अबुधाबीची आकर्षक पगाराची नोकरी, अलिशान बंगला, गाडी सोडून कोकणात सुरू केला व्यवसाय

अबुधाबीची आकर्षक पगाराची नोकरी, अलिशान बंगला, गाडी सोडून कोकणात सुरू केला व्यवसाय

 

आपल्या देशात वीजटंचाई असल्यामुळे वीजनिर्मितीचे अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले. मात्र ते कार्यान्वित होण्यासाठी कोळसा, गॅस यांची गरज असते. या गोष्टींचा तुटवडा असल्याने काही प्रकल्पांसाठी कोळसा आयातही केला जातो, पण त्यामुळे वीजेचा उत्पादन खर्च आणि पर्यायाने किंमतही वाढते. या परिस्थितीत इतर उर्जास्रोतांचा विचार करणं क्रमप्राप्त आहे. अपारंपारिक उर्जास्रोतांमध्ये सर्वाधिक पर्यावरण पूरक आणि आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली सौरउर्जा अतिशय महत्त्वाची ठरली असल्याने केंद्र आणि राज्य सरकारनं त्याबाबत आग्रह धरला आणि त्यासाठी सरकारी अनुदाने, कर्जाच्या सोयींची व्यवस्था केली. देशाच्या सध्याच्या उर्जा उत्पन्नात सौरउर्जेचं प्रमाण १०% आहे आणि उत्तरोत्तर ते वाढावं म्हणून अथक प्रयत्न सुरू आहेत. 

 

ग्रामीण भागात, दुर्गम भागात जिथे नेहमीच्या वीज केंद्रातून थेट वीज पोहोचवणे शक्य नाही, किंवा अति खर्चिक आहे. अशा ठिकाणी, त्याचबरोबर शहरी-निम-शहरी भागातही हॉस्पिटल्स, मोठी तीर्थस्थाने, मंदिरे, शाळा, मोठी गृहसंकुले, सार्वजनिक स्वच्छतागृहे अशा ठिकाणी सौरउर्जेची पॅनल्स बसवल्यामुळे त्यातून खूप मोठ्या प्रमाणात वीजेची बचत होते आहे. सौरउर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्याचं सरकारचं धोरण असल्यामुळे सौर पॅनल किंवा सौर व्यवसाय हा आजच्या काळातला सर्वांत फायदेशीर व्यवसाय झाला आहे. साहजिकच छोटे, मध्यम, मोठे असे अनेक व्यवसायिक याच्याकडे वळत आहेत. 

 

चाळीशीचा अमित मांडवकर हाही अबुधाबीची आकर्षक पगाराची नोकरी सोडून परत आला आणि त्याने स्वत:च्या गावात म्हणजे चिपळूणमध्ये ‘सनटेक सोलर’ ही त्या भागातली पहिली सौरउर्जा कंपनी २०१७ मध्ये सुरू केली. कोकण प्रांतातल्या सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी अशा मुंबईच्या तुलनेत कमी विकसित असलेल्या जिल्ह्यांना ही सेवा उपलब्ध करून द्यायची हा त्यामागचा ठळक विचार होता. या जिल्ह्यांसह नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, अंबरनाथ अशा अनेक ठिकाणी कंपनीनं आपला व्यवसाय अल्पावधीतच वाढवला आहे. 

 

