गिफ्ट काय द्यायचं? हा कायम पडणारा प्रश्न सोडवलाय पुण्याच्या ‘ग्रीटवेल’ने

गिफ्ट काय द्यायचं? हा कायम पडणारा प्रश्न सोडवलाय पुण्याच्या ‘ग्रीटवेल’ने

 

दीपक जाधव यांनी १९७८ साली या दुकानाची सुरुवात केली. लोकांना आनंदाने भेटा, त्यांना खुश करण्यासाठी हटके भेटवस्तू द्या अशीच या दुकानाची कल्पना असल्याचं जाधव सांगतात. वाढदिवसानिमित्त भेट देण्याच्या शेकडो वेगवेगळ्या वस्तूंचं दुकान ते चार दशकांहून अधिक काळ यशस्वीपणे चालवत आहेत. काळानुसार एखाद्या शुभप्रसंगी भेट देण्यासाठी वस्तूंची बदललेली व्हरायटी जाधव यांनी स्वतः अनुभवली असल्यामुळं ते आता यातले तज्ञ झाले आहेत. ८०-९० च्या दशकात मोबाईलची सुरुवातही नसल्याने लोकांना पत्रांचं अप्रूप होतं.

 

त्यात रेडिमेड ग्रीटिंग कार्ड (शुभेच्छा पत्र) हा प्रकार पुण्यात जाधव यांनीच पहिल्यांदा आणला. हाताने लिहिलेल्या पत्रांमध्ये भावनांचा स्पर्श असला तरी त्याला शोभिवंत मुलामा दिल्यानंतर त्याचं खुलणारं रूप काही औरच असल्याची जाणीव त्यावेळी लोकांना होत होती. ग्रीटिंग कार्डचं हेच नावीन्य पाहून दुकानात पत्र घेण्यासाठी लोकांची गर्दी व्हायची. त्याकाळी तारुण्यात असलेली मुलं-मुली आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये ग्रीटिंग कार्डची फार क्रेझ असल्याचं दीपक जाधव सांगतात. मराठी चित्रपट आणि नाटकसृष्टीतील बरेच कलाकार या दुकानातून शुभेच्छा पत्रं आणि इतर भेटवस्तू घेऊन गेले आहेत. यामध्ये विक्रम गोखले, अजिंक्य देव, उषा मंगेशकर ही नावं सुपरिचित आहेत. 

‘eयशस्वी उद्योजक’ 20 मित्रांसोबत SHARE करा आणि मिळवा एक खास आकर्षक भेट!

वेगळेपण – हल्ली वेगवेगळ्या नातेसंबंधांतील वाढदिवस मोठ्या जोमाने साजरे करण्याचा प्रकार आपल्याकडे पाहायला मिळतो. आधी फक्त कौटुंबिक पद्धतीने साजरे होणारे वाढदिवस आता भाई का बड्डे म्हणत ताई, मावशी, मामा, काका, आजोबा, प्रेयसी, आजी, शिक्षक, कंपनीतील बॉस, जिवलग मित्र अशा बऱ्याच जणांना सोबत घेऊन साजरे केले जातात. या प्रत्येक नात्याशी संबंधित ग्रीटिंग कार्ड तुम्हाला ग्रीटवेलमध्ये खरेदी करता येईल. लग्नाचा वाढदिवस असो किंवा पहिल्या भेटीचा, बायकोचा वाढदिवस असो किंवा आईचा शेकडो प्रकारची ग्रीटिंग कार्ड्‌‍स याठिकाणी तुमची वाट बघत असतात.

 

मराठी आणि इंग्रजी भाषेतील ग्रीटिंग्ज या ठिकाणी उपलब्ध आहेत. व्हॅलेंटाईन आठवड्यात तर प्रेमवीरांनी दुकान गजबजून गेल्याच्या आठवणीही ग्रीटवेलकडे आहेत. ग्रीटिंग कार्ड व्यतिरिक्त फोटोफ्रेम्स, की-चेन, कॉफी मग, टेडी बिअर्स, म्युरल्स, वेगवेगळ्या डायरीज, फेंगशुई, हॅपीमॅन, परफ्युम बेल्ट्स, वॉलेट्स अशा इतर भेटवस्तूही या ठिकाणी पहायला मिळतात. १९७८ साली छोट्या दुकानातून सुरू झालेला हा प्रवास आता ३ मजली इमारतीपर्यंत पोचला आहे. भेटवस्तूंनी खचाखच भरलेलं हे दुकान पहायची मजा औरच आहे.

