एका जिगरबाज माणसाची कहाणी: ‘प्रदीप लोखंडे पुणे १३’

एका जिगरबाज माणसाची कहाणी: ‘प्रदीप लोखंडे पुणे १३’

 

उद्योग, व्यवसाय हा कोणत्याही उत्पादनाचा अथवा सेवेचा असला तरी मार्केटिंग हा त्यातला अपरिहार्य घटक आहे. आपलं उत्पादन / सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी मार्केटिंगसारखं दुसरं साधन नाही. मार्केटिंग म्हणजे अवाढव्य खर्चाच्या जाहिराती, उच्चशिक्षित, सूटबूट घालून, टाय लावून फिरणारे, इंग्रजी भाषेत बोलणारे मार्केटिंग एक्झिक्युटिव्हज असं चित्र डोळ्यासमोर येतं. पण या चित्राला पूर्णपणे छेद देणारी मार्केटिंगची एक अभिनव पद्धत वाईसारख्या छोट्या गावातून आलेल्या एका माणसाने विकसित केली . देशभरातली हजारो, लाखो माणसं जोडणारी ही पद्धत काय आहे ? आणि कोण आहे तिचा निर्माता ? त्यानं हे सगळं कसं घडवलं ? हे जाणून घेण्यासाठी ‘प्रदीप लोखंडे पुणे १३’ हे पुस्तक वाचायलाच हवं.  

 

जॉन्सन अँड जॉन्सन, प्रॉक्टर अँड गँबल, टाटा टी, हिंदुस्तान लिव्हर, लार्सन अँड टुब्रो अशा अनेक बलाढ्य कंपन्यांसाठी मार्केटिंगच्या नवनवीन संकल्पना यशस्वीपणे राबवणारे प्रदीप लोखंडे यांचा प्रवास उद्योजकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. पाटबंधारे खात्यात ड्राफ्ट्समन म्हणून नोकरी करणारे त्यांचे वडील आणि घरकाम करणारी आई. घरात प्रदीप सोडून आणखी तीन भावंडं आणि आजीआजोबा. वडिलांच्या अपुऱ्या पगारात, ओढाताणीत प्रदीप यांचं बालपण गेलं. त्यातच अजाणत्या वयात कोयनेच्या भूकंपाचा तडाखा त्यांना अनुभवावा लागला. नशिबाने कुटुंबातील सर्व सदस्य जिवंत राहिले. त्यानंतर पुन्हा एकदा हे कुटुंब वाईला परत आलं.    

 

नववीत असताना गावात नाटक आणलं 

नवव्या इयत्तेत शिकणाऱ्या प्रदीपला सुप्रसिद्ध अभिनेते निळू फुले यांच्याबद्दल अतिशय कौतुक आणि आदर वाटत असे. हा माणूस आपल्या गावाला आला पाहिजे असंही त्यांना मनापासून वाटे. त्यावेळी निळूभाऊंचं ‘राजकारण गेलं चुलीत’ हे नाटक गाजत होतं. प्रदीपनं वर्तमानपत्रात त्या नाटकाची जाहिरात बघितली. त्या जाहिरातीत खाली प्रयोगासाठी संपर्क म्हणून एक दूरध्वनी क्रमांक दिलेला होता. आपल्या गावात हे नाटक आणलं तर आपली इच्छा पूर्ण होईल असं प्रदीपला वाटलं. त्यावेळी मोबाईल आलेले नव्हते. वडिलांकडून पैसे घेऊन पब्लिक बूथवरुन दिलेल्या नंबरवर प्रदीपने फोन केला. पुण्यात येऊन भेटा असं पलीकडच्या माणसानं त्याला सांगितलं. वडिलांची कशीबशी परवानगी मिळवून प्रदीप पुण्याला गेला. त्याला बघून ‘कोणा मोठ्या माणसाला घेऊन ये’ असं त्या माणसानं सांगितलं. ‘मलाच नाटकाचा प्रयोग हवा आहे, माझ्याशीच बोला’ असं धीट उत्तर प्रदीपनं त्यावर दिलं. त्या माणसानं त्यावर मानधन, प्रवासखर्च, जेवणाची व्यवस्था वगैरेंचे पैसे सांगितले. त्यात चारशे रुपये ॲडव्हान्स होता तर अकराशे रुपये नाटक सुरु होताना द्यायचे होते. चारशे रुपयांची सोय प्रदीपच्या मित्राच्या वडिलांनी केली. बाकी पैसे तिकीटविक्रीतून गोळा करायचे होते. वाईला परत येऊन दुसऱ्या दिवशीपासून मित्राच्या मदतीने प्रदीपने तिकीटविक्री सुरु केली आणि प्रयोगाच्या दिवसापर्यंत थोडीथोडकी नाही तर तब्बल २४०० रुपयांची कमाई केली! प्रयोगाचे उरलेले ११०० रुपये, मित्राच्या वडिलांचे ४००, जेवण-चहापान यासाठी कँटीनवाल्याचे, इतर खर्चाचे असे सगळे पैसे ठरल्याप्रमाणे देऊनही प्रदीपला सहाशे रुपयांचा फायदाच झालेला होता. प्रदीपमधे असलेले उद्योजकतेचे गुण दिसायला सुरुवात झाली होती. 

