Online आर्थिक व्यवहार करताना अशी घ्या काळजी

Online आर्थिक व्यवहार करताना अशी घ्या काळजी

 

हॅलो श्रेयस, अरे कसं सांगू तुला.. मी इतक्या हौसेने पहिल्यांदाच तुमच्या सगळ्यांसाठी काही ना काही खरेदी केली, आणि बिल भरायला गेले तर माझी पर्सच मिळत नाहीये, कोणी मारली की हरवली काहीच कळत नाहीये.”

“आई अग रडू नकोस आणि घाबरू नकोस, किती पैसे होते पर्समध्ये?

“कॅश फार नव्हती रे पण डेबिट कार्ड होतं, कोणाच्या हाती लागलं तरं”..

“आई कार्डची काळजी करू नको, मी लगेच तक्रार नोंदवून ते ब्लॉक करतो.

बाकी ट्रीपचे पैसे भरलेलेच आहेत. त्यामुळे तोही प्रश्न नाही”.

“अरे पण इतक्या हौसेने केलेली खरेदी.. ते सगळं कॅन्सल करावं लागेल, त्याचंच वाईट वाटतयं”

आई तुझ्या मोबाईलवर मी गुगल पेचं ॲप डाउनलोड केलंलं आहे, त्याच्यावर जा आणि मी सांगतो तसं करून बिल भर. तू सगळी खरेदीही कर आणि पुढची ट्रीपही एंजॉय कर”.

पहिल्यांदाच आपल्या मैत्रीणींबरोबर ट्रीपला गेलेल्या सविताताईंची पर्स हरवली तरीही आधुनिक साधनांचा वापर करून त्यांच्या मुलाने त्यांचा प्रश्न चुटकीसरशी सोडवला. ही साधने कोणती, त्यांचा वापर करून आपलं आयुष्य अधिक सोपं कसं करता येईल हे सांगणारा हा लेख…

 

प्रत्येक उद्योजकालाही आर्थिक व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची ओळख असणं गरजेचं आहे. पैशाच्या देवघेवीसाठी यामधल्या काही पर्यायांचा उपयोग त्याला करावा लागतो. त्यांची ओळख नसेल तर त्याला अनेक अडचणी येतात. .

 

डेबिट/क्रेडिट कार्ड

डेबिट कार्ड : नगद रकमेची जोखीम नको

आपलं बँकेचं खातं जिथे असतं फक्त तीच बँक आपल्याला डेबिट कार्ड देऊ शकते. डेबिट कार्ड हे आपल्या बँक खात्याशी जोडलेलं असतं. डेबिट कार्डाचा वापर आपण एटीएम यंत्रामधून पैसे काढणं, दुकानांमध्ये किंवा इतर ठिकाणी खरेदी करणं, हॉटेलचं बिल, पेट्रोल भरणं अशा अनेक कारणांसाठी करू शकतो. यासाठी दुकानदार आपलं डेबिट कार्ड ‘पॉइंट ऑफ सेल (पीओएस)’ नावाच्या छोट्या यंत्रामधून फिरवून त्यावर आपल्या व्यवहाराची रक्कम टाकतो. त्यानंतर आपण गुप्त ‘पिन’ त्या यंत्रावरच्या कीबोर्डवर टाइप केला की आपला व्यवहार पूर्ण होतो. पैसे आपल्या बँक खात्यातून थेट वळते होतात.

 

