फक्त ११४० रुपयांचं भांडवल आणि घराच्या बाल्कनीत सुरुवात, आज २३ देशांमध्ये निर्यात

फक्त ११४० रुपयांचं भांडवल आणि घराच्या बाल्कनीत सुरुवात, आज २३ देशांमध्ये निर्यात

नोकरी करतानाच आजूबाजूच्या कंपन्यांचा अभ्यास केला आणि मालाची विक्रीही 

एक आटपाट नगर होतं, त्यामध्ये एका एकत्र कुटुंबात जयंत जोगळेकर नावाचा एक नोकरदार तरुण राहात होता. सकाळी नेमाने कामावर जावं. संध्याकाळी घरी आल्यावर कुटुंबाबरोबर भोजन करावं, गप्पा-गोष्टी कराव्यात आणि आला दिवस सुखा समाधानाने व्यतीत करावा असं त्याचं आयुष्य मजेत चाललं होतं. 

 

पण वरकरणी सगळं आलबेल असलं तरी या तरुणाच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं. त्याला काहीतरी व्यवसाय सुरू करावा असं वाटत होतं. नोकरी करता करताच आजूबाजूच्या कंपन्यांना कुठला कच्चा माल लागतो, तो कुठून येतो, कुठल्या गोष्टीची स्पर्धा कमी आणि मागणी जास्त आहे, अशा एक ना अनेक मुद्द्यांचा तपशीलवार अभ्यास तो करत होता. तेव्हा अ‍ॅडेसिव्ह टेप किंवा रबर विकणारे नाशिकमध्ये कोणीच नाही आणि बर्‍याच कंपन्यांमध्ये त्याला मागणी आहे, हे त्याच्या लक्षात आलं. नोकरी करता करताच त्याने या कंपन्यांना अ‍ॅडेसिव्ह टेप, नैसर्गिक रबर, रबर केमिकलचे वेगवेगळे प्रकार विकायला सुरुवात केली. 

 

नोकरी सोडून ज्योस्टिक अ‍ॅडेसिव्हज् प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली

पुढे नोकरी सोडून 1996 मध्ये नाशिक शहरात ज्योस्टिक अ‍ॅडेसिव्हज् प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी जयंत यांनी स्थापन केली. आता नाशिकमधल्या अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीत मिळून त्यांचे एकूण पाच प्लांट्स आहेत. ऑटोमोबाइल, इलेक्ट्रीक, मेकॅनिकल, लगेज, केमिकल अशा पाच क्षेत्रांमधील विविध उत्पादनांमध्ये ते आघाडीवर आहेत. त्याशिवाय पुण्यातल्या चाकण येथे तसंच चेन्नई आणि गुजरातमध्येदेखील कंपनीचा विस्तार करण्याच्या दृष्टीने त्यांनी जागा घेतल्या आहेत. त्यांच्या सगळ्या कारखान्यांमध्ये मिळून सुमारे दीडशे कर्मचारी कार्यरत आहेत. 

 

अ‍ॅडेसिव्ह टेपच्या विक्रीपासून जयंत यांनी आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. मग हळूहळू निर्यातक्षम महागड्या औषधांचं पॅलेट पॅकेजिंग, दुचाकी गाड्या, चारचाकी मोटारगाड्या, ट्रक्स अशा विविध निर्यातक्षम वाहनांच्या पॅकिंगसाठी लागणार्‍या ट्रान्स कव्हर्सच्या उत्पादनात ते उतरले. विविध प्रकारच्या पॅकिंगमध्ये वापरल्या जाणार्‍या ब्राऊन, पारदर्शक टेपसह 70 प्रकारच्या इंड्स्ट्रीयल टेप्सचं उत्पादन ते करतात. 

 

दोन दशकांत 22-23 देशांमध्ये निर्यातीचं जाळं उभारलं

दोन दशकांच्या कालावधीत पाच प्लांट उभारून 22-23 देशांमध्ये विविध कंपन्यांमार्फत आपल्या मालाच्या निर्यातीचं जाळं त्यांनी उभारलं आहे. त्यांची महिन्याची उलाढाल तीन ते चार कोटींपर्यंत पोहोचली. भारतातल्या टाटा मोटर्स, महिंद्र अँड महिंद्र, क्राँप्टन ग्रीव्हज्, ह्युंदाई, होंडा अशा मोठमोठ्या कंपन्या निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात त्याचा माल घेऊ लागल्या. 

 

1140 रुपये भांडवलासह घराच्या बाल्कनीतून व्यवसायाला सुरुवात 

जयंत सांगतात, “घरी वडील, मोठा भाऊ असं आमचं एकत्र कुटुंब होतं. त्यामुळे नोकरी सोडली तरी चरितार्थाचा प्रश्न एकदम सतावणार नव्हता. अमुक तारखेला पगार यायलाच पाहिजे असं दडपण नव्हतं. या सगळ्या अनुकूल गोष्टींचा विचार करून नोकरी सोडून पूर्ण वेळ व्यवसाय करण्याचा निर्णय मी घेतला. माझं पहिलं भांडवल 1140 रुपये हे ही मी भावाकडून घेतलं आणि चक्क आमच्या घराच्या बाल्कनीत एक टेबल टाकून बसायला सुरुवात केली. एक फोनही घेतला. 