चिपळूणमध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या अमितचे वडील जिल्हापरिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी होते तर आई गृहिणी. लहान भावानं एम.ए.एम.एड. करून स्वत:च्या आवडीनं वडिलांप्रमाणे शिक्षकीपेशा स्वीकारला. अमितचं शालेय शिक्षण चिपळूणातल्या नामवंत मराठी माध्यमाच्या शाळेतून झाल्यावर रायगड जिल्ह्यातल्या ‘लोणेरे’ गावातल्या आंबेडकर टेक्नॉलॉजी विद्यापीठातून २००० साली तो इलेक्ट्रिकल इंजिनिअर झाला. लगेचच लोटे एम.आय.डी.सी.तल्या ‘घरडा केमिकल्स’मध्ये नोकरी मिळवून ५ वर्ष त्याने ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ ते ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअर’पर्यंत मजल मारली. मात्र पहिल्यापासूनच देखभाल क्षेत्र असल्याने अमित पूर्णपणे ‘प्रोसेस’च्या लोकांवर अवलंबून होता. त्यांच्या गरजेनुसार काम करताना मर्यादा यायला लागल्या. कारण रासायनिक प्रक्रियांमध्ये फारसं कळत नव्हतं. दरम्यान त्याला मुंबईत ‘महानगर गॅस’मध्ये संधी मिळाली, आणि त्यानं क्षेत्र बदलायचं ठरवलं. 

 

मुंबईचं कार्यालय ‘शीव’ येथे होतं पण मुंबईची पूर्ण सेंट्रल लाईन म्हणजे १/३ क्षेत्र विद्युत देखभालीसाठी अमितकडे होतं. मार्च २००६ मध्ये इलेक्ट्रिकल एक्झिक्युटिव्ह म्हणून तिथे रुजू झाल्यावर दोनच वर्षांत ‘असिस्टंट मॅनेजर मेंटेनन्स’ म्हणून त्याला बढती मिळाली. ‘अपेक्षेपेक्षाही उत्तम काम’ असे अभिप्राय त्याला मिळायला लागले. 

 

नोकरीत स्थिरावण्याच्या त्या काळात अमितला जाणवलं की वरिष्ठ सांगतील ते करायचं आहे. त्याच्याबाहेर जाऊन आपल्या इच्छेनुसार काही करता येत नाही. आपल्याकडे ज्ञान, अनुभव आणि कष्ट करण्याची तयारी असताना व्यवसाय का करू नये? चांगल्या वातावरणासह आपण काही लोकांना रोजगार देऊ शकतो. आपल्यामुळे किमान ४ लोकांची घरं चालतील. पण कौटुंबिक पार्श्वभूमी नसल्याने सर्व प्रथम भांडवलं उभारणीसाठी परदेशात जाऊन पैसे कमावणं गरजेचं आहे. दरम्यान हिंदुस्तान पेट्रोलियमचा नवीन प्लँट भटिंडा (पंजाब)ला सुरू झाला होता. तिथे तीन वर्ष उत्तम अनुभव घेऊन २०१४ मध्ये पत्नी आणि छोट्या मुलासह अमित ‘अबुधाबी नॅशनल ऑईल कंपनी’त ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअर’ म्हणून रुजू झाला.

 

‘आपण इथे भावी व्यवसायासाठी लागणारं भांडवल उभारण्यासाठी आलो आहोत’ या विचारावर अमित इतका ठाम होता की पगार मिळाल्यावर सर्वप्रथम बचत आणि मग उरलेल्या पैशांमधून तो घर चालवत असे. पत्नी अनुजाचंही पूर्ण सहकार्य होतं. पगार होता महिना ४ लाख रुपये! अत्यंत उच्चभ्रू भागात आलिशान घर, गाडी, वैद्यकीय सुविधा, मुलाचं शिक्षण मोफत शिवाय वर्षातून एकदा मोफत भारत-वारी आणि इतरही अनेक छोट्या-मोठ्या सवलती! कमी कष्टातली अशी आकर्षक पगाराची नोकरी सोडून परत न येता अनेकजण पूर्ण करिअर म्हणजे किमान १५/२० वर्ष तिथे राहत होते. अमितच्या बाबतीत मात्र मुलगा ५ वी त गेला, की परत यायचं आणि परतल्यावर १००% व्यवसायच करायचा हे पक्कं होतं. पण कोणता व्यवसाय यावर विचार झाला नव्हता. 