 

व्यवसाय विस्तार – पुण्यातील मध्यवर्ती परिसरात हे दुकान असल्याने ग्राहकांची गर्दी याठिकाणी पहायला मिळते. मागील ४० वर्षांत जोडला गेलेला ग्राहक आजही हक्काने या ठिकाणी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी येतो. दिलीप जाधव यांचे चिरंजीव सुधन्वा जाधव हे आता दुकानाची पूर्णवेळ जबाबदारी सांभाळत आहेत. आमची शाखा कुठेही नाही म्हणत जाधवांनी आपलं वेगळेपण जपून ठेवलं आहे. दुकानात असणाऱ्या वस्तूंची खरेदी मुंबई बाजारातून केली जाते.

 

टीव्ही चॅनेलवर एखादी सिरीयल चालली किंवा एखादा दमदार चित्रपट आला की त्यातील स्टाईल फॉलो करत गिफ्ट घेण्याकडे तरुणाईचा कल वाढतो. त्यानुसार भेटवस्तूंची खरेदी केली जात असल्याचं सुधन्वा सांगतात. सध्या दुकानात ८ कर्मचारी काम करतात. काही वर्षांपूर्वी आकाशवाणी केंद्रावर ग्रीटवेल संदेसे आते हैंहा उपक्रमही दुकानामार्फत चालवला गेला. वाढदिवस असलेल्या आपल्या जवळच्या व्यक्तीला फोन करून शुभेच्छा देण्याचा हा उपक्रम पुणेकर जनतेला आजही लक्षात आहे. 

 

व्यवसायातील आव्हानं – सध्या तरुणाईचा वाढदिवस साजरा करण्याचा कल बदलला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देणं, पार्टीसाठी बाहेर जाणं यामुळं ग्रीटिंग कार्ड आणि भेटवस्तू देण्याचा ट्रेंड मागील ५-७ वर्षांत कमी झाला आहे. जुनी लोकं, ज्येष्ठ नागरिक मात्र अजूनही ग्रीटिंग कार्ड आणि भेटवस्तूंच्या खरेदीसाठी दुकानात येतात. ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय उपलब्ध झाल्याने थेट वाढदिवस असलेल्या व्यक्तीच्या पत्त्यावर भेटवस्तू पाठवणं हा प्रकारसुद्धा रुढ झाला आहे.

 

याशिवाय भेटवस्तू म्हणून कपडे, घड्याळं, मोबाईल अशा वस्तू देण्याचं प्रमाण वाढल्याने पारंपरिक भेटवस्तूंकडे लोकांचं दुर्लक्ष होऊ लागलं आहे. लॉकडाऊन काळात शाळा-कॉलेजेस बंद असल्यानं मुला-मुलींची दुकानातील गर्दी कमी झाली. मागील वर्षभरात दुकानाच्या वेळेसंदर्भात वेगवेगळ्या मर्यादा घातल्या गेल्याने त्याचाही परिणाम दुकानावर झाल्याचं जाधव सांगतात.

 

उमेद आणि पुढील नियोजन – असं असलं तरी काही सुधारित बदलांसह दुकानाचं आणि त्यातील भेटवस्तूंचं रुपडं बदलण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सुधन्वा जाधव यांनी सांगितलं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन मार्केटिंगच्या माध्यमातूनही व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आठवड्यात एकदाही सुट्टी न घेता चालणारं दुकान म्हणून ग्रीटवेलने आपल्या कामातील सचोटी आणि लोकांसाठी उपलब्ध असण्याची बांधीलकी दाखवून दिली आहे. आपल्या आप्त लोकांच्या वाढदिवसानिमित्त काही हटके भेटवस्तू आणि ग्रिटींग कार्ड देण्याच्या विचारात असाल तर एकदा ग्रीटवेलला नक्की भेट द्या. 

 

पत्ता – १२५०, डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे ४११००४

संपर्क – ९८२२७७५८५५, ०२०-६६०१४१३२

ईमेल – greetwelcard@gmail.com

 

– योगेश जगताप

युनिक फीचर्समध्ये कार्यरत, विविध विषयांवर लेखन

एकाच शेतजमिनीवर वेगवेगळे थर लावून अनेक मजल्यांवर शेती करण्याला हायड्रोपो...

नोकरी करतानाच आजूबाजूच्या कंपन्यांचा अभ्यास केला आणि मालाची विक्रीही  एक...

आय.टी. इंडस्ट्रीमध्ये चित्रपटसृष्टीप्रमाणे अनेकांना हिरो व्हायचे असते, ग्...

विजय माने या चाळीशीतल्या तरुणानं 2017 साली आपल्या दोन सहकार्‍यांसमवेत मुंबईत...

‘छत्रपती शिवाजी महाराज’ हा महाराष्ट्रातील सर्वांच्याच अभिमानाचा विषय आहे...