‘पिन’विना होणाऱ्या व्यवहारांची आर्थिक मर्यादा २,००० रुपयांची

अलीकडच्या काळात डेबिट कार्डांमध्ये असलेल्या ‘चिप’मध्ये पीओएस यंत्राशी बिनतारी संदेशवहन करण्याची सोय करण्यात आलेली आहे. त्यामुळे व्यवहार पूर्ण करण्यासाठी डेबिट कार्ड दुकानदाराकडच्या पॉस यंत्रामध्ये फिरवण्याची गरज नसते; ते नुसतं त्या यंत्राच्या जवळ नेलेलंही पुरतं. अशा वेळी आपला ‘पिन’सुद्धा वापरण्याची गरज नसते. व्यवहार सोपा आणि जलद होतो. पण ‘पिन’सुद्धा टाकायचा नाही, याचा अर्थ हा व्यवहार असुरक्षित असू शकतो. म्हणजेच आपलं डेबिट कार्ड कुणाच्या हाती पडलं तर तो माणूस ते परस्पर वापरू शकेल. हा धोका लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने डेबिट कार्डांच्या व्यवहारांच्या रकमेवर बंधन घातलं आहे. ‘पिन’विना होणाऱ्या व्यवहारांची आर्थिक मर्यादा जास्तीत जास्त २,००० रुपयांची असू शकते. म्हणजेच चुकून आपलं डेबिट कार्ड कुणाच्या हाती लागलंच, तरी याहून जास्त रकमेचा व्यवहार संबंधित माणूस करू शकत नाही.

आपण आपला ‘पिन’ कुणाला सांगू नये, तसंच डेबिट कार्डाच्या मागे किंवा पाकिटात/पर्समध्ये कुठे तो लिहून ठेवू नये. डेबिट कार्ड वापरताना ‘पिन’ स्वत:च भरावा.

 

आपलं डेबिट कार्ड आपण नेहमी आपल्याजवळ किंवा घरात सुरक्षित ठिकाणी ठेवावं. त्यावरचा क्रमांक, त्याच्या वैधतेची मर्यादा, त्याच्या मागे बँकेने छापलेला तीन-आकडी ‘कार्ड व्हेरिफिकेशन कोड (सीव्हीव्ही)’ ही सगळी माहितीसुद्धा गुप्त ठेवावी.

 

डेबिट कार्ड वापरून आपल्या बँकेखेरीज इतर बँकांच्या एटीएम यंत्रांमधून पैसे काढायचे तर त्यावर आपल्याला ठराविक व्यवहारांनंतर भुर्दंड पडू शकतो. त्यामुळे नीटपणे माहिती  घेतल्याशिवाय असे व्यवहार करू नयेत. एटीएममधून पैसे काढताना इतर कुणी आपलं डेबिट कार्ड किंवा पिन याची माहिती मिळवत नाही ना याची खात्री करावी. शक्यतो आपल्या बँकेची शाखा  असेलल्या एटीएममधूनच पैसे काढावेत;

डेबिट कार्ड आपण ‘ऑनलाइन’ व्यवहारांसाठी वापरू शकतो. ऑनलाइन खरेदी, बिलं भरणं हीकामं आपण डेबिट कार्ड वापरून करू शकतो. आपलं डेबिट कार्ड चोरून किंवा त्याची माहिती मिळवून कुणी आपल्याला फसवू नये यासाठी बँकांनी एक सोय केलेली असते. डेबिट कार्ड ऑनलाइन वापरायचं तर त्यासाठी बँकेनं आपल्याला एक वेगळा पासवर्ड दिलेला असतो. तो वापरल्यावरच ऑनलाईन व्यवहार पूर्ण होऊ शकतो. हा पासवर्डसुद्धा गुप्त ठेवला पाहिजे. अलीकडे या पासवर्डऐवजी बँक आपल्या मोबाईलवर व्यवहाराच्या वेळी ‘वन टाईम पासवर्ड (ओटीपी)’ पाठवते, तो आपण वापरू शकतो.

 

क्रेडिट कार्डची बिलं वेळेत भरणं गरजेचं

क्रेडिट कार्ड आणि आपलं बँक खातं यांचा अजिबात संबंध नसतो. क्रेडिट कार्डाचा व्यवहार केल्यावर आपल्या बँक खात्यातून पैसे वजा होत नाहीत. क्रेडिट कार्डाच्या व्यवहारांचं बिल आपल्याला ठराविक काळानंतर येत राहतं. ते आपण वेळेत भरणं अत्यावश्‍यक आहे; अन्यथा बँक त्यावर जबरी व्याज वसूल करते.

 

यूपीआय तंत्रज्ञान : पैशांच्या देवाणघेवाणीसाठी महत्त्वाचा मार्ग

अलीकडच्या काळात विलक्षण वेगाने लोकप्रिय होत चाललेलं तंत्रज्ञान ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय)’चं आहे. कदाचित काही वर्षांनी डेबिट आणि क्रेडिट कार्ड जवळपास हद्दपार करू शकेल अशी याची क्षमता आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेलं सुरक्षित आणि सोयीचं असं हे तंत्रज्ञान आहे. भारतामधल्या बहुसंख्य मध्यम आणि मोठ्या बँका त्याचा वापर करतात.

