Crisis Management: आर्थिक संकटातून बाहेर येण्याची ६ सूत्र

Crisis Management: आर्थिक संकटातून बाहेर येण्याची ६ सूत्र

Mentor of the Monthच्या या आधीच्या तीन लेखांमध्ये आपण व्यवसायाच्या तीन महत्त्वाच्या टप्प्यांची चर्चा केली. त्याला तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चवथ्या भागात आपण चर्चा करूया crisis Managementची. गेल्या दोन वर्षांपासून जी परिस्थिती आहे त्यात छोट्या उद्योगांना जबर फटका बसला. अनेकदा मला प्रश्न विचारण्यात येतो यातून सावरायचं कसं? मार्ग कसा काढायचा? आज आपण त्याचीच चर्चा करूया…

उद्योग-व्यवसाय असो की कुठलही क्षेत्र, त्यात चढ उतार हे येतच असतात. सध्या आपण ज्या परिस्थितीमधून जात आहोत, त्यात आपण एकटे नाही, सर्व जगच संकटांमधून जात आहे. त्यामुळे आपण एकटे पडलोय असं कधीच वाटू देऊ नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, संकटांना कधीच घाबरून पळायचं नाही, तर धाडसाने सामोरे जायचं. मैदान सोडणारे, कधीच जिंकत नाहीत. तर अपयश आल्यानंतरही जे जोमाने प्रयत्न करतात तेच अखेर जिंकतात हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे.

आपण चालणं लगेच शिकतो का? नाही, ती प्रोसेस असते. सुरूवातीला अडखळतो, कधी पडतो, कधी ठेच लागते यातून अनुभव घेत आपण चालायला, धावायला शिकतो आणि आणखी मजबूत होतो. त्यामुळे कुठल्या संकटात कधी हार मानायची नाही हा निश्चय एकदा केला की ही लढायी जिंकलात म्हणून समजा. या सगळ्या काळात महत्त्वाची आहे ती चिकाटी. चिकाटीने सतत पुढ जात राहणं जमणं हे व्यवसायातही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. विचारपूर्वक प्रयत्न केले तर ते जमणं अवघड नाही.

संकटामुळे कधी माघार जरी घ्यावी लागली तरी जो पुन्हा संघर्षाची तयारी ठेवतो तोच खरा लढवय्या असतो.

मित्रांनो, अशा आर्थिक संकटांमधून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असलेली ६ सूत्र आपण पाहूया…

 

  1. बचत करा – व्यवसायात तग धरून राहायचं असेल तर तुमच्याजवळ कायम थोडे पैसे शिल्लक असले पाहिजे. तुमचा जो खर्च आहे त्याचा पुन्हा एकदा विचार करा. अनावश्यक खर्चाला तत्काळ कात्री लावा. प्रत्येक पैसा खर्च करण्यापूर्वी त्याची खरच गरज आहे का? याचा विचार करा. तुमचे व्हेंडर्स हे व्यवसाय सोडून बाहेर पडणं हे तुम्हाला परवडणारं नाही. त्यांचाही कॅशफ्लो नीट राहिला पाहिजे याची कळजी घेणं गरजेचं आहे. याच सवयीतून तुमची बचत होऊ शकते.

 

  1. कर्मचाऱ्यांना विश्वासात घ्या – सध्याची परिस्थिती ही खूप वेगळी आहे. त्यामुळे या काळात तुम्ही कर्मचाऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. जी परिस्थिती आहे त्याची खरी माहिती कर्मचाऱ्यांना द्या. बाहेरून किंवा इतर ठिकाणांहून ऐकीव माहिती आणि अफवा पसरण्यापेक्षा थेट माहिती देणं केव्हाही चांगलं. माणसं कामावरून काढणं हा काही अंतिम उपाय असू शकत नाही. उलट कर्मचाऱ्यांना विश्वासात घेतलं तर तेही तुम्हाला चार चांगले उपाय सूचवतील. नोकरी जाणार नाही याची खात्री पटल्यास कमी वेतनावर सुद्धा ते काम करायला तयार होतील.

