कडक! गुळाच्या चहासाठी असं मिळवा १० लाखांपर्यंतचं कर्ज

कडक! गुळाच्या चहासाठी असं मिळवा १० लाखांपर्यंतचं कर्ज

 

सध्या सगळीकडे कडक चहाच्या जाहिराती बघायला मिळतात. अभियांत्रिकी शिक्षण घेतलेला व चांगल्या पगाराची नोकरी सोडून चहा तयार करण्याच्या व्यवसायात शिरलेल्या आणि बघता बघता महाराष्ट्र काबीज केलेल्या कुण्या एका (पुण्याच्या) तरुणाचे कौतुक कानावर पडतं. कडक पंढरपुरी चहा पुण्या-मुंबईत आवडीने उदरात रिचवला जातो. क्रिकेट जसा आपल्या देशाचा अनधिकृत राष्ट्रीय खेळ बनलाय, त्याचप्रमाणे चहा हे राष्ट्रीय पेय बनलेय.

 

तर, अशा या चहाचे किती म्हणून रंगढंग – चव – प्रकार सांगावे. सध्या कोणत्याही मॉलमध्ये गेल्यावर वेगवेगळया कंपन्यांचा चहा आणि त्यांच्या डब्यावरील संबंधित चहाच्या गुणविशेषाने दंग होऊन गुंगी यायला लागते. आता मसाला चहा, ऑर्गनिक चहाचे अनंत प्रकार, रेडी टू ड्रिंक चहा असेही अनंत प्रकार आले आहेत.

 

ग्रीन टी नावाच्या उच्चभ्रूचे मिरवणे तर विचारायलाच नको. त्याचे सुध्दा अनंत प्रकार. आपल्या मूळ आवडीला मुरड घालून ग्रीन टीकडे वळण्याचा नवा उत्साही ट्रेंडही दिसू लागलाय. चहात काहीही टाका म्हणजेच अद्रक, लवंग, गवती चहा, विलायची, हळद सुंठ इत्यादी इत्यादी. मात्र, त्यात साखरेचं दान पडल्याशिवाय चहा काही लज्जतदार बनत नाही. आम्ही विदाऊट शुगर म्हणून मिरवणाऱ्यांनी त्यांच्या प्राईम टाईममध्ये म्हणजेच ते जेव्हा तारुण्याच्या जोशात आणि होशात होते तेव्हा साखरेवर दिलसे मोहबत्त केलेलीच असते. बहुतेक वेळा डॉक्टरांकडून रक्तात शुगरेचा लाल दिवा लागल्याचे सांगितल्यावर नाइलाजाने हे साखरप्रेम सोडून ग्रीनब्रिन टी किंवा विदाऊट साखर किंवा विदाऊट सारख आणि दूध अशा (मिळमिळित) चहाकडे त्यास वळावे लागते.

 

सध्या साखरेला पर्याय म्हणून गुळभक्ती (ही) मोठी वाढू लागलीय. पूर्वीसुध्दा गुळाचा चहा होत नव्हता अशातला भाग नाही. मात्र बिचाऱ्याचे नशिब खुलले आणि फुलले नव्हते. आता मात्र गुळाचा चहा ही प्रतिष्ठेचीच बाब ठरु पाहतेय.

 

परवाच एक नवे दुकान मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरात बघायला मिळाले. त्याचा युनिक सेलिंग पॉईंट एकच. थेट शेतातल्या गुळाचा चहा. छोटं पंरतु आकर्षक असं टपरीवजा दुकान. वेगवेगळे रंगाचे व आकाराचे कागदी कप आणि वेगवेगळया प्रकरातील गुळाचा चहा, असं एकूण विक्री मॉडेल. संबंधिताने मोठ्या हुषारीने हे दुकान थाटलेलं दिसलं.

 

शिवाजी पार्क परिसरात जाणाऱ्या येणाऱ्यांच्या मनात झक्कास गुळाचा (आरोग्यदायी) चहा, ही टॅग लाइन त्याने ठसठशितपणे ठसवल्याचं दिसून आलं. असा हा गावरान गुळाचा चहा इतरही काही ठिकाणी सुरु झालेला आहेच, यामध्ये व्यवसाय आणि रोजगाराच्या चांगल्या संधी दिसून येतात. अल्प भांडवलात गुळाचा चहा व्यवसाय करता येऊ शकतो. काही आस्थापना/कार्यालये यांच्याबाहेर, घरुन चहा करुन आणणारे आणि थर्मासमध्ये ठेवणारे व कागदी कपात चहा विकणारे बरेच जण आहेत. अशाही चहाला ग्राहक आवर्जून मिळतात. आधी घशात चहा मग ऑफिसकडे पहा, अशा विचाराचे बरेच चहा भक्त आहेत.

 

आता यामध्ये, फक्त गुळ चहा स्पेशल असा प्रयोग करायला हरकत नाही. हा व्यवसाय करण्यासाठी भांडवल हवे असल्यास ते पंतप्रधान रोजगार योजना ते मुद्रा बँक योजनेतून मिळू शकते. फक्त तुम्ही विकणारा चहा नफा मिळवून देणारा आणि बँकेचे कर्ज फेडू शकण्याइतपत वाफाळलेला असेल याची खात्री बँकर्सला पटली म्हणजे झाले.

 

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेमध्ये १० लाख रुपयाचं कर्ज मंजूर केलं जातं. तुमच्या व्यवसायास लागणाऱ्या एकूण भांडवलाच्या केवळ फक्त ५ ते १० टक्के इतकीच रक्कम गुंतवावी लागते. कर्जाची रक्कम सर्व सार्वजनिक बँका, सहकारी बँका, ग्रामीण बँका आणि राज्य स्तरीय समन्वय समितिने मान्यता दिलेल्या खाजगी बँका देऊ शकतात.

 

संपर्क –

  1. संकेतस्थळ – www.pmegp.in,
  2. संकेतस्थळ – www.kvic.org.in,
  3. ईमेल – regpkvic@gmail.com

 

– सुरेश वांदिले

  प्रत्येक उद्योजकाला त्याच्या उद्योगामध्ये त्याने विक्री करताना किंवा...

  “मी काय बावळट आहे का अशिक्षित आहे?” नंदिताच्या डोळ्यांत राग होता. नंदिता...

परवा माझ्याकडे एकजण आले होते. बोलता बोलता एका मोठ्या रेस्टॉरन्टबद्दल एकदम ...

उद्योग, व्यवसाय, स्टार्टअप सुरू करायचं असेल तर पहिला प्रश्न असतो तो भांडवला...

व्यवसायात अडचणी, आव्हाने येणारच नाहीत हे शक्यच नाही. पण त्या आव्हानांचा मुक...