एकदा देशी ‘मावळा’ खेळून बघा, Minecraft, Free Fire सगळेच Online Game विसरून जाल

एकदा देशी ‘मावळा’ खेळून बघा, Minecraft, Free Fire सगळेच Online Game विसरून जाल

‘छत्रपती शिवाजी महाराज’ हा महाराष्ट्रातील सर्वांच्याच अभिमानाचा विषय आहे. परंतु त्यांच्या स्वराज्य मोहिमेबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल आपल्याला माहिती असते का? शालेय जीवनात शिवबा ते शिवाजी महाराज असा प्रवास क्रमिक पुस्तकातून समजला तरी “महाराजांच्या चार गोष्टी सांगा”, असे विचारल्यानंतर ‘बोटे तोडली’, ‘कोथळा बाहेर काढला’, ‘भवानी तलवार’, ‘आग्र्याहून सुटका’ यापलीकडे फार काही वेगळे सांगता येत नाही. महाराजांच्या अनेक कौशल्यापैकी एक म्हणजे ‘नियोजन’ आणि दुसरे म्हणजे उत्कृष्ट ‘टीम वर्क’. महाराजांनी एकापेक्षा एक शिलेदार जमवले होते. त्यापैकी किती जणांची नावे आपल्याला सांगता येतील? महाराजांनी कमावलेल्या किती गड-किल्ल्यांची नावे आपण शाळकरी मुलांना सांगू शकतो? अशा प्रश्नांवर अनिरुद्ध राजदेरकर यांनी उपाय शोधला, तो म्हणजे व्यापार सारखा बोर्ड गेम. अनिरुद्ध राजदेरकर यांनी त्याचे मित्र शंतनू कुलकर्णी याच्याबरोबर मिळून मावळा द बोर्ड गेम बनवला आहे. हे समजताच तो गेम विकत घेतला आणि खेळल्यानंतर लक्षात आले की अशा खेळातून इतिहास शिकण्याची कल्पना फारच भन्नाट आहे. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अनिरुद्ध यांच्याबरोबर संपर्क साधला. 

 

मुलाला खेळताना बघितलं आणि कल्पना सुचली .. 

एका कंपनीमध्ये सेल्स विभागामध्ये काम करता करता स्वतःची कंपनी स्थापन केली. त्यानंतर लॉकडाऊन सुरु झाला. या काळात आपला मुलगा ‘मार्व्हल’ सारखे गेम खेळतो आहे आणि अतिशय तन्मयतेने त्यामध्ये रममाण होत आहे हे लक्षात आले. मुलाबरोबर असे गेम खेळता खेळता अनिरुद्ध यांनी बघितले की पाश्चात्य जगातले सुपर हिरो मुलांना अधिक आवडतात. आपल्या मातीतले सुपर हिरो असणारा कोणताच गेम अस्तित्वात नाही यांची खंत वाटली. चित्रपटामधूनही प्रत्येकजण आपल्याला सोयीस्कर इतिहास सांगत असतो हे आपण बघतोच. शाळेतला इतिहास शिकताना शिवछत्रपती यांच्या योद्ध्यांबद्दल काहीच सांगितले जात नाही त्यामुळे ‘शिव’विश्व मुलांपर्यंत पोहोचत नाही हे अनिरुद्ध यांना प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे अनिरुद्ध यांनी आपल्या मुलाला प्रत्येक स्वराज्ययोद्ध्यांच्या गोष्टी सांगण्यास सुरुवात केली. गोष्ट सांगण्यासाठी माहिती घेताना अनिरुद्ध यांना जाणवले की शिवाजी महाराजांचे असे किमान १२५ योद्धे आहेत, ज्यांची माहिती सर्वसामान्य पालकांना-विद्यार्थ्याना माहित नसते. या विचारातून या योद्ध्यांना एक चेहरा द्यावा, शिवजन्मापासून शिवराज्याभिषेकापर्यंतचा इतिहास जाणून घेता घेता एकेक शिलेदार समजून घेता यावेत या कल्पनेतून ‘मावळा’ या खेळाची कल्पना अनिरुद्ध याना सुचली. 

 

मित्र शंतनू कुलकर्णी यांना या खेळाबद्दल माहिती देताच त्यांनीही त्यांच्या ‘अनिमेशन’ क्षेत्रातील अनुभवाचा ‘हात’ पुढे केला. इतिहासाचा अभ्यास करता करता ‘मावळा’ या खेळाला मूर्त स्वरूप आले. व्यंकटेश मांडके, त्यांचा प्रिंटींग व्यवसायामधला अनुभव घेऊन आले आणि या उपक्रमामध्ये हिरीरीने सहभागी झाले. जुलै २०२१ पासून हा गेम विक्रीसाठी तयार झाला आणि आजतागायत १०,००० बोर्ड गेमची विक्री झाली आहे. अनिरुद्ध यांच्या मिती इन्फोटेनमेंट या संस्थेने बनवलेल्या मावळा बोर्ड गेमने राष्ट्रीय पातळीवर भरलेल्या भारतीय खेळाच्या स्पर्धेत ‘टॉयकेथॉन’मध्ये १९००० स्पर्धकांमध्ये विजेतेपद मिळवले आहे, हे विशेष. शिवजयंती साजरी करावी तर अशी. भगवे झेंडे घेऊन बाईकवरून फिरणे, मशाली पेटवणे किंवा कारच्या मागे महाराजांची प्रतिमा लावणे यापेक्षा महाराजांच्या कार्याची माहिती घेणे आणि त्यांच्या धोरणीपणाची अंमलबजावणी रोजच्या आयुष्यात करणे हीच महाराजांच्या आठवणी जागृत ठेवण्याची योग्य पद्धत आहे. अनिरुद्ध यांनी उद्योजकतेमधून जे धाडसी पाउल टाकले आहे, त्याचे मोल या दृष्टीकोनातून मोठे आहे.

