तू दिवाळीसाठी आवडल्या. मग एक एक करत मला भरपूर ऑर्डर्स मिळाल्या. त्यातूनच या व्यवसायाची सुरुवात झाली. आता मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात दिसतील, पण दहा वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. प्रॉफिट, मार्जिन याबद्दल सुरुवातीला काहीच कळत नव्हते. कारण मी व्यवसायात कधीच नव्हते. मी मानसशास्त्राची पदवीधर. कॉम्प्युटर मॅनेजमेंटही केले आहे. व्यवसाय करताना ‘ट्रायल एरर’ करत मी बदलत गेले. हे काम माझ्यासाठी मेडिटेशन आहे. करण्यातून जास्त आनंद मिळतो. 

 

सुरुवातीला मी कुंदन वापरून फ्लोटिंगचे दिवे केले होते. मग त्यातच थोडा प्रकार बदलून काचेवरती केले. काचेवर वेगवेगळ्या प्रकारची कॉम्बिनेशन्स वापरली. लाकडी चौकटीवर रंग लावून त्याला कुंदन लावून त्याच्या रेडिमेड रांगोळ्या केल्या. अक्रेलिकच्या रांगोळ्या केल्या. माझा दरवर्षी एकच पॅटर्न कधीच नसतो. दिवे, रांगोळ्या हा बेस आहे. हा बेस मी वेगवेगळ्या प्रकारे वापरते. मी ३ फुटांपासून १० फुटांपर्यंत तोरणे करून देते. माझी इच्छा होती, इको फ्रेंडलीकडे जाण्याची. म्हणून मी कापडापासून पाकळी तयार करून त्यांची माळ केली, त्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या तयार केल्या. त्याला मी रांगोळी मॅट नाव दिले आहे. त्याला खूप प्रतिसाद आहे. हलकी असल्यामुळे परदेशातही लोक घेऊन जातात. १०, १२, १४ इंच अशी हव्या त्या आकारात मी त्या करून देते. लॉकडाउनमध्ये मी हा शोध लावला. 

 

मला मशिनवर्क करण्यात आनंद नाही वाटत. मी लोकांना वैविध्य देते. लोकांनाही ती सवय झाली आहे. त्यांच्याकडून मला प्रतिसाद मिळतो कारण मी व्हेरिएशन्स देते. 

 

मी सुरुवात केली तेव्हा पहिल्या वर्षी मी होलसेलच्या दुकानांत जाऊन विचारले. दुसऱ्या वर्षीपासून मी मुलाच्या शाळा-परीक्षांमुळे घरात प्रदर्शन लावायला सुरुवात केली. त्याचा मला खूप छान अनुभव आला. एकतर माझे भाडे वाचते. बाहेर कुठे जावे लागत नाही. घरातील सगळी कामे मॅनेज करू शकते. त्याचवेळी मी आतल्या खोलीत कामही करू शकते. प्रदर्शनाची जाहिरात मी व्हॉटसअप ग्रुपवर टाकते. लोकांनाही ते स्वस्तात पडते. बाहेरच्या प्रदर्शनांत ते थोडे महाग पडते. २-३ वर्षांनी मी २-३ दिवसांची प्रदर्शनेही बाहेर करायला लागले. आधी शेअरिंग बेसिसवर करत होते. टेबल शेअर केले, की भाडे कमी लागते. आता १४-१५ हजाराचे भाडे घेऊन मी स्टॉल घेते, तेवढी कपॅसिटी आली आहे. पण हा टप्पा गाठायला मला आठएक वर्षे लागली. २०११-१२ ला हा व्यवसाय सुरू केला. आता मी काउन्सेलिंग बंद करून पूर्ण वेळ हाच व्यवसाय सुरू केला आहे. माझी आणि समाजाची गरज, असे कॉम्बिनेशन करून हा व्यवसाय मी हळूहळू करते आहे. एका मैत्रिणीला सूनेच्या स्वागतासाठी पायघड्या हव्या होत्या मग मी पैठणीच्या पायघड्या केल्या. पण लक्षात आले हे दहा मिनिटाचे कौतुक असते. पुढे याचा उपयोग काय. पण तो क्षण महत्त्वाचा असतो. त्यामुळे मग मी पायघड्या, आंतरपाट, लग्नासाठी लागणाऱ्या महिरपी, औक्षणासाठी लागणाऱ्या सुपाऱ्या, नारळ या सगळ्या गोष्टी मी केल्या आणि त्या मी भाड्याने देते. असे मी सेटच करून ठेवलेले आहेत. त्यात मी वेगवेगळे अडिशन करते आहे. माउथ पब्लिसिटीने खूप लोकांकडून मला ऑर्डर्स आल्या. 

