एका प्रोजेक्टला आम्हाला 17 लाख मिळाले, तोच टर्निंग पॉईंट ठरला

एका प्रोजेक्टला आम्हाला 17 लाख मिळाले, तोच टर्निंग पॉईंट ठरला

 

प्रश्न : अश्विनी, सुरुवातीला तुमची फॅमिली बॅकग्राउंड सांगा.

अश्विनी : माझा जन्म औरंगाबादला झाला आणि तिथेच शालेय शिक्षण झालं. मला वाटायचं की आपण आर्किटेक्चर व्हावं किंवा ॲडव्हर्टायझिंग मध्ये जावे. जाहिराती मला आवडायच्या. त्या वेळी टीव्ही नव्हता औरंगाबादला. त्यामुळे टीव्हीवरच्या जाहिराती पाहिल्या नव्हत्या पण मासिकातल्या, वर्तमानपत्रातल्या जाहिराती पाहून वाटायचं. काही तरी वेगळ्या कल्पना असतील तर किती छान लिहिलंय हे किंवा ही फोटोग्राफी किती चांगली आहे, असं वाटायचं हे करू या आपण. तेंव्हा औरंगाबादला आर्किटेक्चरचं कुठलंच कॉलेज नव्हतं. मी अकरावी-बारावीला सायन्स घेतलं. इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि वर्कशॉप टेक्नॉलॉजी असे सब्जेक्ट घेतले. याच दरम्यान मला N. I. D.बद्दल माहिती मिळाली. औरंगाबाद आणि त्याच्या दूरदूरही कोणी ऐकलेलं नव्हतं एनआयडीबद्दल. किंवा डिझाईन नावाचं शिक्षण असतं. 

तर माझ्या सुदैवाने मी शिक्षणासाठी तिथे गेले. एनआयडीचं शिक्षण खूप वेगळ्या पद्धतीचं होते. परीक्षा नाही, मार्क्स नाहीत, ग्रेडींग सिस्टीम नाही. आणि दर सेमिस्टरच्या शेवटी तुम्ही काय शिकला आणि तुमचे सेमिस्टरची सुरुवात कुठे झाली आणि तिथून किती अंतर पुढे तुम्ही आलात अशी असेसमेंट व्हायची आणि ती वेगळ्या प्रकारची असेसमेंट होती. इतक्या वेगळ्या प्रकारचे ते शिक्षण आहे की नेमके काय शिकावे, हे थोडंसं एका फ्रेमवर्कमध्ये डिफाइन केलेले असते सुरवातीला. आणि ते कशा पद्धतीने शिकायच हा त्या विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधला चर्चेचा विषय आहे. तुम्ही करून पाहून शिकायचं. नुसत पुस्तकातल्या आकृत्या पाहून शिकायचं नाही. असं ते शिक्षण होतं. जे शिक्षण मला तिथे मिळालं आणि आता त्याला २९ वर्षे झाली. अजूनही मला आम्ही तिथे काय शिकलो ते उपयोगी पडतं. 

 

प्रश्न : तू काय करिअर निवडलंस आणि का निवडलंस? 

अश्विनी : त्यामध्ये दोन प्रकारचे जॉब होते, एक म्हणजे कम्युनिकेशन डिझाईन, म्हणजे ज्यामध्ये मी ग्रॅज्युएट झाले आहे, ते लोक ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये जायचे किंवा चित्रपटनिर्मितीमध्ये जायचे. दुसरं म्हणजे प्रॉडक्ट डिझाईन केलेले लोक होते ते इंडस्ट्रीमध्ये म्हणजे टाटा, गोदरेज, ब्लू स्टार अशा कंपन्यांमध्ये. म्हणजे जेथे प्रॉडक्ट्स तयार व्हायची तिथे जायचे. आणि या सगळ्या गोष्टींमधून आम्ही गेलो होतो. समर ट्रेनिंग, विंटर ट्रेनिंगमध्ये झालेले होते. पण प्रत्यक्षात तुम्हाला त्यापेक्षा खूप जास्त शिकवलेलं असतं, त्याचा उपयोग कसा होणार? ही अस्वस्थता होती. नोकऱ्या आमच्या हातात होत्या, पण जे आपण शिकलोय त्याला आपण पूर्णपणे न्याय देणार का हा जॉब घेतला तर?