 

या अनुभवाने अशा प्रकारच्या आणखी संधी प्रदीपला दिसायला लागल्या. त्याच वर्षी त्याने चार चित्रपट गावात कंत्राटावर आणले आणि त्यातून दीड हजारांचा फायदा मिळवला. पण आता मात्र वडिलांनी सक्त ताकीद दिली, आता हे धंदे बंद, शिक्षणावर लक्ष केंद्रित करा. घरात फारशी सुबत्ता नसतानाही प्रदीप यांच्या वडिलांना या पैशांचा मोह झाला नाही हे विशेष. 

 

 नोकरीत फसवणूक झाल्याच्या भावनेमुळे व्यवसायाचा निर्णय 

पण प्रदीपला अभ्यासाची फारशी आवड नव्हतीच मुळी. जेमतेम ३६% गुण मिळवून तो मॅट्रिकची परिक्षा उत्तीर्ण झाला. नंतर काही दिवस वाईला आणि मग पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये एक्स्टर्नल प्रवेश घेऊन बी.कॉम. पूर्ण केलं. एका मित्राच्या हँडमेड पेपरच्या दुकानात काम करत तिथेच रहाण्याची सोय करुन घेतली. या सगळ्या काळात आपलं उद्दिष्ट साधण्यासाठी आपल्याकडे चांगली संवादकला आहे हे प्रदीप यांच्या लक्षात येत होतं. मग मार्केटिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घ्यावं असं मित्रानं सुचवलं. बऱ्याच खटपटींनंतर त्यासाठी ॲडमिशन मिळाली आणि विशेष म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण होत असताना कँपस इंटरव्ह्यूमध्ये जॉन्सन अँड जॉन्सन या प्रख्यात कंपनीमध्ये नोकरीसाठी निवडही झाली. तिथे उत्तम कामगिरी बजावूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काहीशी फसवणूक झाल्याची भावना एका प्रसंगामुळे प्रदीप यांच्या मनात निर्माण झाली आणि त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. आता यापुढे स्वत:चाच व्यवसाय करायचा हे त्यांनी मनाशी पक्कं केलं होतं.

 

नामवंत प्रॉडक्ट्सच्या सेल्स प्रमोशनमुळे नाव सर्वदूर पसरलं.  

दोन मित्रांच्या समवेत मौर्य डिस्ट्रीब्युटर्स या नावाने विविध वस्तूंच्या विक्रीचा अनुभव प्रदीप यांनी घेतला. त्यात गॅसच्या शेगड्या, माँजिनीज केक, पार्लेचं फ्रुटी, क्रॉम्प्टन, बजाज यासारख्या बड्या कंपन्यांची उत्पादनं असं सारं काही होतं. या साऱ्या नामवंत प्रॉडक्ट्सच्या सेल्स प्रमोशनच्या कामामुळे प्रदीप यांचं नाव सर्वदूर पसरलं. पुण्याबरोबरच अमरावती, नागपूर, जळगाव, कोल्हापूर अशा अनेक शहरांमध्ये प्रदीप या कामाच्या निमित्ताने फिरले. पुण्याबाहेरच्या शहरांमध्ये काम करताना तिथल्या युवकांना प्रदीप यांनी सहभागी करुन घेतलं. त्याचा खूप फायदा झाला. अनेक नामवंत कंपन्यांच्या थेट संपर्कात रहाता आलं. मनुष्यबळाचा वापर कसा करायचा याचं नकळत प्रशिक्षण मिळालं. चांगल्या प्रमाणात पैसा मिळाला. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे या अनुभवाने एका अनोख्या नव्या व्यवसायाची दिशा प्रदीप यांना दिली. 

 

गुरचरण दास यांच्या भाषणामुळे रूरल मार्केटिंगकडे लक्ष केंद्रीत 

याच दरम्यान मार्केटिंग क्षेत्रातले एक नामवंत गुरचरण दास यांचं एक भाषण ऐकण्याची संधी प्रदीप यांना मिळाली. मंत्रमुग्ध करणाऱ्या त्या भाषणामध्ये गुरचरण यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला होता. प्रदीप यांच्या मनातल्या विचारांना पुष्टी देणारा तो ठरला. उद्याचा भारत, उद्याचं मार्केट हे ग्रामीण भारतात असणार आहे. माणसं जरी खेडी सोडून जात असली तरी मार्केटिंग ग्रोथचा उद्याचा चेहरा ग्रामीण भारत हाच असणार आहे. आपला हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी गुरचरण यांनी खूपच रंजक उदाहरणं सांगितली. त्या भाषणाने प्रभावित झालेल्या प्रदीप यांच्या मनात आता हा विचार पक्का रुजला होता. ग्रामीण भारताचा विचार करतच प्रदीप घरी परतले. घरातल्या लोकांशी चर्चा केली आणि चालू व्यवसायाला रामराम करण्याचा निर्णय झाला.