 

 

‘eयशस्वी उद्योजक’ 20 मित्रांसोबत SHARE करा आणि मिळवा एक खास आकर्षक भेट!
 

 

ऑनलाईन गेम उपलब्ध 

‘मावळा’ हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळ ते शिवराज्यभिषेक अशा 100 स्टेजचा हा गेम आहे. हा गेम पूर्णपणे व्यापार या गेमसारखा आहे. या मावळा द बोर्ड गेममध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रत्येक लढाई आणि त्यांच्याबरोबर असलेल्या मावळ्यांचा इतिहास यात मांडण्यात आला आहे. यात मावळे, विविध रंगी मुद्रा असून या गेम जसजसे खेळत जाल तसतसे यात प्रत्येक मावळा तसेच अनेक घटनांचा इतिहास वाचता येणार आहे. हा गेम मराठी आणि इंग्रजी मध्ये या गेमच्या वेबसाईटवर किंवा अमेझॉन सारख्या वेबसाईटवर मिळतो. गेम कसा खेळावा याबद्दल वेबसाईट वर माहिती आहेच शिवाय गेमसोबत मिळणाऱ्या पुस्तिकेमध्ये याबद्दल सविस्तर वाचता येईल. (https://www.mawalaboardgame.com/) या खेळामध्ये शिवरायांसाठी लढलेले २० स्वराज्ययोद्धे आपल्याला साथ देतात, एकेक दुर्ग सर करता करता राज्याभिषेकापर्यंत पोहोचता येते. या गेममध्ये शिवकालीन ‘होन’ या चलनाचा वापर केला जातो. यामधील हिशेब ठेवण्याचे काम लवकरच एका मोबाईल App द्वारे होणार आहे.

 

हा गेम खेळता खेळता मुलांचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो, त्याना शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची माहिती होते, गड-किल्ल्यांची माहिती काही खेळामध्ये मुखोद्गत होते. ‘मार्व्हलपेक्षा आमचा मुरारबाजी भारी’ अशी मुलांची प्रतिक्रिया येते. बोर्ड गेम खेळता खेळता यशवंतराव बाजी पासलकर, कान्होजी जेधे, तान्हाजी मालुसरे, रघुनाथ अत्रे, नेताजी पालकर, शिवाजी काशिद, दौलतखान, हंबीरराव मोहिते असे एकापेक्षा एक २० शिलेदार आपल्या परिचयाचे होतात. साल्हेरगड, सुभानमंगल, सिंधुदुर्ग सारख्या १० किल्ल्यांची तपशीलवार माहिती आपल्याला खेळता खेळता समजते. फिनलंड, कनडा, अमेरिका, इंग्लंड अशा ठिकाणी या बोर्ड गेमवर आधारित लाईव्ह रणांगणे गेम स्वरूपात झाली आहेत, ही आणखीनच अभिमानाची बाब आहे. याचे पुढचे पाऊल म्हणून असे अनेक गेम्स तयार करण्याचा अनिरुद्ध यांचा मानस आहे. त्यापेकी स्वराज्ययोद्ध्यांची जिगसॉ पझल्स, ‘मोहीम’ सारखे गेम्स, My Hero संकल्पनेवर टी शर्ट अशा १५० संकल्पना त्यांच्या डोळ्यापुढे आहेत. इतिहास समजून घ्यावा आणि समजून द्यावा तर असा. 

 

– सुहास किर्लोस्कर

(चित्रपट आणि संगीत विषयांचे अभ्यासक,

विविध विषयांवर लेखन )

suhass.kirloskar@gmail.com

इंडियन एयरफोर्स आणि इतर खासगी विमान कंपन्यांमध्ये पायलट म्हणून आपली कारकी...

व्यवसाय करण्यासाठी ‘फूड इंडस्ट्री’ मध्ये जायचं ठरवले की, सुरूवातीला ‘मेन...

चाळीशी पार केलेला एक अभियंता ‘उल्हास पेद्दावाड’ हा या कथेचा नायक आहे. उल्हा...

आपल्याला आपल्या स्वप्नांसाठी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अनंत अडचणीं...

अंबेजोगाईचा शुभम महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आला. पुण्याच्या गरवार...