अमेरिकेत उच्च शिक्षण, सिंगापूरच्या बँकेतली नोकरी, सगळं सोडून चाकणमध्ये सुरू केलं व्हर्टिकल फार्मिंग

अमेरिकेत उच्च शिक्षण, सिंगापूरच्या बँकेतली नोकरी, सगळं सोडून चाकणमध्ये सुरू केलं व्हर्टिकल फार्मिंग

 

विवेक वसंतराव जाधव यांचे मूळ गाव चाकण असले तरी ते स्वतः मुंबईकरच. फायनान्समधील उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. त्यांना लोकसंग्रहाची आवड. अमेरिकेतही त्यांनी खूप मित्र जोडले. त्या मैत्रीतूनच त्यांना चांगल्या कंपनीत इंटर्नशिप मिळाली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेच एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. अजून एक अभ्यासक्रम पूर्ण करावासा वाटला म्हणून नोकरी सोडून पुन्हा विद्यापीठात दाखल झाले. ते शिक्षण पूर्ण होत असतानाच अमेरिकेतील एका मोठ्या फायनान्स कंपनीत मोठ्या पदावर नोकरी मिळाली. एवढ्या कमी वयात त्या पदापर्यंत पोहोचल्यानंतर अमेरिका व नोकरी सोडणे हा विचारही मनात येणे शक्य नव्हते. 

 

पण 2008 नंतर परिस्थिती बदलली. अमेरिकेतील बॅंकिंग व फायनान्स कंपन्यांची स्थिती बिघडली. त्यामुळे अमेरिका सोडून विवेक जाधव यांनी सिंगापूर गाठले. एका आंतरराष्ट्रीय बँकेत आशिया विभागाचे प्रमुख म्हणून ते काम पाहू लागले. मात्र अमेरिकेतील आर्थिक घडामोडीत सक्रिय सहभाग असणाऱ्या विवेक यांचे सिंगापूरमधील संथ आर्थिक व्यवहारात मन रमत नव्हते. पण अन्य काही पर्यायही दिसत नव्हता. ते नोकरीतील अशा एका पायरीवर लहान वयातच पोहोचले होते की, तेथून अन्य पर्याय कमी होत जातात. 

 

बॅंकेतील कामाचा भाग ते स्वतःचा व्यवसाय

सिंगापूरच्या बँकेतील कामाचा एक भाग म्हणून त्यांचा व्हर्टिकल फार्मिंगशी संबंध आला. चाकणमध्ये वडिलोपार्जित शेती होती. वडील कृषीपदवीधर. पण विवेक यांचा तोवर कधीही शेतीशी संबंध आला नव्हता. मात्र एरवी भारतात आडव्या जमिनीवर पसरलेली शेती पाहण्याची सवय असलेल्या त्यांच्या डोळ्यांना ही शेतीची उभी भिंत नवी उभारी देऊ लागली. एक वेगळे आकर्षण या शेतीने निर्माण केले. कदाचित शेतकऱी घराण्याची मूळं खुणावू लागली असतील, पण त्यांनी उभ्या शेतीचा प्रयोग करायचा निर्णय घेतला. 

 

अमेरिकेत काय किंवा सिंगापूरमध्ये काय, एक प्रकारे ‘अनिश्चितता’च (अनसर्टिनिटी) भरून असलेल्या या जगात ‘निश्चितता’ (सर्टिनिटी) विकूनच त्यांचा बँकिंग व्यवसाय सुरू होता. त्यामुळे शेतीतील अनिश्चिततेतून निश्चितता शोधण्याची भुरळ त्यांना पडली. शेतीत अनिश्चितता खूप. पर्यावरणातील बदल तुमच्या हातात नसतात, त्यामुळे एका अर्थी तुम्ही पूर्णतः निसर्गावर अवलंबून असता, त्यातून अनिश्चितता वाढते. बाजारातील मागणी, भाव हेही त्या त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असल्याने जमा-खर्चाचा मेळ बसवणे कित्येकदा शेतकऱ्यांना शक्य होत नाही. आपल्याकडच्या शेतकऱ्यांचे दुखणे विवेक यांना माहीत होते.

 

त्यामुळे या शेतीत उतरण्याआधी त्यांनी अभ्यास सुरू केला. व्यवस्थापनाचे प्रशिक्षण व अनुभव येथे कामी आला. सिंगापूरमध्ये शेती करायची तर त्यात कोणत्या प्रकारची अनिश्चितता आहे, याचा अंदाज आधी काढला. भाजी पिकवणे अधिक योग्य ठरणारे होते. त्यासाठी कमी जागा असली तरी चालणार होती. दर आठवड्याला या शेतीत किती भाजी तयार होते, कोणत्या भाजीला अधिक मागणी आहे, भाज्यांचे सरासरी दर काय, त्याचे ग्राहक कोण, जागेचे भाडे किती द्यावे लागेल, मदतनीसांचे शुल्क किती असेल अशा अनेक गोष्टींचा तपशीलवार अभ्यास केला आणि 2017मध्ये पंधराशे चौरस फूट क्षेत्रात शेती सुरू केली. 

 

‘eयशस्वी उद्योजक’ 20 मित्रांसोबत SHARE करा आणि मिळवा एक खास आकर्षक भेट!