 

मार्केटिंगचा दुसरा मार्ग म्हणजे सोशल मीडिया. इथे मी गेली ३-४ वर्षे अक्टिव्ह आहे. फेसबुकवरच्या ग्रुपवरून मला चांगल्या ऑर्डर्स येतात. संपूर्ण भारतात मी माझी प्रॉडक्ट्स कुरिअरने पाठवते. या दिवाळीत अगदी चंदिगड, पंजाब, दिल्लीलाही या कलाकृती गेलेल्या आहेत. सोशल मीडियामुळे आपण बऱ्यापैकी कनेक्टेड होतोय. रिस्क असते खूप, फक्त जागे राहायचे आणि व्यवसाय करायचा. गूगल पे अकाउंटवर फार बॅलन्स ठेवायचा नाही. कारण जितका सोशल मीडिया मदत करतो, तितके फ्रॉडही होतात. त्यावर लक्ष ठेवले तर व्यवस्थित होते. विविध ग्रुप्सवर होणारे लाइव्ह प्रोग्रामही मला खूप उपयोगी पडतात. सोशल मीडियाचा चांगला वापर केला, तर हे माध्यम खरेच खूप छान आहे. अन्यथा मी इतक्या लोकांपर्यंत कशी पोचले असते!  

 

प्रश्न – कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सांगाल?  

मंजुषा भट – मी मूळची बदलापूरची. माझी आई शाळेत प्रिन्सीपॉल होती. वडील रेल्वेत होते. माझे मिस्टर एका मल्टिनॅशनल कंपनीत आशिया खंडाचे सेल्स आणि मार्केटिंगचे प्रमुख आहेत. ते मेटॅलर्जिस्ट आहेत. त्यामुळे ते सतत देश-परदेशात फिरतीवर असतात. मी कुठे नोकरी केली नाही. एक मुलगी डॉक्टर आहे, एम.डी. करते आहे. मुलगा एमआयटीत इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला आहे. मुलांमुळे मी करिअर न करता फ्रीलान्सिंग करत होते. या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत माझ्या ४१ व्या वर्षी या व्यवसायाला सुरुवात झाली. बऱ्यापैकी उशिरा झाली, ही खंत मला कधीकधी वाटते. 

 

या कलेचे प्रशिक्षण मी काहीच घेतले नाही. हे मी बघून बघूनच करायला लागले. त्यामुळे माझे प्रकार एकसारखे नसतात. मला काही सुचले नाही, तर मी सगळे आवरून ठेवून देते. पण जे करते ते मनापासून करते. कला अंगात आधीपासून होती, आवड पहिल्यापासूनच होती. म्हणजे खूप लहानपणापासून या गोष्टी केलेल्या आहेत. हा नाद पुढे वाढत गेला. मी माझ्या मनानेच करत असल्याने कोणाबरोबर स्पर्धा नाही वाटत. 

 

प्रश्न – कोविड काळात कसे मॅनेज केलेत? 

मंजुषा भट – या काळात गेल्या वर्षीपेक्षा माझ्या उत्पादनांचा खप कमी झाला होता. पण मी याच काळाचा असा उपयोग केला, की ज्याचा मला आत्ता फायदा होतो आहे. आधी सांगितले त्याप्रमाणे कापडाला आकार देऊन मी त्याची माळ केली आणि त्याच्या रांगोळ्या केल्या. हे कौशल्य मी कोविड काळातच आत्मसात केले. तेव्हा मी घरात रिकामी बसले होते. कारण तेव्हा मला मटेरियल आणणे शक्य नव्हते, करून पाठवणे शक्य नव्हते. कोणी विकतही घेणार नव्हते. सगळेच घरात होतो. त्यावेळी घरातली कामेही भरपूर होती. पण तरीसुद्धा मी हे करू शकते. घरात मोती शिल्लक आहेत तर त्याचा हार करू शकते. आणखी काय करू शकते, या गोष्टींचे इनोव्हेशन मी त्यावेळी नक्कीच केले. ज्यासाठी मला त्या वर्षी कमी, पण या वर्षी खूप छान प्रतिसाद मिळाला. त्या काळात प्रदर्शने नसल्याने तिथला सेल थांबला होता. पण सोशल मीडियावरून नंतर खूप ऑर्डर्स आल्या. घरातून बाहेर न पडता मी हा सगळा व्यवसाय त्या काळानंतर केला. माझे कस्टमरही बाहेर पडले नाहीत. जे मटेरियल लागते, तेही मी कुरिअरने मागवून घेतले. ओळखींचा उपयोग झाला. सगळे पार्सल मला घरात येत होते. हे सगळे मी एकटी करते. एक मुलगी आहे, पण ती फक्त मदतनीस आहे. मूळ जे डेकोरेटिव्ह काम आहे ते सगळे मीच करते. कारण करण्यातला आनंद खूप चांगला असतो. ते माझ्यासाठी मेडिटेशन आहे. मनापासून इच्छा असेल तर आपले शरीरही साथ देते. 