 

(सध्याचा जमाना हा मार्केटिंगचा आहे. व्यवसाय वाढवायचा असेल, ग्राहक मिळवायचे असतील तर मार्केटिंग संदर्भातली deAsra  फाउंडेशनची सेवा अत्यंत उपयुक्त आहे. अधिक माहितीसाठी LINK   )

 

त्यापूर्वी दहा वर्ष मी काम केलं असल्याने कुठल्या कंपनीला काय हवं आहे हे मला माहिती होतं. त्यामुळे मागणी वाढू लागली. सुदैवाने बँकाकडूनही पाठींबा मिळाला. पुढे महिंद्र अँड महिंद्र कंपनीला विशिष्ट रबराचे पार्ट लागतात, ते पुरवायला लागलो. त्यापूर्वी हे सगळं रबर दिल्ली आणि मुंबईहून यायचं. क्राँप्टन आणि व्ही.आय.पी. या दोन्ही कंपन्यांना मी पुरवठा करायचो. रबर टू मेटल चिकटवण्यासाठी केमिकल लागतं. नाशिकमध्ये त्याची एक अमेरिकन कंपनी होती, तीच फक्त ते पुरवायचे. त्याचा मी सोर्स शोधला आणि त्याचीही विक्री सुरू केली. त्यानंतर नाशिकमधल्या सगळ्या कंपन्या माझ्याकडूनच माल घ्यायला लागल्या. 

 

‘eयशस्वी उद्योजक’ 20 मित्रांसोबत SHARE करा आणि मिळवा एक खास आकर्षक भेट!

 

रबर, केमिकल, अ‍ॅडेसिव्ह टेप, बाँडिंग एजंट एवढ्या गोष्टी मी विकायचो. त्यापैकी एकावर म्हणजे अ‍ॅडेसिव्ह टेपवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला. फार्मा, लगेज, प्रिंटिंग, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल या सगळ्या कंपन्यांना अ‍ॅडेसिव्ह टेप लागायचा. टाटा, महेंद्र, व्ही.आय.पी. या कंपन्यांचं मिळून माझ्याकडे नाशिकचं 80 टक्के टेपचं मार्केट होतं. नंतर मग मी एक लेथ मशीन विकत घेतलं. त्याला कटरमध्ये रूपांतरित केलं. आणि 1999 साली टेपचं कन्व्हर्जन सुरू केलं ( म्हणजे तीन हजार मीटरचे अ‍ॅडेसिव्ह टेपचे मोट्ठाले रोल आणून ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार ते कापून द्यायचे). त्यासाठी वाइंडर, पाच ऑटोमॅटीक स्लायसर मशीन कटिंग करून देण्यासाठी घेतल्या. पुढे 2004 मध्ये एम.आय.डी.सीत जागा घेतली आणि या टेप्सचं उत्पादन सुरू केलं. आता माझ्याकडे सुमारे 70 प्रकारच्या अ‍ॅडेसिव्ह टेप्सची निर्मिती होते. 

 

फार्मास्युटीकल वापराकरता एअर कार्गो कव्हर्स विकसित केली 

मेडीकल पॅलेट – भारतातून असंख्य औषधं हवाई मार्गाने विदेशात निर्यात होतात . विशिष्ट तापमान नियंत्रित असलेल्या कंटेनर्समधून ही औषधं विमानतळावर उतरवली जातात. ती परत विमानात लोड होईपर्यंत कधीकधी दोन, तीन, दिवस लागतात. या काळात बाहेरच्या उष्णतेचा किंवा जास्त थंडीचा त्या औषधांवर विपरीत परिणाम होतो. तो टाळण्यासाठी विशिष्ट प्रकारचं पॅलेट पॅकिंग ज्योस्टिकने विकसित केलं आहे. एक, एक पॅलेट पॅकिंग दीड -दोन कोटी रुपयांची असतात. जे औषधांचं तापमान 15-ते 25 डिग्रीपर्यंत नियंत्रित ठेवतं. औषधांमध्ये तयार होणारी उष्णता या कव्हर्समधून बाहेर पडते. यू.व्ही लाईटपासूनही औषधांचं रक्षण होतं. बाहेर थंडी असली तरीही आतलं तापमान नियंत्रित राहतं. 