 

  1. ग्राहकांशी संवाद – व्यवसायात सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो ग्राहक. या काळात ग्राहकांशी संवाद कायम ठेवा. तुमचा व्यवहार आणि सेवा याची ग्राहक आठवण ठेवतो. त्यांचा अनुभव हा उत्तम असेल तर या कठिण काळात ते तुम्हाला सोडून जाणार नाहीत. ते तुमच्याबद्दल इतरांनाही चांगलेच सांगतील. त्यांचं हे सांगणं हे कुठल्याही जाहीरातींपेक्षा खूप मोठी पावती असते. यातूनच तुमचा ब्रँड तयार होतो.

 

  1. कॅशफ्लोच्या Innovative पद्धती – कॅशफ्लो मॅनेज करण्यासाठी काही Innovative अशा पद्धतीचा तुम्ही अवलंब करू शकता. भविष्यात तुम्ही डिस्काउंट देणार असाल तर त्यासाठी आधीच पैसे तुम्ही ग्राहकांना मागू शकता. पुढच्या 12 महिन्यांसाठीच्या डिस्काउंट कुपन्सची तुम्ही विक्री करू शकता. किंवा वर्षभर ज्या सेवा देणार आहात त्यासाठी आताच नोंदणी सुरू करून ग्राहकांना आश्वस्त करू शकता. असे काही कल्पक मार्ग वापरल्यास तुमच्याकडे पैसे येत राहतील आणि त्याचा व्यवसाय तगून ठेवण्यास फायदा होईल.

हे वाचलंत का?

 

  1. नव्या गोष्टी शिका– या काळात तुम्हाला थोडा जास्त वेळ मिळेल, त्याचा योग्य उपयोग करा. नव्या गोष्टी, कौशल्य शिकून घ्या. कारण ही परिस्थिती काही सर्वकाळ राहणार नाही. सर्व व्यवहार जेव्हा सुरळीत सुरू होतील तेव्हा आणखी वेगाने आणि नवी उर्जा घेऊन तुम्ही कामाला लागाल. त्यासाठी शरीर आणि मनाची योग्य मशागत होईल याची काळजी घ्या. असा वेळ परत कधीच मिळणार नाही हे लक्षात ठेवा.

 

  1. Technologyचा प्रभावी वापर- संकटातही अनेक संधी दडलेल्या असतात. या संकटकाळात Technologyचा नवा अवतार जगाने पाहिला. अनेक गोष्टी सोप्या झाल्या. व्यवसायतही चांगल्या पद्धतीने Technology कशी वापरती येईल याचा विचार करा आणि लगेच त्याची अंमलबजावणीही करा. त्यामुळे पैसा आणि वेळ वाचेल त्याचबरोबर गुणवत्ताही वाढेल.

 

आपल्याकडे एक म्हण आहे, तावून-सुलाखून निघाल्याशिवाय चकाकी येत नाही. तुम्ही सर्व जण तरूण आहात. प्रचंड ऊर्जा तुमच्यामध्ये आहे. या संकटांमधून जेव्हा तुम्हा बाहेर पडाल तेव्हा तुमचं नवं रूप असेल. तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असेल. विश्वास, चिकाटी आणि धडाडी याच्या बळावर तुम्ही काहीही करू शकता, जगही जिंकू शकता हा विश्वास कायम असू द्या.

उद्योग-व्यवसाय या संबंधात तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही मला त्याबाबत विचारू शकता. दर रविवारी Ask Anandमध्ये त्याची उत्तरं मी तुम्हाला देईन. त्यामुळे आपला हा संवाद असाच सुरू राहणार आहे. प्रश्न पाठविण्यासाठी Email – askanand@yashaswiudyojak.com

माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा!

All the Best!

आनंद

@anandesh

https://www.linkedin.com/in/ananddeshpande

  “अर्णव शिकायला बाहेर, राजीवही कंपनीच्या कामात बिझी, आज घरी आहे तर उद्या ...

  आपल्याकडे प्रत्येक प्रांतात प्रत्येक पदार्थ वेगवेगळ्या प्रकारे केला जा...

  आज भारतातल्या एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत कामानिमित्त एखादी फिरंगी व...

  मित्रांनो, माझ्या कामाचा पसारा वाढत गेला, तसाच डीलरकडून पैसे न देण्याचा ...

  मित्रांनो, क्विक हिल ग्राहकांनी अगदी डोक्यावर घेतलं पण ते भारतभर सगळीक...