 

प्रश्न – महिला म्हणून काही अडचणी आल्या?

मंजुषा भट – खरे सांगायचे तर नाही आल्या. एकतर माझ्या या व्यवसायातून तयार होणाऱ्या उत्पादनांची आवड महिलांनाच असते. त्यामुळे माझा संबंध जास्त करून महिलांबरोबरच येतो. ज्यांच्याकडून मी मटेरियल घेते ते सगळे पुरुष असतात. पण त्यांच्याकडूनही मला चांगला अनुभव आला आहे. अगदी सुरुवातीला मला वेगळा त्रास झाला. त्यावेळी सुरुवात होती, त्यामुळे मी जिथे स्वस्त मिळत असे त्या दुकानांत मी, मला जे हवे आहे ते मिळवण्याकरता अक्षरशः दोन दोन – तीन तीन तास उभी राहायचे. तसे करताना लक्षात यायचे की आपल्याला हा त्रास होतो आहे. जे लोक भरपूर प्रमाणात घेतायत त्यांना हे आधी देतायत. आपले करतच नाहीत. पण मी चिकाटीने ते थांबत होते. आता तेच लोक फोनवरूनही मटेरियल पाठवून देतात. कष्टाला पर्याय नाही. या कामात पैशापेक्षा मन गुंतणे महत्त्वाचे असते. त्याकरता मला माझा हा व्यवसाय खूप काही देतो. पैशाव्यतिरिक्तच्या भरपूर गोष्टी मला यातून मिळतात. यातून मी माझा छंद जोपासते आहे. 

 

प्रश्न – व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिलांना काय मार्गदर्शन कराल? 

मंजुषा भट – महिलांनी व्यवसाय करावाच, या मताची मी आहे. एकतर ही आपली स्वतःची म्हणून ओळख राहाते.. आणि महिला जास्त चांगला व्यवसाय करू शकतात. याचा अर्थ पुरुष करू शकत नाहीत असे नाही. पण महिलांवर स्वयंपाकपाणी अशा घरच्या जबाबदाऱ्याही खूप असतात. त्यामुळे व्यवसायात उतरणे जास्त गरजेचे आहे. अशाप्रकारे आपल्या आवडी जपत जपत करण्यासारखे खूप व्यवसाय आहेत. सोशल मीडियामुळे रिसेलिंगचा व्यवसाय कोविड काळात खूप वाढलाय. पण या व्यवसायाला माझा तेवढा सपोर्ट नाही. कारण याचा पैसा कमावणे हा उद्देश आहे, तो सफल होतो, पण पलीकडचा माणूस काय प्रॉडक्ट पाठवतोय किंवा काय करतोय याची काहीच खात्री नसते. तुम्हाला त्यात काय २०-४० रुपयांचे मार्जिन सुटते तेवढेच. त्यापेक्षा आपल्याला आवडेल ते क्षेत्र निवडावे. खूप गोष्टी आहेत, ज्या आपण करू शकतो. फक्त आपली आवड काय हे ते आपले आपण ओळखायचे. 

 

प्रश्न – फ्युचर प्लॅन्स काय आहेत? 

मंजुषा भट – मी आधी म्हटले त्याप्रमाणे इको फ्रेंडलीकडे माझा कल झाला आहे. तसेच चायनीज गोष्टी बंद करायच्या आहेत. या दोन वर्षांत तेवढे जमले नाही. पण पुढे यातलेच काही वेगळे करणार आहे. ज्यातून मला इन्कम मिळेल, माझी आवड जपली जाईल त्याचबरोबर लोकांनाही ही उत्पादने कमी खर्चात मिळतील. 

 

– ऋता बावडेकर

  ‘गुंतवणूक’ हा या काळाचा परवलीचा शब्द झाला आहे. कोविडने तर गुंतवणुकीचे म...

  ‘लग्न म्हणा, सणवार म्हणा हातावर मेंदी रेखायला महिलांना निमित्तच हवं अस...

व्यवसायाचे स्वरुप सांगताना ‘मंगलम’ साडी सेंटरच्या सर्वेसर्वा मंगलताई बरम...

  कोणता व्यवसाय करायचा, हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. पण तरीही आपणच प्रत्...

  ‘मला चित्र काढायला आवडते, त्यावर लिहायला आवडते.. हे माझे मीच डेव्हलप केल...