 

व्यवसायाचा श्रीगणेशा

विद्युत वाहनं, सौर, विद्युत कंत्राटदार, अभियांत्रिकी सल्लागार असे ४/५ पर्याय होते. जुन्या क्षेत्रांत स्पर्धा होती, शिवाय मूल्यवर्धनाला (व्हॅल्यू ॲडीशन) फारसा वाव नव्हता. या काळात मुंबईत सौर-उर्जेवर एक तीन दिवसांचं सरकारी प्रशिक्षण घ्यायची संधी मिळाली. २०१६ मध्ये प्रशिक्षणानंतर अमितला या व्यवसायाची थोडी कल्पना आली. मग २०१७ मध्ये सौर व्यवसायाची रुपरेषा, सविस्तर तांत्रिक शिक्षण, पैशाची गणितं मांडणं वगैरेसाठी पुन्हा मुंबईत एक महिन्याचं प्रशिक्षण घेतलं आणि ‘सौर-व्यवसायाबद्दल आत्मविश्वास आल्यावर २०१७ मध्ये चिपळूणमध्ये ३०० स्क्वेअर फुटांची भाड्याची जागा घेऊन अमितनं ‘सनटेक सोलर’चं कार्यालय सुरू केलं. प्रथम वडील ऑफिसमध्ये बसायचे. पहिल्या वर्षी कंपनीचं अस्तित्व लोकांना कळावं, मार्केटमध्ये पत, नाव व्हायला हवं हा मुख्य हेतू होता. जाहिरात करण्यावर भर होता. गुंतवणूक फारशी केली नव्हती. अबुधाबीहून येऊन-जाऊन अमित छोट्या ऑर्डर्स पूर्ण करायचा. 

 

२०१८ मध्ये अमित कुटुंबासह परत आला, तेव्हा आपल्याकडे सौर-व्यवसायासाठी अनुकूल वातावरण होतं. सर्व सरकारी व्यासपीठावरून पंतप्रधान याला प्रोत्साहन देत होते. शिवाय जगभरात त्यांच्या पुढाकारानं ‘सौर युती’ (सोलर अलायन्स) तयार होत होती. त्यामुळे लोकांमध्ये सजगता आल्यानं अमितला फायदा झाला. कारण सौर उर्जा पर्यावरणपूरक असली तरी ‘माझा फायदा काय’ हेच सामान्य जनता बघत असते. लोकं कार्यालयात येऊन विचारणा करायला लागले. ‘माझा वीजेचा वापर अमुक इतका आहे मग माझा फायदा काय’? या प्रश्नाचं अमितकडून व्यवस्थित उत्तर मिळाल्यानं पहिल्या ऑर्डर्स ‘छपरावरील हिटर्स’च्याच मिळाल्या. ज्यांची बीलं जास्त अशी घरगुती रहिवाशांना सेवा द्यायला ‘सनटेक सोलर’नं सुरुवात केली. कोकण भागातली ती पहिलीच कंपनी ठरली. 

 

मुंबईत काही जण या व्यवसायात होते. मुलाच्या शाळेसाठी (सी.बी.एस.ई. अभ्यासक्रम) पनवेलला नोकरीच्याच काळात घेतलेल्या एक बेडरुमच्या सदनिकेत अमित-अनुजा आले आणि तिथून मुंबईतल्या उपनगरातल्या ऑर्डर्स अमित पूर्ण करू लागला. जेव्हा औद्योगिक-व्यावसायिक प्रकल्प मिळायला लागले तेव्हा अमितनं गुंतवणूक वाढवायला सुरूवात केली. बॅटरीवरच्या छोट्या प्रणाली, सौर वॉटर हीटर्स, सौर पंप, रस्त्यावरचे सौर दिवे यासाठी विचारणा व्हायला लागल्यावर त्या उत्पादनांची विक्री सुरू केली. त्याला खूप प्रतिसाद मिळायला लागला. घरडा केमिकल्स, कृष्णा कॉनकेम्स, इंडियन केमिकल्स, गोदरेज बिल्डर्स, अजमेरा बिल्डर्स (मुंबई) अरिहंत बिल्डर्स हे ‘सनटेक’चे काही नावाजलेले ग्राहक! आणि चिपळूणातले ३०० घरगुती ग्राहक आहेतच. 