 

कुटुंबाचा पाठिंबा महत्त्वाचा

विवेक यांच्या पत्नी तेजल या कामात मदत करणार होत्या. तेजल याही मुंबईकरच. शेतीशी कधीही संबंध नसलेल्या. त्या व्यवसायाने समुपदेशक. मुलीच्या जन्मानंतर तिच्या संगोपनासाठी त्यांनी समुपदेशनचा व्यवसाय थांबवला होता. तो पुन्हा सुरू करण्याऐवजी तेजल यांनी या शेतीसाठी मदत करण्याचा निर्णय घेतला. व्हर्टिकल फार्मिंगमध्ये तज्ज्ञ असलेल्या एका मित्रानेही मदत करण्याचे आश्वासन दिले आणि शेतीची उभी भिंत उभारली गेली. मजबूत स्टॅंड, त्यावरची बास्केट, नियंत्रित तापमान, नियंत्रित पाणी यामुळे उभ्या भिंतीवरची भाजी जोमाने तयार होत गेली. तज्ज्ञ मित्राच्या मदतीने त्रुटी वेळच्या वेळी दूर केल्या.

 

विवेक म्हणाले, “मी दर आठवड्याला किती व कोणती भाजी विकू शकणार आहे, याचा आधीच अभ्यास केला आणि रेस्टॉरंट व ग्रोसरी शॉप्सना भेटलो. त्यांच्यादृष्टीने नियमिततेला महत्त्व होते. ते तुमच्यावर अवलंबून राहतात, त्यामुळे त्यांना निश्चिंत करण्यात तुमचे यश सामावलेले आहे, हे मी जाणले होते. माझ्या आतापर्यंतच्या व्यावसायिक अनुभवामुळे मी मनाला बजावले, ‘मी भाजी विकत नाही, तर निश्चितता (सर्टिनिटी) विकतो आहे.’ ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी ठरलेली भाजी ग्राहकांना पुरवण्याचे नियोजन केले आणि ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण केला.”

 

कोव्हिडकाळातही काम सुरूच

कोव्हिडमुळे जग बंद होत असतानाही माझे काम सुरूच होते. बंदिस्त जागेत ही शेती असल्याने काम करायला पूर्ण परवानगी होती. त्यामुळे बंद काळातही वेळच्या वेळी ग्राहकांपर्यंत भाजी पोहोचवली जात होती. ग्राहकांचा माझ्याबद्दलचा विश्वास वाढला, माझाही आत्मविश्वास वाढला, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्या बंद काळातील आमच्या धड़पडीला सिंगापूर सरकारचा पाठिंबा मिळाला. सरकारने आमच्यावर विश्वास टाकला आणि मोठ्या जागेत शेती केली जावी यासाठी सरकारकडून सुचवले गेले. मागणी वाढत होतीच. त्यामुळेही मोठ्या जागेत जायची व्यावसायिक सक्तीही होत होती. 

 

खरे तर कोरोना काळातच, 2020मध्ये आम्ही एक चांगली टीम बनवली आहे. त्या टीमवर विश्वास आहेच. पण पंधराशे चौरस फुटातील शेती करताना टीमवर पूर्ण विसंबून राहणे शक्य होते. टीममधील सगळेच व्यावसायिक बांधिलकी मानणारे आहेत. पण व्हर्टिकल फार्मिंग हे काही त्यांचे स्वप्न नाही, ते माझे स्वप्न आहे. माझे स्वप्न दुसरा कुणी प्रत्यक्षात आणणार नाही, त्यासाठी तुम्हालाच कष्ट घ्यावे लागतात, हे लक्षात आले. माझ्यापुढे एकच पर्याय होता – फार्म बंद करायचा किंवा बँक सोडायची. 

 

डिसेंबर 2020मध्ये निर्णय घेतला की बँक सोडायची. फार्म हे स्वप्न आहे, ते सोडायचे नाही. माझा हा निर्णय कुटुंबासाठी, मित्रांसाठी, सुहृदांसाठी धक्का देणारा होता. स्वाभाविक होते. एकीकडे जगभर लोकांच्या नोकऱ्या सुटत होत्या आणि मी सुस्थितीतील नोकरी सोडणार होतो. सिंगापूरमधील माझ्या नोकरीच्या कामात मला अमेरिकेसारखे समाधान मिळत नव्हते हे खरे, पण दरमहा भलीमोठी रक्कम वेतनापोटी बँक खात्यात जमा होत होती, ती थांबणार होती. संसार, मुलीचे शिक्षण हे प्रश्न इतरांसाठी होते. मला विश्वास होता. आतापर्यंत इतरांना अनिश्चिततेविषयी सांगत निश्चितता विकत होतो, पण तीच वेळ आपल्यावर आल्यावर आपण अधिक सांगोपांग विचार करू लागतो, हे लक्षात आले. तेजलने विश्वास दिला आणि अखेर मे 2021ला पूर्णवेळ शेतकरी होण्यासाठी बँकेतून बाहेर पडलो. मी पूर्णवेळ व्यवसायात येतो म्हटल्यावर गुंतवणूकदार सोबत आले. पंधराशे चौरस फूट जागेत सुरू केलेला फार्म आता सोळा हजार चौरस फूट क्षेत्रात उभा आहे.”

 

 

– संतोष शेणई

मुक्त पत्रकार, पत्रकारितेत अनेक
वर्षांचा अनुभव, विविध विषयांवर लेखन

santshenai@gmail.com

एकाच शेतजमिनीवर वेगवेगळे थर लावून अनेक मजल्यांवर शेती करण्याला हायड्रोपो...

नोकरी करतानाच आजूबाजूच्या कंपन्यांचा अभ्यास केला आणि मालाची विक्रीही  एक...

आय.टी. इंडस्ट्रीमध्ये चित्रपटसृष्टीप्रमाणे अनेकांना हिरो व्हायचे असते, ग्...

विजय माने या चाळीशीतल्या तरुणानं 2017 साली आपल्या दोन सहकार्‍यांसमवेत मुंबईत...

‘छत्रपती शिवाजी महाराज’ हा महाराष्ट्रातील सर्वांच्याच अभिमानाचा विषय आहे...