Social Mediaचा प्रभावी वापर करा आणि जास्त पैसे मिळवा

Social Mediaचा प्रभावी वापर करा आणि जास्त पैसे मिळवा

 

‘लिंक्ड इन’ असो वा फेसबुक, इंस्टाग्राम असो वा ट्वीटर, प्रत्येक सोशल मिडियाचे स्वतःचे असे महत्व आहे, जे बिझिनेस करणाऱ्या जाणकाराला माहित असते. सोशल मिडियावर अनेकजण आपापल्या परीने व्यक्त होतात. ती मते चुकीची असो वा बरोबर, ते महत्वाचे नसून व्यक्त होण्याला एक फोरम मिळालेले असते. त्याचा वापर अनेकजण स्वतःच्या कल्पना मांडण्यासाठी करतात. आताची तरुण पिढी एकसारखा विचार करत नाही, कारण त्यांच्यामध्येसुद्धा  पिढीचे अंतर असते. पाच दहा वर्षाचे अंतर असलेले भाऊ-बहीण एकमेकाला दुसऱ्या पिढीचे समजतात. तरुणांना आता फेसबुक जुन्या जमान्याचे वाटते तर थोडक्यात काही सांगू पाहणारे इंस्टाग्राम आपलेसे वाटते. काही जणांना दोन वाक्यात व्यक्त होणारे ट्वीटर ‘आपलेसे’ वाटते आणि इतर सोशल मिडीया फोरम ‘बोअरिंग’ वाटतात. थोडक्यात सोशल मिडीया एकमेकांशी ‘नेटवर्क’ जुळवण्यासाठीचे स्टेज आहे आणि प्रत्येक बिझनेस करणाऱ्याने आपले ‘प्रॉडक्ट’ कोणाला विकायचे आहे त्यांचा वयोगट लक्षात घेऊन सोशल मीडियाची निवड करायला हवी.

 

१४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतातील सोशल मिडीयाचा वापर करणाऱ्यांची संख्या गेल्या सहा वर्षात १४ कोटी वरून ६३ कोटी इतकी वाढली आहे. त्यामुळे बिझिनेस करणाऱ्या कोणीही सोशल मिडीयाचा विचार केला नाही तर स्पर्धेत तो उद्योग मागे पडणार, हे नक्की.  आता या फोरमचा वापर करायचा असे ठरले तर त्याचा वापर कसा करायचा याचे नियोजन करणे ही त्याची पुढची पायरी. काही वर्षांपूर्वी कंपनीची वेबसाईट करणे आणि त्या वेबसाईटला इंटरनेटवर शोध घेणारे ‘व्हिजीट’ करतील यासाठी गुगल सर्च इंजिनद्वारे तशी ‘तजवीज’ करणे याला प्राधान्य असायचे.  आता अनेक सोशल मिडीया साईटवर तुमच्या कंपनीच्या प्रॉडक्टचे नाव कायम दिसणे गरजेचे आहे. शिवाय सोशल मिडीयावर वृत्तपत्र / टीव्ही / रेडियो प्रमाणे ‘आमची टूथपेस्ट विकत घ्या’ अशी थेट जाहिरात करायची नसते.  

 