 

आम्हाला डिझाईनबरोबर प्रोफेशनल प्रॅक्टिस शिकवायचे एनआयडीमध्ये. त्याच्यामध्ये बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, फायनान्स, इकॉनॉमिक पॉलिसी, पॉलिटिकल ॲनालिसिस अशा सगळ्या गोष्टींचे क्लासेस असायचे. आम्हाला ग्रुप एक्सरसाईज दिला की तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर काय करावे लागेल हा पण एक्सरसाइज करा. आमच्या चार पाच जणांपैकी तिघांनी तो ग्रुप एक्सरसाइज एकत्र केला आणि एकच केला. स्वतःचा व्यवसाय करायचा म्हणजे, कसं कॉस्टिंग करायचं स्वतःच्याच वेळेचे, रिकरिंग एक्स्पेन्सेस काय असतात? लोन म्हणजे काय? कोटेशन म्हणजे काय? बिलिंग म्हणजे काय? हे त्या मॉड्यूल मध्ये शिकलो. आणि ते मॉडेल तर व्यवस्थित झाले. ते ज्या दिवशी झाले तेव्हा म्हटलं हे फार काही अवघड नाहीये हे. आपण आता शिकलोय, आपण आता हेच करूया. का नाही करायचं? अशी कल्पना झाली आणि हीच एलिफंटची जन्मकहाणी.

 

याच सुमारास असं झालं की, मी पुण्यामध्ये माझे प्रोजेक्ट करत होते आणि ते प्रोजेक्ट संपायच्या सुमारास एका जर्मन कंपनीचे ग्लोबल कॉर्पोरेट कम्युनिकेशन डायरेक्टर आले होते. त्यांनी ते काम पाहिलं आणि ते म्हणाले, माझ्याकडे एक प्रोजेक्ट आहे, तुला इंटरेस्ट असेल तर मी ते तुला ऑफर करतो. तेरा देशांमध्ये होती तेव्हा ती जर्मन कंपनी. एप्रिलमध्ये आपण पुन्हा भेटू. असं म्हणून ते म्हणाले, एक मात्र आहे, माझं बजेट जरा टाईट आहे. मी काही प्रिपेअर्ड नव्हते बजेटची चर्चा करायला. पण ते म्हटले हंड्रेड थाउजंड डॉईश मार्क्स!!. मला एक तर हंड्रेड थाउजंड म्हणजे एक लाख हा प्रकाश पडायला वेळ लागला, मी म्हटलं ठीक आहे. करू.

 

त्यावेळेला मला वाटतं तेरा साडेतेरा लाख त्याची किंमत होती आणि १९८९ मध्ये एका प्रोजेक्टसाठी साडेतेरा लाख मिळणे ही खूपच मोठी गोष्ट होती. पण मधल्या काळात रुपयाची किंमत घसरली आणि आम्हाला सोळा सतरा लाख रुपये मिळाले. 

 

प्रश्न : नाव एलिफंट का ठेवलं तुम्ही? 

अश्विनी : सहा क्रिएटिव्ह डोकी एकत्र येऊन एक काहीतरी निर्णय घ्यायचा हीच पहिली कसोटी आहे. आम्हा सहाही जणांपैकी प्रत्येकाचे स्पेशलायझेशन वेगवेगळे होते. कम्युनिकेशन डिझाईन, फिल्म मेकिंग, प्रॉडक्ट डिझाईन, फर्निचर डिझाईन असं होतं. एक दिवशी चर्चा करता करता एक गोष्ट आठवली. हत्ती आणि आंधळ्यांची. आम्ही म्हटलं की आपल्यालाही डिझाईनचं असं मोठं विश्व भारतात उभं करायचं आहे.

 

प्रश्न : भारतात त्यावेळी दुसरी डिझाईन फर्म नव्हती?