 

छपरावरील सौरप्रणाली (रुफ टॉप सिस्टीम)ची सुरुवातच एक लाखांपासून पुढे असते. ते सगळ्यांना परवडतीलच असे नाही. त्यामुळे ऑर्डर्सची वारंवारिता कमी असते. महिन्याला ३/४ आणि पावसाळ्यात एखाद-दुसरी! त्यावेळी इतर उत्पादनं सुरू केल्यानं २०१९-२० या पहिल्या वर्षाचा ताळेबंद ८० लाखांपर्यंत पोहोचला आहे. सात कर्मचाऱ्यांसमवेत मुंबई आणि कोकण दोन्हीकडे उत्तम व्यवसायाची पायाभरणी झाल्यावर ‘सनटेक सोलर’नं ‘फँचायसी मॉडेल’ची एक महत्त्वाकांक्षी योजना आखली. त्याद्वारे गावागावात पोहोचायचं हे सनटेकचे धोरण आहे. कोरोनामुळे मंदावलेलं काम आता सुधारत आहे. 

 

‘सौर’ हा विषय तुलनेनं नवीन असल्यानं लोकांना त्याचं ज्ञान नसतं. ही प्रणाली कशी काम करणार? ग्राहकाला त्यातून कोणता आणि किती फायदा मिळणार? गुंतवणुकीवर परतावा किती या साऱ्याचं सादरीकरण करणं, ग्राहकांनी दिलेली माहिती, आकडेवारी विचारात घेऊन त्यांच्याबरोबर सभा आयोजित करणं, त्यांच्या तांत्रिक समस्या सोडवणं आणि ग्राहक निश्चित झाल्यावर ऑर्डर नक्की होईपर्यंतच काम अमित स्वत: करतो. ‘विपणन’ ही तोच बघतो. पुढचं काम त्याचे कर्मचारी, उभारणी करणारी आणि सेवा पुरवणारी टीम करते. सगळी माणसं वेतन पटावर नसतात. काही बाह्य स्रोतातून मिळवलेली (आऊटसोर्सिंग) तर काही कंत्राटी आहेत. 

 

व्यक्तीगत ग्राहकांपेक्षा गृहसंकुलांना सौर उर्जा फायदेशीर ठरते. कारण तिथल्या कॉमन लाईन्स, पंप, लिफ्ट यातल्या मीटरचा वापर शून्य युनिटपर्यंत नेण्यासाठी २० ते ५० किलोवॅट पर्यंतची मोठी प्रणाली वापरावी लागते. त्याची एका किलोवॅटची किंमत कमी येते. त्यामुळे सगळ्यांनी मिळून मोठी प्रणाली घेणं फायद्याचं ठरतं. एक किलोवॅटमध्ये १२० युनिट महिन्याला मिळतात, ते छोट्या कुटुंबासाठी पुरेसे ठरतात. 

 

सुरुवातीला अनुदान मिळत होतं, पण सध्या मात्र ही प्रणाली प्रलंबित आहे. अर्थात अनुदान फक्त घरगुती ग्राहकांसाठीच आहे. औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना, तीर्थस्थानांना अनुदान नव्हतंच. त्यामुळे त्यांच्या बाबतीत काही फरक पडत नाही. प्रश्न येतो तो घरगुती ग्राहकांच्या बाबतीत! सध्या अनुदान नसल्याने त्यांना सरकारी बँकातर्फे कर्जाची सुविधा पुरवण्यासाठी ‘सनटेक’ मदत करते. तीन वर्ष वीजेचं बील भरल्यावर कर्ज फिटतं. त्यामुळे लोकांमध्ये दिवसेंदिवस सजगता आणि वापर वाढतो आहे. केंद्र सरकारही सौर उर्जा वापरण्यासाठी उत्तेजन देतंय. त्यामुळे नोंदणीपासूनच व्यवसायाला ‘लाल फिती’च्या समस्या आल्या नाहीत एम.आय.डी.सी.पासून सगळ्या परवानग्या ‘ऑनलाईन’ मिळाल्या.