 

ग्रामीण भारतावर लक्ष केंद्रित करायचं हे आता निश्‍चित झालं होतं. आतापर्यंतच्या अनुभवातून कंपन्यांना मार्केटिंगसाठी गावांची नेमकी कोणती माहिती लागते हेही लक्षात आलं होतं. खेड्यातल्या ग्राहकांपर्यंत अनेक कंपन्या पोचू शकत नाहीत ही वस्तूस्थिती समजली होती. मग आता कंपन्यांना ग्रामीण भागापर्यंत पोचवायचं काम आपण करायचं हे प्रदीप यांनी ठरवलं. त्यासाठी ग्रामीण भागाची अचूक माहिती गोळा करायची होती. हे काम सोपं नव्हतं. नुसता महाराष्ट्र म्हटलं तरी त्यात कित्येक हजार खेडी आहेत. त्यांची सगळी तपशीलवार माहिती घेण्याचं काम एकट्यादुकट्या माणसासाठी खूपच अवघड आहे. 

 

पण हे शिवधनुष्य पेलायचं आता निश्‍चित केलेलं होतं. या कामात प्रदीप यांच्या पत्नी सीमंतिनी आणि वडील यांनी खूपच मदत केली. या सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याची खानेसुमारीची नोंद असलेली पुस्तकं आणली. त्यातून दहा हजारांहून कमी लोकसंख्या असलेल्या गावांची यादी केली. जवळपास सहा ते सात हजार गावं या यादीत निघाली. हेच काम कितीतरी दिवस चाललं. पण प्रदीप यांच्या डोक्यात आता शिस्तबद्ध योजना निश्‍चित झालेली होती. घाईगडबडीत कोणतंही काम करायचं नाही हे ठरलेलं होतं. 

 

पाचशे गावांमधल्या बाजारांची इत्थंभूत माहिती मिळवली 

प्रत्येक गावातल्या पोस्ट मास्तर, मुख्याध्यापक, सरपंच अशा मुख्य माणसांच्या नावे पत्रं टाकून माहिती मिळवायची हा योजनेचा पहिला टप्पा होता. वीस हजारांच्या वर अशी पत्रं पाठवायचं काम या तिघांनी केलं. त्याला मिळालेला प्रतिसाद खरं तर खूपच निराशाजनक होता. केवळ ३०० पत्रांना उत्तरं आली. पण त्यामुळे खचून न जाता पुन्हा एकदा हा पत्रांचा उद्योग केला. त्यात येणाऱ्या दिवाळीसाठी शुभेच्छादेखील दिल्या होत्या. आता आलेल्या उत्तरांची संख्या बऱ्यापैकी वाढली होती. लोकांना आता प्रदीप लोखंडे हे नाव माहीत व्हायला सुरुवात झाली होती. आलेल्या पत्रांमधून ज्या गावांचा आठवडी बाजाराचा दिवस कळला होता अशा गावांना भेटी देऊन जास्तीची माहिती घेण्याचं प्रदीप यांनी ठरवलं. वीस महिन्यांच्या कालावधीत प्रदीप यांनी पाचशे गावं पालथी घातली. तिथल्या अनेक गोष्टींच्या तपशीलवार नोंदी केल्या. पाचशे बाजारांची इत्थंभूत माहिती आता त्यांच्याकडे तयार होती. राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या गाव कसं चालतं याचा सगळा तपशील त्यात होता. असंख्य निष्कर्ष त्यातून नोंदवले गेले. काही ठिकाणी पुन्हा पत्रं पाठवून आणखी सखोल माहिती मागवली. हे सगळं खूप वेळखाऊ तर होतंच पण कष्ट आणि पैसाही त्यात बराच ओतावा लागला. शिवाय आजूबाजूच्या लोकांनी नावं ठेवण्याचा उद्योग सुरु केला होता तो वेगळाच. पण या सगळ्यावर मात करत अविरतपणे प्रदीप यांनी नेटानं आपलं काम पूर्ण केलं. 