अश्विनी : आमच्याएवढी मोठी दुसरी डिझाईन फर्म नव्हती. आणि अजूनही अशा फर्म्स फारशा नाहीत. कारण हा अवघड व्यवसाय आहे. सव्वा वर्ष झाल्यावर, आमच्यातला जो फर्निचर डिझायनर होता, तो बाहेर पडला. पण अजूनही आम्ही चांगले मित्र आहोत. त्याच्यानंतर सुमारे पंधरा वर्ष आम्हा बाकीच्या पाच जणांची वाटचाल चांगली घट्ट चालू राहिली. त्यानंतर एका मैत्रीणीने थोडा ब्रेक घ्यायचा निर्णय घेतला. त्यानंतर अजून एक मित्र बाहेर पडला. त्यामुळे आता आम्ही तिघेजण को-फाउंडर आहोत आता. 

 

प्रश्न : कामाचं डिस्ट्रीब्यूशन, लीडरशीप, फेस ऑफ ऑर्गनायझेशन कोण असणार अशा  गोष्टींमुळे को-फाउंडरमध्ये काही वादविवाद होऊ शकतात.

अश्विनी : जरी डिझाईनचे स्किल्स सारखे असले तरी व्यवसाय करायचा म्हणजे फायनान्स, टॅलेंट मॅनेजमेंट, मार्केटिंग, जनसंपर्क या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या सगळ्यांनाच येतात. आम्ही पहिल्या दिवसापासून आमचं फायनान्स स्वच्छ, पारदर्शक ठेवलं. तो कधीही वादाचा मुद्दा होऊ शकणार नाही. मी किंवा आमचा एक मित्र, आम्हाला मार्केटिंग आवडायचं. म्हणून मार्केटिंग, जनसंपर्क, मीडिया संपर्क हा सगळा वाटा आम्ही घेतला. आमचा अजून एक मित्र खूप वेगळा विचार करणारा आहे. म्हणजे त्याला सरधोपट काही नको असतं. त्यामुळे ती पण आमची एक चांगली इनोव्हेटिव्ह स्ट्रॅटेजी झाली. सुरुवातीला आपोआप अशी कामांची विभागणी झाली. आता स्पष्टपणे केलंय. हे मी बघणार, हे तू बघणार आहेस.

 

प्रश्न : बिझनेसमध्ये काही काळानंतर कॅश फ्लो, व्यावसायिक संधी, प्रॉजेक्ट्स, ऑर्डर्स सगळ्याच बाबतीत सर्व बाजूनी संकटं येऊ लागतात. असे काही जीवन-मरणाचे प्रश्न आले का? सुरुवातीच्या काळात किंवा नंतरही? 

अश्विनी : मला एक पुस्तक मिळालं, “The Path’  त्या पुस्तकात असं आहे, जर तुमचं पर्सनल मिशन आणि प्रोफेशनल मिशन हे एकच असेल तर आयुष्यात फारसा संघर्ष येत नाही. आणि तुमचं ध्येय सहजपणे मिळवू शकता. त्यात छोटे छोटे एक्सरसाइज होते,  थोडंसं ते असं बिब्लिकल पुस्तक आहे. ते योग्य वेळेला माझ्या हातात पडल्यामुळे मी ते वाचलं. ते एक्सरसाइज केले. आता जर का मी ते पुस्तक वाचलं तर कदाचित एवढं महत्त्वाचं, एवढं उपयोगी वाटणार नाही. पण त्यावेळी तो कठीण काळ एका पुस्तकाने पार केला.   