 

मात्र हे क्षेत्र नवीन असल्याने तयार मनुष्यबळ न मिळणं ही समस्या होती. कर्मचाऱ्यांना निवडून प्रशिक्षण देण्याकरता वेळ द्यावा लागला. ‘स्पर्धा’ ही अमितनं समस्या मानली नाही. ती सगळीकडेच असते. आपण सेवा कशी देतो, नेटवर्क कसं तयार करतो, ग्राहक कसे वाढवतो हे आपल्यावर अवलंबून असतं असं त्याला वाटतं. लोकं प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करत असतात. बोलत नाहीत, पण ‘ही लोकं’ चांगलं काम करताहेत याची नोंद ठेवतात आणि ‘मी वीजेचं बील भरून कंटाळलोय’ असं म्हणणाऱ्याला ‘सनटेक’कडे यायला सांगतात. त्यामुळे आता जाहिरात करावी लागत नाही. संदर्भ मिळत जातात आणि त्यात स्पर्धा नसते. 

 

कंपनी वाढवण्यासाठी लोक एखादा मोठा क्लाएंट गाठतात, त्याचं नाव प्रसिद्धीसाठी वापरतात. तशा रीतीनं व्यवसाय वाढवण्याचं अमितचं उद्दिष्टच नाही. घराघरात सौरउर्जेचं किमान एकतरी छोटं उत्पादन पोहोचायला हवं! अगदी प्रत्येक माणसापर्यंत ते पोहोचत नाही, तोवर व्यवसायाचा उद्देश सफल झाला असं तो मानत नाही. कारण स्वत:च्या भागातल्या जास्तीत जास्त लोकांनी सौर उर्जा वापरावी यासाठीच त्यानं हा व्यवसाय निवडला. फक्त पैसे कमावण्यासाठी नव्हे. 

 

सौर उर्जेमध्ये इतरही काही व्यवसाय ‘सनटेक’ करते आहे. पहिला व्यवसाय म्हणजे सौर-सल्लागार! ‘अमुक वीज बील’ कमी करण्यासाठी कोणतं उत्पादन योग्य आहे. याचबरोबर ‘सौरप्रणाली घेऊनही वीजबील कमी होत नाही तर ‘बॅकअप’ नेमका कोणत्या उत्पादनामुळे मिळेल? अशा उत्पादनांबाबत तटस्थ पद्धतीनं सल्ला देणारी व्यक्ति लोकांना, विशेषत: शहरी ग्राहकांना हवी असते. (कंपनी म्हणून किंवा विक्रेता म्हणून नव्हे) अमुक उत्पादन महाग आहे, परतावा चांगला मिळणार नाही, गुंतवणूक फुकट जाईल. त्याऐवजी छोटं उत्पादन घेतलं तर काम होऊन जाईल असा प्रामाणिक सल्ला मिळाला तर ग्राहक खुश असतात.

 

त्यामुळे सौर पॅनलच्या उभारण्या, सेवा या व्यतिरिक्त अशी कन्सल्टंसी करायला वाव आहे. तसंच ‘मार्केटिंग’ किंवा ‘मटेरिअल ट्रेडिंग’ ही करता येतं. म्हणजे एखाद्या कंपनीचा वितरक म्हणून या व्यवसायातल्या मुंबई-पुण्यातल्या उद्योजकांना मटेरिअल विकता येतं. याबरोबर अमित सरकारी परवानाधारक विद्युत कंत्राटदारही आहे. स्वत:ची टीम वापरून तो अधूनमधून काही इमारतीचं काम कंत्राटी पद्धतीनं करून देतो. 