  • यासाठी पहिली पायरी म्हणजे आपल्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या वाढवणे.  तुमचा यु ट्यूब चॅनेल असो वा  इंस्टाग्राम अकौंट असो वा फेसबुक पेज असो, त्याला फॉलो करणारे हजारो मिळवायला हवेत.  सुरुवातीचे काही व्हिडियो जाहिरातीचे असल्यास फॉलो करणारे कमी होतात.  त्यामुळे सुरुवातीपासून मजकूर महत्वाचा.  थोडक्यात महत्वाचे सांगण्याची कला अंगी बाणवायला हवी.  तुमचा आवाज कितीही चांगला असला तरीही विलंबित ख्याल ऐकायला सोशल मिडीयावर कोणाला वेळ नाही. 
  • दुसरी महत्वाची बाब अशी आहे की तुम्ही पोस्ट करता ती वेळ कोणती आहे.  कार्यालयीन वेळेपूर्वी (लोक प्रवासात असतात तेव्हा), ऑफिस सुटल्यानंतर (लोकल/बसमध्ये बसल्या बसल्या लोक सर्फिंग करतात तेव्हा), शनिवारी-रविवारी ठराविक वेळा सोडून (उदा रविवारी सकाळी ७ वाजता आणि दुपारी २ या दोन्ही वेळा कमी वाचकवर्ग असतो). 
  • तुमचे स्पर्धक कोणता सोशल मिडीया वापरतात याकडे लक्ष द्यायला हवे आणि त्यांच्या एक पाउल पुढे जाण्याचा प्रयत्न करायला हवा. 
  • तुम्ही वेगवेगळ्या शहरा – गावाकरीता वेगवेगळे सोशल मिडीया वापरू शकता.  ठराविक शहराबाहेर विशिष्ट सोशल मिडीया वापरले जात नसतील, तर त्याचा आढावा घेणे गरजेचे आहे.   
  • सोशल मिडीयावर ग्राहक सेवा केव्हाही उपलब्ध आहे असे “दिसणे” गरजेचे आहे.  त्यामुळे ग्राहकास खरेदी करण्यासाठी उद्युक्त केल्यानंतर त्यासंबंधी लिंक तिथेच तत्परतेने उपलब्ध असणे गरजेचे आहे.   ग्राहक ज्याप्रमाणे तत्परतेने ऑर्डर देऊ शकतो, तसेच रद्दही करू शकतो.  सोशल मिडीयावर विलंबित सेवा दिल्यास तो ग्राहक त्याच्या पाच-पन्नास मित्राना तसे कळवतो / तसे रेटिंग कंपनीच्या वेबसाईटवर कॉमेंटसह देतो (देते).  सोशल मिडीयावर नकारात्मक कॉमेंट प्रथम आणि सविस्तर वाचल्या जातात.  त्यामुळे ‘एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकीत जाईन चोहीकडे’ याचा सोशल मिडीयावर विपरीत परिणाम होतो.  याउलट कोणताही व्हिडियो/पोस्ट/प्रॉडक्ट लाईक करा, सबस्क्राइब करा, शेयर करा, शेजारच्या अलार्मवर क्लिक करा वगैरे सूचना प्रचार आणि प्रसार होण्यासाठी असतात.
  • सोशल मिडीयावर दरमहा एक पोस्ट करत राहिलात तर कोणी बघणार नाही.  या मिडीयावर निरंतर कृतीशील रहावे लागते.  परंतु रोज एक व्हिडियो टाकण्याचे आन्हिक उरकून चालणार नाही, त्यामध्ये वैविध्य आणणे गरजेचे आहे.    
  • सोशल मिडीयाचा वापर एकट्याने न करता स्पर्धकांच्याबरोबर नव्हे पण संलग्न उद्योजकांशी हातमिळवणी करणे कधीही फायद्याचे.  एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, ही उक्ती इथे आचरणात आणणे फायद्याचे आहे. 
  • तुमच्या वेबसाईटवर अनेकांनी व्हिजीट द्यायला हवी, तुमच्या सोशल मिडीया पोस्ट अनेकांनी बघायला हव्या, त्या बघितल्यानंतर त्यांनी फॉरवर्ड करायला हव्यात.  हे सर्व जमून येण्यासाठी मुळात हे सर्व अजाणतेपणे झाले आहे असे वाचकास वाटणे गरजेचे आहे. 

एकूण काय तर, तुमचा ब्रँड लोकांच्या नजरेसमोर नेहेमी असायला हवा. त्यासाठी सोशल मिडीयाद्वारे ‘जंगजंग पछाडणे’ आवश्यक आहे.

 

– सुहास किर्लोस्कर 

9422514910

  शेती संबंधी कोणत्याही उद्योगधंद्याबद्दल सकारात्मक बोलणारे आणि ‘बोले ...

  अनेक जण शाळा-कॉलेजमध्ये असताना ठरवतात की आपल्याला आयुष्यात पुढे काय कर...

  पर्यटनाचे अनेक प्रकार आहेत. भारतामध्ये आणि भारताबाहेर पर्यटन करताना लो...

  लॉकडाऊनच्या दरम्यान अनेक उद्योग ठप्प झाले तर अनेक जणांनी वेळेत आपल्या ...

  पुण्यात प्रॉडक्ट डिझायनींगची पदवी घेणारी नितीका पांडे डेन्मार्कमध्ये...