 

मेडिकल पाऊचेसचं पॅकिंग 

ऑपरेशन थिएटरमध्ये निर्जंतुक केलेली जी उपकरणं असतात, त्यांच्या उत्पादकांना एक विशिष्ट पॅकेजिंग लागतं, जे एकाच वेळेस ब्रिथेबल (ज्यातून हवेचं अभिसरण होऊ शकेल असं) आणि बाहेरचे जीवाणू , विषाणू यांच्या शिरकावास मज्जाव करणारं असावं लागतं. ज्योस्टिककडे अशा प्रकारचं उत्पादन करणारं एक सुसज्ज युनिट आहे. ग्लेनमार्क, ल्युपिन, सन फार्मा डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी अशा अनेक नामांकित औषधं कंपन्यांना ही उत्पादनं ज्योस्टिक पुरवते. बर्‍याच फार्मा कंपन्यांना मेडीकल पॅकेजिंगसाठी लागणारे टेप, ब्राऊन टेप, ट्रान्सपरंट टेपदेखील पुरवले जातात. 

 

महिंद्र अँड महिंद्र आणि टाटा मोटर्सच्या वाहनांचं पॅकिंगच काम ज्योस्टिककडे

महिंद्र अँड महिंद्र ,टाटा मोटर्स, ह्युंदाई आणि होंडा मोटर्स या कंपन्यांची दुचाकी वाहनं, कार्स, ट्रक्स मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या देशात निर्यात होतात. त्यापैकी महिंद्र अँड महिंद्र आणि टाटा मोटर्स यांच्या शंभर टक्के, तर उरलेल्या इतर कंपन्यांच्या वाहनांचं काही प्रमाणात पॅकिंग करण्याचं काम ज्योस्टिककडे आहे. आता ही पॅक झालेली गाडी नाशिकहून निघाली आणि समुद्रमार्गे जहाजातून ती चिली किंवा साऊथ आफ्रिकेत जाणार असेल तर कंपनीतून गाडी निघाल्यापासून ती डीलरकडे आणि तिथून ग्राहकाकडे पोहोचेपर्यंत दोन ते सव्वा दोन महिन्यांचा कालावधी लागतो.

 

या प्रवासादरम्यान गाड्यांवर चरे पडू नये, त्यांचा ग्लॉस (चमक ) खराब होऊ नये, यासाठी गाड्यांच्या शेपप्रमाणे त्यांच्या मापाची कव्हर्स ज्योस्टिक बनवून देते. यासाठी लागणार्‍या फॅब्रिकवर विशिष्ट ट्रीटमेंट करावी लागते. त्याचे डायकट बनवावे लागतात. त्यांचं अ‍ॅप्लीकेशन ज्योस्टिकची टीम करते. ट्रकपासून ते टू व्हीलरपर्यंत ही कव्हर्स घालून वाहनांचं पॅकिंग ज्योस्टिक करून देते. 

 

यासाठी विशिष्ट प्रकारचं फॅब्रिक, फिल्म, पेपर, इतर कच्चा माल युरोप आणि अमेरिकेतून येतो. तर काही इन हाऊस त्यांच्या फॅक्टरीत बनवला जातो. अमेरिकेतून जे फॅब्रिक येतं ते ब्रीथेबल फॅब्रिक असतं. शिवाय त्याचवेळा ते जलरोधक असल्यामुळे पाणी आत जाऊ शकत नाही. यू.व्ही. लाईटपासून संरक्षण करण्याची क्षमताही त्यात असते. अन्यथा उन्हामुळे रबर कडक होऊ शकतं. 

 

एका जर्मन कंपनीबरोबर जयंत यांनी नुकताच एक करार केला आहे, त्यानुसार त्या कंपनीशी संलग्न असलेल्या मर्सिडीजसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांनाही आता ते थेट मालाचा पुरवठा करू शकणार आहेत. अमेरिकेतली कोल्ड चेन टेक्नॉलाँजी म्हणून एक कंपनी आहे. त्यांच्याबरोबर त्यांचा कन्व्हर्जन करार झाला आहे. 

 

आटपाट नगरातल्या नोकरदार तरूणाची आणि त्याच्या उद्योगाची ही कहाणी नोकरदार तरुणांना आणि उद्योजकांनाही प्रेरणा देणारी ठरेल यात शंका नाही.

 

– मृणालिनी ठिपसे

युनिक फीचर्समध्ये कार्यरत, उद्योजकता व विविध विषयांवर लेखन

mrunalinithipse@gmail.com

इंडियन एयरफोर्स आणि इतर खासगी विमान कंपन्यांमध्ये पायलट म्हणून आपली कारकी...

व्यवसाय करण्यासाठी ‘फूड इंडस्ट्री’ मध्ये जायचं ठरवले की, सुरूवातीला ‘मेन...

चाळीशी पार केलेला एक अभियंता ‘उल्हास पेद्दावाड’ हा या कथेचा नायक आहे. उल्हा...

आपल्याला आपल्या स्वप्नांसाठी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अनंत अडचणीं...

अंबेजोगाईचा शुभम महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आला. पुण्याच्या गरवार...