 

मुद्रा योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना, ‘स्टार्ट अप इंडिया’, स्टँडअप इंडिया या अनेकविध माध्यमांतून अगदी शैक्षणिक पात्रता नसणाऱ्यांनाही खूप चांगली कर्जाऊ रक्कम मिळते, ज्यातून ते व्यवसाय सुरू करू शकतात आणि त्यांना एक ‘बिझनेसमन’चं वलय मिळतं जे आधी मिळत नव्हतं. पूर्वी व्यवसाय करणाऱ्याला कोणी मुलगी देत नव्हतं, पण आता लोकांची मानसिकता बदलायला लागलीय याचं श्रेय अमित सरकारी धोरणांना देतो. 

 

सौर व्यवसायाला मोठी चालना देणारा आणखीन एक भावी व्यवसाय म्हणजे सौर वीजेवर चालणारी वाहनं (ईव्ही) ‘सनटेक’च्या भावी योजनांमध्ये त्याचा समावेश आहेच. टेस्ला आणि इतर ईव्ही कंपन्या ‘बॅटरी’ या विषयावर जगभर संशोधन करताहेत. पुढील काही वर्षांत जेव्हा त्याची किंमत कमी होईल तेव्हा वाहन क्षेत्रात तर फार मोठी क्रांती होईलच, पण सामान्यांनाही लाभ होईल. एखाद्या घराला सरकारी वीज घ्यावी लागणार नाही. ते पूर्णपणे सौर उर्जेवर चालेल. त्याची बॅटरीही सौर उर्जेवर चार्ज होईल त्यात उर्जेचा साठा होऊन घरची सगळी उपकरणं त्या बॅटरीवर चालतील. योग्य आकाराची बॅटरी आपल्याला परवडेल अशा किंमतीत मिळेल. सौर व्यवसायाचा आवाका किती मोठा आहे, याचा अंदाज यावरून करता येतो. 

 

अमितच्या मते व्यवसायात पडताना आपलं ध्येय किंवा उद्दिष्ट काय आहे याचा सर्वप्रथम विचार व्हावा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्यांना वीजेबाबत आत्मनिर्भर बनवणं हे ‘सनटेक’चं उद्दिष्ट आहे. ग्राहक-वर्ग जसजसा वाढतो, तसतसा नफा हळूहळू वाढतोच. पहिल्याच वर्षी करोडोंचा फायदा असं हे क्षेत्र नाही. ते हळूहळू वाढतंय. पुढच्या ५/१० वर्षांत त्याची निश्चितच भरभराट होईल. त्यामुळे परदेशातल्या पगाराइतकी रक्कम लगेच मिळणार नाही, हे गृहितच धरायला हवं. शून्यापासून सुरू केलेला व्यवसाय हळूहळूच वाढतो. 

 

‘मातृभूमी’ला परत येण्याचा निर्णय योग्य वाटला का यावर अमित म्हणाला, “मी परत येऊन चूक केली असं कधीच वाटलं नाही आणि वाटणारही नाही. आपण खूप लोकांपर्यंत पोचणार आहोत याची मला शंभर टक्के खात्री आहे. उत्तम कारकीर्द, समाधानकारक आर्थिक सुबत्ता आणि आपल्या लोकांना फायदेशीर रोजगार देऊन देशासाठी योगदान देणं यासाठी माझ्या क्षेत्रातल्या लोकांनी जरुर परत यावं. मात्र त्यासाठी ज्या क्षेत्रात व्यवसाय सुरू करायचाच त्याचा अनुभव, ज्ञान, आर्थिक स्थैर्य, बँक बॅलन्स आणि कुटुंबाची साथ ही पंचसूत्री तसंच चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी हवी.” 

 

“ज्याअर्थी तुम्ही परदेशात जाता, त्याअर्थी अनुभव, ज्ञान आणि बुद्धीमत्ता तुमच्याकडे असतेच. म्हणून तर तिथे जायची संधी मिळते. तिथे जाऊन या सगळ्याचा स्तर अजूनच उंचावतो. याचा उपयोग आपल्या देशाला, आणि आपल्या लोकांना व्हायलाच हवा. सरकारला आणि समाजाला तुम्ही नक्कीच काहीतरी देऊ शकता. मात्र तशी मानसिकता हवी.”