 

यूपीआय तंत्रज्ञान वापरण्यासाठी स्मार्टफोनवर ‘ॲप’ डाऊनलोड करावं लागतं. त्यासाठी अनेक पर्याय असले तरी ‘गुगल प्ले’, ‘भीम’ आणि ‘फोनपे’ ही तीन ॲप्स सर्वाधिक लोकप्रिय आहेत. यापैकी कुठलंही ॲप आपण फोनमध्ये इन्स्टॉल केलं की आपल्या मोबाइल क्रमांकाशी जोडल्या गेलेल्या बँक खात्यांचे तपशील आपल्याला दाखवतं. दुसरं कुणी आपल्या बँक खात्यांचा गैरवापर करू नये म्हणून हे ॲप आपल्याला या बँक खात्यावरच्या डेबिट कार्डाचे तपशील भरायला लावतं आणि ते बरोबर आहेत ना हे बँकेशी संपर्क साधून तपासून घेतं. हे सगळं जुळलं की आपण यूपीआयचा वापर करायला सज्ज होतो.

 

यूपीआय वापरून आपण बँक खात्यांमधून कुणालाही तत्काळ पैसे पाठवू शकतो. पलीकडचा माणूस यूपीआय वापरत असेल किंवा नसेल तरीही त्या माणसाच्या बँक खात्याचा क्रमांक आणि बँकेचा ‘आयएफएससी कोड’ भरून आपण यूपीआय ॲपमधून त्याच्या खात्यात काही सेकंदांमध्ये थेट पैसे जमा करू शकतो. दोघांनाही त्यासंबंधीचा संदेश जातो. पलीकडचा माणूससुद्धा यूपीआय वापरत असेल तर हे काम अजूनच सोपं होतं. आता आपल्याला त्या माणसाच्या बँक खात्याचे तपशीलसुद्धा माहीत करून घ्यावे लागत नाहीत. हे कसं शक्य आहे?

 

यूपीआय तंत्रज्ञान वापरत असलेल्या माणसाला इमेल आयडीसारखी एक ओळख दिली जाते. म्हणजेच जेव्हा मी माझ्या स्मार्टफोनवर ‘गुगल पे’सारखं ॲप इन्स्टॉल करतो आणि ते आपल्या बँक खात्यांशी जोडलं जातं तेव्हा हे ॲप आपल्याला एक नवा ‘यूपीआय आयडी’  दाखवतं. तो मिळाला की त्यानंतरचं काम सोपं असतं. समजा एका माणसाला मला ऑनलाइन पैसे पाठवायचे आहेत. त्याला मी माझ्या बँकेच्या खात्याचे तपशील देण्याची गरज नसते. मी फक्त माझा ‘यूपीआय आयडी’ त्याला सांगायचा. तो माणूस त्याच्या स्मार्टफोनवरचं यूपीआय ॲप उघडेल आणि पैसे पाठवण्याचा पर्याय निवडेल. त्यानंतर कुणाला पैसे पाठवायचे असं ते ॲप त्याला विचारेल. तिथे तो माणूस माझा ‘यूपीआय आयडी’ भरेल, किती रक्कम पाठवायची ते टाईप करेल आणि त्याच्या बँक खात्यातून पैसे क्षणात माझ्या बँक खात्यात येतील! म्हणजेच जणू एका आयडीवरून दुसऱ्या आयडीवर पैसे हस्तांतरित झाल्यासारखा हा व्यवहार होईल. सगळ्यांच्या बँकांचे तपशील त्यांच्याचकडे राहतील. इतर कुणाला ते देण्याची गरजच यामुळे संपते.

 

अर्थातच आपला स्मार्टफोन इतर कुणाच्या हाती लागला तर यूपीआयचा गैरवापर होऊ शकतो;  आपल्या फोनमधलं यूपीआय ॲप उघडून तो माणूस त्याच्या खात्यावर पैसे पाठवू शकतो. हे टाळण्यासाठी यूपीआयचे व्यवहार करत असताना आपल्याला ‘पिन’ वापरणं बंधनकारक असतं.