आम्ही ऑफिस, १९९९-२००० च्या सुमारास खरेदी केलं. लोन वगैरे घेऊन आम्ही ही जागा घेतली. त्यावेळेला बिझनेस वगैरे व्यवस्थित चाललं होतं, कर्ज परत करायला आम्हाला काही अडचण वाटत नव्हती. सगळी व्यवस्थित होईल असं होतं. आम्ही उत्साहात होतो. एकच मोबाईल होता आमच्याकडे त्यावेळेला. इथे आल्यावर आम्हाला टेलिफोन एक्सचेंजने सांगितले की, तुमचा टेलिफोन इथे ट्रान्स्फर होऊ शकत नाही. इथे बावधन एक्सचेंज होतय, त्याच्या बिल्डींगचे बांधकाम चालू आहे. ते बांधकाम झालं की एक्सचेंज होईल आणि मग तुम्हाला फोन मिळेल. सहा सात महिने लागतील. त्यामुळे फोनच नाही. व्यवसाय कुठलाही असेल आणि कोणालाही तुमच्यापर्यंत पोहोचायचं तर फोन नव्हता, आणि दुसरे म्हणजे इथे आल्यावर आमच्या लक्षात आलं की इथे विजेचा खूप प्रॉब्लेम आहे. दिवसा बारा-बारा तास वीज नसायची. त्यामुळे इंटरनेट नाही, टेलिफोन नाही आणि कॉम्प्युटरवर काम करणे शक्य नाही. अशा तीन गोष्टी आम्हाला एकदम कळल्या आणि मोठे लोन डोक्यावरती, आणि क्लायंटशी संपर्क करू शकत नाही. जे प्रोजेक्ट चालू होते तेही करणं अशक्य होतं. कारण बारा-पंधरा तास वीज नाही. म्हणून आम्हाला मोठे इन्वेस्टमेंट करायला लागली. अजून एक लोन घेऊन, पावर बॅकअपची आणि आम्ही त्यातून एक विचित्र सोल्युशन काढलं इंटरनेट मिळवण्यासाठी. अजून एक छोटीशी खोली भाड्याने घेतली. तिथे टेलिफोनचा खांब होता. तिथे आम्ही ऑफिसबॉयला दिवसातून तीन-चार वेळा लॅपटॉप घेऊन पाठवायचो. तो डायल अपच्या थ्रूसह सगळ्या ई-मेल डाउनलोड करायचा आणि परत यायचा. आम्ही ते बघायचो. असे आम्ही सहा-आठ महिने केले. पण त्या काळात आमच्या बऱ्याचशा एन्क्वायरीज गेल्या असणार, कारण लोक आमच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते. एकतर आम्ही मुंबईत नव्हतो. सगळे मोठे व्यवसाय मुंबई, दिल्लीत होते. त्यांची कायम अशी तक्रार किंवा प्रश्न असायचा की, मुंबईला ऑफिस का नाही तुमचं? आणि आता पुण्यातही ॲक्सेस नाही. म्हणजे कुठेच नाही, अशी परिस्थिती झाली की आम्ही कुठेच उपलब्ध नाही. ते थोडंसं एक वर्ष अवघड गेलं. आमचा बराच व्यवसाय गेला त्यावेळेला.

 

प्रश्न : तुम्ही काय टाईपची कामे करता आणि काय साईज आहे तुमचा? म्हणजे व्यवसाय कसा वाढला? काय टाईपचे कस्टमर? याविषयी थोडंसं सांगा.

अश्विनी : पहिल्या दिवसापासून आमच्याकडे अकाउटंट, टायपिस्ट आणि फाईन आर्टिस्ट कम कट अँड पेस्ट आर्टिस्ट. आमचं ऑफिस १० बाय १२ आकाराचं होतं. त्यात आम्ही सहा जण आणि ते तीन जण बसायचो. आमचे तीन किंवा चार व्हर्टिकल्स आहेत. प्रॉडक्ट डिझाईन, मेडिकल डिवाइस डिझाईन, एन्व्हायर्नमेंट डिझाईन, इंटेरियर डिझाईन, आर्किटेक्ट्स, ब्रॅण्डिंग आणि कम्युनिकेशन डिझाईन. याशिवाय डिजिटल डिझाईनिंग हे एक व्हर्टिकल आहे. अजून एक डिझाईन रिसर्च टीम आहे. डिझाईन रिसर्च सगळ्याच व्हर्टिकलला लागतं. आम्ही हळूहळू आयटी आणि ॲडव्हर्टायझिंग दोन्ही क्षेत्रांकडे  बघून कशा पद्धतीने बिझनेस डेव्हलपमेंट झाली पाहिजे, प्रोजेक्ट मॅनेजमेंट झालं पाहिजे असं थोडं शिकत गेलो आणि त्यामुळे आमच्याकडे बिझनेस डेव्हलपमेंटची टीम आहे आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटची टीम आहे. आमच्याकडे सध्या सत्तर लोक काम करतात. 