 

८० कंपन्यांना पत्रं पाठवल्यावर एकट्या टाटा टी कंपनीकडून उत्तर मिळालं

आता आपल्याकडे असलेला हा डेटा कंपन्यांना कसा फायदेशीर ठरणारा आहे हे पटवून देणं आवश्‍यक होतं. आधीच्या अनुभवातून अनेक कंपन्यांमध्ये ओळखी झाल्या होत्या. त्या सगळ्यांशी प्रदीप यांनी पत्रव्यवहार सुरु केला. जवळपास ८० कंपन्यांना पत्रं पाठवल्यानंतर बऱ्याच दिवसांनी टाटा टी कंपनीकडून त्यांना उत्तर आलं आणि भेटीसाठी बोलावलं. अनेक प्रश्‍नोत्तरांची चर्चा झाल्यावर प्रदीप यांना अखेरीस टाटा टी कंपनीकडून रुरल डेटाची मागणी आली. पण नुसता डेटा घेऊन पुढे काय करायचं हे त्यांच्या लक्षात येईना. मग पुन्हा प्रदीप यांच्याशी चर्चा झाली आणि प्रदीप यांनाच ते रुरल मार्केटिंगचं पहिलं काम मिळालं. ते कसं करायचं, त्यासाठी किती माणसं घ्यायची, त्यांना ट्रेनिंग कसं द्यायचं वगैरे अनेक गोष्टींचा अत्यंत बारकाईने विचार करुन प्रदीप यांनी ते यशस्वी करुन दाखवलं. या कामाचा मार्केटमध्ये बराच बोलबाला झाला.

 

आता एकेक करत आणखीही कंपन्या प्रदीप यांच्या कामाशी जोडल्या जाऊ लागल्या. वर सांगितल्याप्रमाणे अनेक बलाढ्य कंपन्यांसाठी प्रदीप यांनी काम केलं. केवळ कंपन्यांसाठीच नाही तर अनेक राजकारण्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हे करण्याचं कामही त्यांनी मोठ्या प्रमाणावर केलं. या सगळ्या कामात कष्ट भरपूर होते पण पैसाही चांगला मिळत होता आणि मुख्य म्हणजे ग्रामीण युवकांना त्यातून रोजगार मिळत होता. अनेकांची आयुष्यं त्यामुळे उभी राहिली. प्रदीप यांना आर्थिक स्थैर्य मिळालं, ओळख मिळाली. बरं साधीसुधी ओळख नव्हे तर, पुण्यासारख्या भल्यामोठ्या शहरात प्रदीप लोखंडे, पुणे १३ इतकाच पत्ता असलेलं पत्रही त्यांना हमखास मिळतं अशी ओळख मिळाली. 

 

पण या सगळ्यापेक्षा त्यांच्या या आगळ्यावेगळ्या प्रयत्नांतून एक नवनिर्माण घडलं. ते कसं घडलं, प्रदीप यांनी नेमकं कायकाय आणि का केलं आणि त्यातून इतका पैसा कसा मिळवला याची ही रुरल मार्केटिंगची गोष्ट सांगणारं प्रदीप लोखंडे, पुणे १३ हे पुस्तक म्हणूनच वाचलं पाहिजे.

 

अनेक बलाढ्य कंपन्यांसाठी प्रदीप यांनी काम केलं. केवळ कंपन्यांसाठीच नाही तर अनेक राजकारण्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हे करण्याचं कामही प्रदीप यांनी मोठ्या प्रमाणावर केलं. या सगळ्या कामात कष्ट भरपूर होते पण पैसाही चांगला मिळत होता आणि मुख्य म्हणजे अनेक ग्रामीण युवकांना त्यातून रोजगार उभा होत होता. प्रदीप यांना आर्थिक स्थैर्य मिळालं, मानमरातब मिळाला, ओळख मिळाली. साधीसुधी ओळख नव्हे तर, पुण्यासारख्या भल्यामोठ्या शहरात प्रदीप लोखंडे, पुणे १३ इतकाच पत्ता असलेलं पत्रही त्यांना हमखास मिळतं अशी ओळख मिळाली.   

 

 

प्रदीप लोखंडे पुणे १३, लेखक : सुमेध वडावाला (रिसबूड)

मेनका प्रकाशन किंमत : २२०/- रु. पृष्ठसंख्या : २३० 

 

– सुरेखा पाटणकर 

इंटरनेट ही गोष्ट आता सगळ्यांच्याच आयुष्यात अपरिहार्य बनत चालली आहे. उद्योग...

मायकेल कॉलेजमध्ये असताना त्याला संगीताची खूप आवड होती. पदवी मिळाल्यानंतर त...

  आपली दोन पावलं सारख्याच लांबी-रुंदीची असतात असं आपल्यापैकी अनेकजणांना ...

गुगल, नासा, कोकाकोला, युनिलिव्हर आणि टोयोटा या कंपन्या आपल्याकडच्या निवड भर...

  स्टीफनने माझ्या शेजाऱ्याच्या घराला रंग देण्याचं काम उत्कृष्ट केलं. त्य...