 

आता यूपीआयचा वापर करून आपण ऑनलाइन खरेदी करणं, बिलं भरणं अशा गोष्टीही सहजपणे करू शकतो. अनेक दुकानदार, हॉटेल्स, ओला/उबर यांच्यासारख्या सुविधा पुरवणारे लोक हे यूपीआयद्वारे पैसे स्वीकारायला लागले आहेत. त्यात कुठलीही माहिती टाइप न करता  ‘कोड स्कॅन’ करून आपोआपच पैसे अदा करण्याची सोयही आहे. साहजिकच कार्डापेक्षाही हा पर्याय सोयीचा ठरतो. यूपीआय हा पैशांच्या देवाणघेवाणीसाठीचा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग ठरतो आहे. .

 

ई-वॉलेटऐवजी यूपीआयचा वापर करणं सोयीचं आणि फायद्याचं

समजा आपण इंटरनेटवर कुठे तरी पैशांचं आपलं एक आभासी ‘ऑनलाईन’ पाकीट तयार केलं तर? यालाच ‘इलेक्ट्रॉनिक वॉलेट (इ-वॉलेट)’ असं म्हणतात. याचं सगळ्यात प्रसिद्ध झालेलं उदाहरण म्हणजे ‘पेटीएम’. आता ॲमेझॉन, ओला अशा अनेक कंपन्यांचीही ई-वॉलेट्स आहेत. आपण बँक खात्यातून किंवा क्रेडिट कार्डाचा वापर करून इंटरनेटद्वारे पैसे या ऑनलाइन वॉलेटमध्ये भरायचे आणि नंतर ते हवे तिथे वापरायचे असा याचा अर्थ असतो. म्हणजेच आपले पैसे तेवढा काळ या कंपनीच्या वॉलेटमध्ये राहणार.

 

भारतात विमुद्रीकरणाचा निर्णय जाहीर झाल्यावर पेटीएम कंपनी विलक्षण प्रकाशझोतात आली. लाखो लोकांनी पेटीएमचं खातं उघडून त्यात पैसे भरले आणि ते वापरायला सुरुवात केली. नंतर मात्र हळूहळू पेटीएमची लोकप्रियता ओसरत गेली. याचं मुख्य कारण म्हणजे यूपीआयचं तंत्रज्ञान हे इ-वॉलेट तंत्रज्ञानापेक्षा जास्त सोयीस्कर आहे, शिवाय यूपीआय वापरताना आपले पैसे आपल्या बँक खात्यातच राहतात. ई-वॉलेटच्या तंत्रज्ञानामध्ये मात्र आपले पैसे या ई-वॉलेट कंपनीकडे जातात. त्यामुळे ई-वॉलेट वापरावं का नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे; पण जिथे शक्य असेल तिथे ई-वॉलेटऐवजी यूपीआयचा वापर करणं  जास्त सोयीचं आणि फायद्याचं आहे.

 

चांगल्या दर्जाच्या ‘अँटिव्हायरस’मुळे ऑनलाइन व्यवहारांमधले धोके दूर

आजकाल बहुतेक सगळ्या बँका आपल्या खातेदारांना बरेचसे व्यवहार इंटरनेट किंवा स्मार्टफोनद्वारे करू देतात. यामुळे बँकांना आपल्या शाखांमधल्या खर्चात बचत करता येते. तसंच खातेदार घरबसल्या बँकांशी संबंधित असलेली बरीचशी कामं करू शकतात. अनेक ठिकाणी ऑनलाइन बिलं भरणं, खरेदी करणं, पैसे इतर कुणाला पाठवणं असे व्यवहारही यामुळे शक्य होतात.