 

प्रश्न : या प्रवासामध्ये महिला उद्योजिका असल्याने काही आव्हानं, काही संधी निर्माण झाल्या का? 

अश्विनी : व्यावसायिक म्हणून मला तसा काही प्रॉब्लेम आला नाही. पण कुठल्याही व्यवसायात जाताना काही गोष्टी मी मुलींना सांगू इच्छिते. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मुलगी आहात ते विसरून जा. त्याचा फायदाही घेऊ नका किंवा उलट काही अपेक्षा करू नका. कारण ते दुधारी शस्त्र आहे. तुम्ही महिला आहात म्हणून फक्त फायदा घेण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही महिला असल्याबद्दल कुठलीतरी किंमतही द्यावी लागेल त्यामुळे दोन्ही गोष्टी टाळायला पाहिजेत.

 

प्रश्न : मागे वळून बघताना कुठला एक किंवा अनेक टेक-ऑफ पॉईंट्स या प्रवासात ठळकपणे जाणवतात? 

अश्विनी : आम्ही always, we, not ‘I’. पण मला वाटतं, पहिलं आम्हाला मिळालेलं प्रोजेक्ट. तोच टेक ऑफ पॉईंट होता. त्याच्यानंतरचा टेक-ऑफ म्हणजे पुण्यामध्ये २००८ मध्ये जे कॉमनवेल्थ गेम झाले, त्याच्या आयडेंटिटीसाठी आणि पूर्ण पुणे शहरासाठी जे काही करावे लागणार होते, त्याच्यासाठी आम्हाला आमंत्रित केलं गेलं. एकॉनॉमिक टाईम्सने नंबर एक डिझाइन कंपनी म्हणून आम्हाला सिलेक्ट केलं. बजाज ग्रुपची संपूर्ण आयडेंटिटी केली काही वर्षांपूर्वी. बजाज ही पुण्यातली खूप मोठी मान्यवर कंपनी आहे आणि त्यांच्यात खूप मोठे परिवर्तन वेगळ्या प्रकारे घडवून आणू शकलो, आणखी अनेक क्षेत्रात काम केलंय. बँक, आयटी, ऑटोमोबाईल, FMCG तर करतोच. मेडिकल डिव्हायसेस ह्या सगळ्यांमध्ये आम्ही काम करून भारतीय दृष्टिकोन त्यात घालू शकलो आणि भारतीयांना काय योग्य आहे, उपयुक्त आहे तो अँगल आम्ही आता डिझाइनमध्ये आणू शकतो. ब्रिटानिया, गोदरेज, सिम्फनीसारख्या अनेक कंपन्या आणि आम्ही काम केलेल्या काही स्टार्टअप्सना खूप मोठं यश मिळालेलं आहे. सुरुवातीला जे मोठे आंतरराष्ट्रीय ग्राहक असायचे, ते म्हणायचे की पाश्चात्त्य देशात असं आहे, आता आपण असं करूया. आता ग्राहक तसा राहिलेला नाही. ते म्हणतात की आमच्या दृष्टीने जे काही केलेलं आहे ते आम्ही स्वीकारू, तर तो एक मला आमच्या दृष्टीने थोडासा गौरवाचा भाग आहे की आम्ही भारतीय दृष्टीकोन भारतातल्या डिझाइनमध्ये आणू शकलो.

 

– विश्वास महाजन

  गौरी संत आणि भक्ती देशपांडे या दोघींनी सुरू केलेले हे गाभा क्रिएशन्स. या...

  पत्रकारिता आणि योगाभ्यास ही कमालीची वेगळी क्षेत्रे आहेत. परंतु माणसाच्...

  आदरातिथ्य किंवा आतिथ्यशीलता हा ‘स्त्री’चा परंपरेने चालत आलेला स्थायी...

  टायर रिट्रेडिंग हा व्यवसाय तसा पुरूष मंडंळींची मक्तेदारी असलेला व्यवस...

  केक ही अशी गोष्ट आहे की ती लहान मोठया सगळ्यांना आवडते! सहसा केक न आवडणारी ...