 

राज्य सरकारनं आता बंद झालेलं अनुदान पुन्हा सुरू करायला हवं, ही अमितची अपेक्षा आहे. कारण त्यामुळे सौरउर्जेचा प्रचार होऊन त्याचा वापर वाढेल आणि शेतकऱ्यांना किंवा आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना मोफत वीज देणं अधिक सुलभ होईल. त्यामुळे पर्यावरणही सुधारेल यात शंका नाही. 

 

अमित परत आला तरी त्याचा अबुधाबीच्या सहकाऱ्यांशी, मित्रांशी उत्तम संपर्क आहे. त्यांची वेळोवेळी मदत, मार्गदर्शन असतं, वेळेला ते पाठीशी उभे राहतात, आत्मविश्वास देतात आणि प्रोत्साहितही करतात. आकाशात उंच भरारी घेऊन एखाद्या पक्ष्यानं आपल्या घरट्यात परतावं आणि तिथल्या ज्ञानाच्या साठ्यातून मिळालेला ठेवा जन्मगावच्या घराघरात पोचवावा, त्यातून स्वत:चं आणि सगळ्यांचं हित साधावं याहून अधिक चांगली महत्त्वाकांक्षा कोणती असू शकते? 

 

 

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते हे जितकं खरं, तितकंच तिचा त्यागही असतो! विज्ञान शाखा आणि औषध निर्माणशास्त्राची द्विपदवीधर असलेल्या अमितची पत्नी अनुजानं स्वत:ची नोकरी तर सोडलीच, पण त्याच्याबरोबर अबुधाबीहून परत येताना एक आरामदायी, ऐश्वर्यसंपन्न आयुष्यही मागे टाकलं. अबुधाबीच्या प्रशस्त बंगल्यातून पनवेलच्या जुन्या एक बेडरुमच्या सदनिकेत ते तिघे आले तेव्हा ‘चार पावलातच घर संपत होतं’ अशी प्रतिक्रिया अमितनंच हसत हसत दिली. पण अनुजाचा सूर मात्र तक्रारीचा नव्हता. पुन्हा नोकरी न करता संसाराची जबाबदारी उलचण्याच्या तिच्या निर्णयानं अमितला व्यवसायाची पायाभरणी करता आली याचा तो आवर्जून उल्लेख करतो. तिथली वातानुकुलित, डिजिटल शाळा सोडल्यावर तन्मयलाही सुरुवातीला जड गेलं. आई-वडील, भाऊ-वहिनी, पुतण्याबरोबर सध्या चिपळूणमध्ये एकत्र कुटुंबात राहिल्यानं मिळालेलं पाठबळ अबुधाबीत मिळालं नसतं, त्यामुळे व्यवसाय स्वदेशातच करावा हे अमितचं ठाम मत आहे. 

 

– ज्योत्स्ना नाईक

(एच.बी.जे स्मार्ट लीगसी या कंपनीच्या संचालक असून
पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव, विविध विषयांवर लेखन)
jyotsna.s.naik@gmail.com

एकाच शेतजमिनीवर वेगवेगळे थर लावून अनेक मजल्यांवर शेती करण्याला हायड्रोपो...

नोकरी करतानाच आजूबाजूच्या कंपन्यांचा अभ्यास केला आणि मालाची विक्रीही  एक...

आय.टी. इंडस्ट्रीमध्ये चित्रपटसृष्टीप्रमाणे अनेकांना हिरो व्हायचे असते, ग्...

विजय माने या चाळीशीतल्या तरुणानं 2017 साली आपल्या दोन सहकार्‍यांसमवेत मुंबईत...

‘छत्रपती शिवाजी महाराज’ हा महाराष्ट्रातील सर्वांच्याच अभिमानाचा विषय आहे...