 

इंटरनेट बँकिंगसाठी बँकेने आपल्याला एक युजर आयडी आणि पासवर्ड दिलेला असतो. याविषयीची माहिती आपण गुप्त ठेवणं अपेक्षित असतं. हा आयडी आणि पासवर्ड वापरून आपण बँकेच्या वेबसाइटवर लॉगइन करू शकतो. त्यानंतर आपल्याला बँकेचे व्यवहार बसल्या ठिकाणी करता येतात. काही व्यवहार जास्त जोखमीचे असल्यामुळे ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला बँकेने आपल्या मोबाइलवर पाठवलेला ‘ओटीपी’ वाचून बँकेच्या वेबसाइटवर भरावा लागतो. आपल्या संगणकात आणि स्मार्टफोनमध्ये चांगल्या दर्जाचा ‘अँटिव्हायरस’ असेल तर ऑनलाइन व्यवहारांमधले संभाव्य धोके दूर होतात.

मोबाइल बँकिंग हे इंटरनेट बँकिंगचंच आधुनिक रूप म्हणता येईल. जे व्यवहार आपण इंटरनेट वापरून बँकेच्या वेबसाईटवरून करू शकतो तेच आपण आता मोबाइल ॲपच्या माध्यमातूनही करू शकतो. यासाठी आपल्याला बँकेचं ॲप इन्स्टॉल करावं लागतं.

 

भामट्यांकडून फसवणूक होऊ नये म्हणून

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक किंवा कुठलीच वित्तसंस्था आपल्याला फोन करून आपल्या खात्याचे किंवा कार्डांचे तपशील, पासवर्ड, पिन तसंच इतर गोपनीय माहिती विचारत नसते. म्हणूनच आपल्याला कधी अशा प्रकारची माहिती विचारणारा फोन आला तर आपण अशी कुठलीच माहिती पुरवू नये. हा फोन हमखास एखाद्या भामट्यानंच केलेला असतो. यासाठी काही टोळ्याही कार्यरत असतात. त्या अत्यंत चलाखीने आपल्याकडून ही माहिती काढून घेण्यासाठी धडपडत असतात. यासाठी पलीकडचा माणूस आपल्याला भीती दाखवतो किंवा  मोहात तरी पाडतो. उदा. बँक आपल्याला नवं क्रेडिट कार्ड देणार आहे, किंवा आपल्या खात्यावर सरकारच्या वतीने आलेला परतावा जमा करणार आहे, आपलं बँक खातं हॅक झालं आहे किंवा बँकेची वेबसाइटच हॅक झालेली आहे, असं काही तरी सांगून, आपली खासगी माहिती मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. या सगळ्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे.

 

आपल्याला मोहात पाडण्यासाठी किंवा भीती दाखवण्यासाठी भामटा ई-मेल, व्हॉट्सॲप, एसएमएस अशा माध्यमांतून संदेश पाठवतो. हा संदेश आपल्या बँकेकडूनच आलेला असावा तसा हुबेहूब दिसतो. त्यामुळे तो खरा आहे असं समजून आपण त्या लिंकवर क्लिक करतो. तिथे परत एकदा आपला पासवर्ड, पिन, इतर गोपनीय माहिती असं काही तरी विचारलं जातं. आपण ती माहिती पुरवतो आणि ती आपोआपच भामट्यांच्या हाती लागते.

 

सारांश म्हणजे आर्थिक व्यवहार करण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे वायफळ खर्च आणि श्रम यांची खूप बचत होऊ शकते. या सुविधा नेमक्या कोणत्या आहेत हे समजून घेणं आणि त्या वापरत असताना पुरेशी काळजी घेणं ही काळाची गरज बनलेली आहे. ‘मला त्यातलं काही कळत नाही बुवा’ असं म्हणून त्यापासून दूर पळणं हा त्यावरचा उपाय नाही हे नक्की.

 

– अतुल कहाते
(akahategmail.com)

  प्रत्येक उद्योजकाला त्याच्या उद्योगामध्ये त्याने विक्री करताना किंवा...

  “मी काय बावळट आहे का अशिक्षित आहे?” नंदिताच्या डोळ्यांत राग होता. नंदिता...

परवा माझ्याकडे एकजण आले होते. बोलता बोलता एका मोठ्या रेस्टॉरन्टबद्दल एकदम ...

उद्योग, व्यवसाय, स्टार्टअप सुरू करायचं असेल तर पहिला प्रश्न असतो तो भांडवला...

व्यवसायात अडचणी, आव्हाने येणारच नाहीत हे शक्यच नाही. पण त्या आव्हानांचा मुक...